Friday, May 3, 2024
Homeमहत्वाची बातमीउत्कर्ष मंदिर, मालाड

उत्कर्ष मंदिर, मालाड

शिबानी जोशी

एखादी संस्था स्थापन होण्यामागे बहुतांश वेळा काहीतरी सामाजिक कारण अथवा घटना घडलेली असते. असंच काहीसं मुंबईतील मालाड इथल्या उत्कर्ष मंदिर शाळेबाबत घडलं. १९५०च्या दशकामध्ये मुंबईमध्ये मराठी-गुजराती भाषा – प्रांतवाद चालू होता. याच पार्श्वभूमीवर मालाडमध्ये चांगल्या मराठी माध्यमाच्या शाळेची गरज निर्माण झाली आणि त्यातूनच उत्कर्ष मंदिराचा उगम झाला, असे म्हणता येईल.

मालाडमध्ये रा. स्व. संघाचे कार्यकर्ते समाजसेवा करत होतेच, डॉ. व. त्र्यं. जोशी, डॉ. आ. वि. फडके, डॉ. हरिभाऊ जोगळेकर, नामवंत वकील भा. रा. देवल, बळवंत मंत्री, भुलेस्कर यांसारख्या संघ विचारांच्या तसेच समाजहितैषी अन्य धुरिणांनी शाळानिर्मितीची ही गरज मोठ्या जिद्दीने उत्कर्ष मंदिरच्या रूपाने साकारली. शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड ही संस्था कार्यरत करून मराठी भाषेतून दर्जेदार शिक्षण देता यावं म्हणून मालाड पूर्वेला ही शाळा सुरू केली. सुरुवातीला इयत्ता आठवीचे वर्ग सुरू झाले. प्रथम पूर्वेला आणि मग त्यानंतर मालाड पश्चिमेला ही एक छोटी शाळा पुढील शैक्षणिक प्रवासाची गंगोत्री झाली.

सुप्रसिद्ध नेचरोपॅथिस्ट डॉ. वर्मा मालाड पूर्वेला नेचर क्युअर नावाचे रुग्णालय होते. या रुग्णालयाच्या परिसरात १९५६मध्ये शेडमध्ये प्रथम शाळा सुरू झाली. त्यानंतर मालाड पश्चिमेला जागा विकत घेऊन शाळेची उभारणी झाली. कोठारे म्हणून मालाड गावामध्ये मोठे मामलेदार होते. त्यांच्याकडून ही जागा विकत घेतली गेली; अर्थात कोठारेंनी ही जागा शाळेसाठी असल्यामुळे खूप कमी किमतीत दिली. पैसे गोळा करून शाळेचं बांधकाम करण्यात आलं.

शाळेचे पहिले मुख्याध्यापक मंगेश राजाध्यक्ष हे काही वर्षे कार्यरत होते. त्यांच्या निवृत्तीनंतरचे मुख्याध्यापक म. ज. फडके यांनी उपक्रमशील व गुणवंत विद्यार्थी निर्माण करणारी शाळा म्हणून शाळेस लौकिक मिळवून दिला. अर्थातच या कामात संस्थाचालक व अन्य सर्व शिक्षकांचे मोठे योगदान होते. शैलजा प्रभुदेसाई या शाळेच्या प्रथमदिवसापासून त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंतच्या ३८ वर्षं कार्यरत राहिल्या. त्यांच्याप्रमाणेच अतिशय उत्कृष्ट व प्रभावी शिक्षक प्रारंभापासूनच शाळेला लाभले, हे उत्कर्ष मंदिराचं भाग्य म्हणता येईल.

उत्कर्ष मंदिरची पहिली इमारत पश्चिमेला झाली आणि १९६९ मध्ये पूर्वेलाही इमारत बांधण्यात आली. मालाड तसेच मालवणी, मार्वे, मनोरी, गोरेगाव, कांदिवली, कुरार, अशा सगळ्या निकटच्या गावातून समाजातल्या सर्व थरातून शाळेला विद्यार्थी मिळू लागले. हिंदूंसहितच अन्य धर्मीय विद्यार्थीसुद्धा उत्कर्ष मंदिरमध्ये उत्तम शिक्षण व संस्कारांसाठी सुरुवातीपासूनच येतात. संस्थेच्या अनेक संचालकांची मुलंसुद्धा अगदी पहिल्या वर्षांपासून याच शाळेत शिकत होती.

मातृभाषेतून शिक्षण हे एक सत्य आणि तत्त्व आहे, तसंच ज्या कारणामुळे मराठी माध्यमाच्या शाळेची निर्मिती झाली, ते कारण डावलून इंग्रजी माध्यमाची शाळा काढणे अजून तरी संस्थेने अंतिम सत्य म्हणून स्वीकारलेले नाही. मात्र जगात आपली मुलं मागे पडू नयेत यासाठी इंग्रजी भाषेचे वेगवेगळे प्रयोग शाळेत केले जातात. इयत्ता पहिलीपासूनच सेमी-इंग्रजी माध्यम स्वीकारण्यात आले आहे. दर शनिवारी शाळा दीड तास लवकर सुटतात, पण त्यांना न सोडता त्या दिवशी स्वतःचा इंग्रजी अभ्यासक्रम तयार करून इंग्लिश स्पीकिंग आणि कॉन्फिडन्स बिल्डिंग याचं प्रशिक्षण इयत्ता पहिलीपासूनच दिलं जात, ते इयत्ता बारावीपर्यंतच्या सर्व वर्गांना अनिवार्यपणे.

शाळेच्या पूर्व-पश्चिम दोन्ही ठिकाणी बालमंदिर, प्राथमिक, माध्यमिक विभाग तर आहेतच, पण २०१६पासून उत्कर्ष मंदिर कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आले असून तेथे अकाऊंटिंग अँड फायनान्शियल ऑफिस मॅनेजमेंट, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी आणि टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट असे अकरावी-बारावीचे सरकारमान्य व्यावसायिक कनिष्ठ महाविद्यालय कार्यरत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना क्रिकेट, कबड्डी, कराटे, जिम्नॅस्टिक, मल्लखांब तसेच अन्य अनेकानेक खेळांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. कबड्डीमध्ये मुलांप्रमाणेच मुलींचाही संघ राज्यस्तरापर्यंत खेळून यशस्वी झाला आहे. कराटेच्या क्रीडाप्रकारात शाळेय मुलांनी राष्ट्रीय स्तर गाठला आहे.

मंडळ आणि शाळेने गेली तीस वर्षे आंतरशालेय एकांकिका स्पर्धा पूर्वी दीनानाथ नाट्यगृह आणि सध्या प्रबोधनकार ठाकरे येथे भरविल्या जातात. या उपक्रमामुळे उत्कर्ष मंदिरमधील तसेच अन्य शाळांमधील अनेक शिक्षकांना शाळेने लेखक, दिग्दर्शक संगीतकार म्हणून मान्यता प्राप्त होण्यास संधी दिली आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक-निर्माते वीरेंद्र प्रधान, अभिनेते अभिजित केळकर, विनायक दाबके, उन्मेष वीरकर, राजश्री ओक, पं. राजेंद्र वैशंपायन, शिल्पा वडके, दिनेश कानडे, भाग्यश्री फडके-साने, गौरी केतकर यांसारखे कलाकार निर्माण झाले आहेत. अमृता पत्कीसारखी इंडियन सुपर मॉडेल, राष्ट्रीय स्तरावरील कुमार गटातील भारत श्री विकी गोरक्ष, ज्येष्ठ विचारक व व्याख्याते डॉ. गिरीश दाबके, तरुण तेजांकीत पुरस्कार प्राप्त उद्योजक पराग पाटील, बाबा आमटे यांच्या आनंदवन ट्रस्टचे विश्वस्त नरेंद्र मेस्त्री, वनवासी कल्याण आश्रमाचे महाराष्ट्र प्रांत माजी अध्यक्ष कमलाकर बिडेकर, समाजसेविका इंदवी तुळपुळे यांसारखे आणि हजारो डॉक्टर्स, अभियंते, सी. ए, वकील व अन्य असंख्य विद्वान व गुणी विद्यार्थी उत्कर्ष मंदिरने निर्माण केले आहेत.

एक कर्तव्यनिष्ठ भूमिका बजावून ज्यांना वीरमरण आले असे विजय साळसकर तसेच सध्या भारतीय सेनेत कार्यरत असलेले लेफ्टनंट शैलेश गोखले तसेच महाराष्ट्र अग्निशमन दलाचे संचालक संतोष वारीक अशा शूर विद्यार्थ्यांची घडवणूक सुद्धा उत्कर्ष मंदिरातच झाली आहे.
सध्या सुमारे २००० विद्यार्थी शाळेत शिकत असून दैनंदिन अध्यापनासोबतच विज्ञान प्रदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, चित्रकला प्रशिक्षण, साहित्य संमेलन भेटी, शैक्षणिक क्षेत्र भेटी, काव्यस्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा महोत्सव अशा संस्कारक्षम कार्यक्रमांच्या मुशीतून विद्यार्थ्यांना घडविण्यात येत आहे. व्यावसायिक कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही प्रदर्शने औद्योगिक क्षेत्रभेटी अशा उपक्रमातून उत्कृष्ट शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पालक तसेच संस्था चालकांच्या वाङ्मयीन गुणांना वाव देण्यासाठी गेली अनेक दशके उत्कर्ष नावाची एकांकिका प्रकाशित केली जाते.

शाळेने सामाजिक बांधिलकी म्हणून उत्कर्ष वसंत व्याख्यानमाला गेल्या तीन वर्षांपासून चालू ठेवली आहे. या व्याख्यानमालेत दीपक घैसास, गिरीश जाखोटिया, मेळघाटात कार्यरत असलेले डॉ. रवींद्र कोल्हे, दुबईमधील अल आदिल ट्रेडिंग कंपनीचे मालक डॉ. धनंजय दातार, सुनील देवधर, डॉ. सुवर्णा रावळ, काश्मीरमधून विस्थापित उद्योजिका शक्ती मुन्शी, प्रा. प्रवीण दवणे आदी अनेक तज्ज्ञ विचारवंतांनी व्याख्याने दिली आहेत. याचा सुयोग्य परिणाम शिक्षक, पालक तसेच समाजातील अनेक व्यक्तींवर झालेला दिसतो. शाळेतील सर्व शिक्षक विषय तज्ज्ञतेबरोबरच गुणवान आणि मातब्बर आहेत. शाळेतील ६ शिक्षकांना महापौर पुरस्कार, तीन शिक्षकांना राज्यपुरस्कार, तर एका शिक्षिकेस राष्ट्रीय पुरस्कार तसेच अनेक शिक्षकांना विविध स्तरावरचे गौरव पुरस्कार मिळाले आहेत.

सर्वांना बरोबर घेऊन गेलो, तर संस्थेच्या विकासाबरोबर समाजाचाही विकास होत असतो, हे उत्कर्ष मंदिर संस्थेकडे पाहून लक्षात येत. थोडक्यात काय तर, उत्कर्ष मंदिर शाळा आणि शिक्षक प्रसारक मंडळ म्हणजे एक कुटुंबच आहे आणि त्यानुसार प्रत्येकाची काळजी घेत संस्था स्वतःचा आणि समाजाचा विकास करत आहे.
joshishibani@yahoo.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -