Friday, May 3, 2024
Homeक्रीडाउस्मान ख्वाजाचे दमदार पुनरागमन

उस्मान ख्वाजाचे दमदार पुनरागमन

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४१६ धावांवर घोषित

सिडनी : मधल्या फळीतील उस्मान ख्वाजाच्या (१३७ धावा) दमदार पुनरागमनासह ऑस्ट्रेलियाने अॅशेस क्रिकेट मालिकेतील चौथ्या कसोटीमध्ये पहिला डाव ८ बाद ४१६ धावांवर घोषित केला. दुसऱ्या दिवसअखेर गुरुवारी इंग्लंडने बिनबाद १३ धावा केल्या असून पाहुणे अद्याप ४०३ धावांनी पिछाडीवर आहेत.

ख्वाजाने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना तब्बल १६ महिन्यांनंतर कसोटी संघात पुनरागमन करताना अप्रतिम शतक झळकावले. चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही यजमान फलंदाजांनी इंग्लंडला गोलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. पहिल्या दिवशीच्या ३ बाद १२६ वरून पुढे खेळताना अनुभवी स्टीव्ह स्मिथ व उस्मान ख्वाजाने दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. स्मिथने फॉर्म कायम राखत शानदार अर्धशतक झळकावले. तो ६७ धावा काढून बाद झाला. मात्र, टॅ्व्हिस हेड कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने संधी मिळालेल्या ख्वाजाने संधीचे सोने केले. त्याने इंग्लंडच्या अनुभवी गोलंदाजांचा समाचार घेत शानदार शतक झळकावले. ख्वाजाच्या २६० चेंडूंतील १३७ धावांच्या खेळीत १३ चौकारांचा समावेश आहे. त्याने ४१० मिनिटे खेळपट्टीवर थांबताना संयमाची परीक्षाही पास केली.

ख्वाजाने चहापानापूर्वी इंग्लंडचा स्पिनर जॅक लीचच्या बॉलिंगवर तीन धावा काढत शतक पूर्ण केले. त्याने २०११मध्ये याच मैदानावर अॅशेस सीरिजद्वारे कसोटी पदार्पण केले होते. आता दोन वर्षांनी इथेच शतक झळकावले आहे. ख्वाजाचे सिडनी ग्राऊंडवरील हे दुसरे कसोटी शतक आहे. स्मिथ आणि ख्वाजाची चौथ्या विकेटसाठीची ११५ धावांची भागीदारी यजमानांच्या डावातील सर्वाधिक भागीदारी ठरली.

मधल्या फळीनंतर पॅट कमिन्स (२४ धावा), मिचेल स्टार्क (नाबाद ३४ धावा) आणि नॅथन लियॉनच्या (नाबाद १६ धावा) रूपाने शेपूट वळवळल्याने ऑस्ट्रेलियाने १३४ षटकांनंतर ८ बाद ४१६ धावांवर आपला डाव घोषित केला. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. पाहुण्या गोलंदाजांनी दिलेला २४ धावांचा बोनसही यजमानांना चारशेपार नेऊन गेला. इंग्लंडच्या बॉलर्सनी १२ वाईड चेंडू टाकले.
दिवसातील उर्वरित पाच षटके खेळून काढण्याची मोठी जबाबदारी इंग्लंडच्या फलंदाजांवर होती. हसीब हमीद (खेळत आहे २) आणि झॅक क्रावलीने (खेळत आहे २) कोणतीही जोखीम न घेता बिनबाद १३ धावा केल्या.

अॅशेस मालिकेतील पहिले तिन्ही सामने यजमान ऑस्ट्रेलियाने एकतर्फी जिंकले आहेत. ब्रिस्बेन कसोटीत ९ विकेट राखून ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. त्यानंतर, अॅडलेड येथील दिवस-रात्र कसोटीत ऑस्ट्रेलियाने प्रतिस्पर्ध्यांवर १७२ धावांनी मात केली. मेलबर्न येथील बॉक्सिंग-डे कसोटीतही ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला डावाने पराभूत करताना पाच सामन्यांत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -