Tuesday, May 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित, शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई; एसआरए सदनिका हस्तांतरण शुल्कात...

सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित, शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई; एसआरए सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ८ मोठे निर्णय

मुंबई : राज्यभरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. बळीराजा मदतीच्या प्रतिक्षेत असताना आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच पंचनामे झाल्याबरोबर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. दुसरीकडे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय (SRA flat transfer charges) आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याने झोपडीधारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात प्रशासनाने युद्ध स्तरावर काम करावे अशा सूचना दिल्या.

राज्य मंत्रिमंडळ बैठक : संक्षिप्त निर्णय

  • अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार (मदत व पुनर्वसन)
  • झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात. झोपडीधारकांना मोठा दिलासा (गृहनिर्माण विभाग)
  • राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा (शालेय शिक्षण)
  • मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार (मराठी भाषा विभाग)
  • मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली (अल्पसंख्याक विभाग)
  • औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधिशाना सुधारित सेवानिवृत्तीवेतन (उद्योग विभाग)
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार (महसूल विभाग)
  • शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा (महसूल विभाग)

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड हे तालुके बाधित असून यातील ५३ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे., पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई व डहाणू तालुक्यातील ४१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, नाशिक जिल्ह्यातील कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, चांदवड, येवला तालुक्यातील ३२ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रातील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका, गहू, ऊस व फळपिके, धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील ४६ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, कापूस, हरभरा, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी तालुक्यातील २ हजार २३९ हेक्टर क्षेत्रातील भात, कापूस, तूर, मिरची, मका, कांदा पिकांचे, जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, धरणगाव, बोदवड, भडगाव तालुक्यातील ५५२ हेक्टर क्षेत्रातील कांदा, हरभरा, गहू, मका, ज्वारी व फळपिकांचे नुकसान झाले.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, पारनेर, राहाता येथील १५ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, मक्याचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, शिरुर तालुक्यातील ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील १५ हेक्टर क्षेत्रातील भात पिकाचे नुकसान झाले आहे., छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यातील ४ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई व मका पिकांचे नुकसान झाले आहे,

जालना जिल्ह्यातील बदनापूर, जालना, जाफराबाद तालुक्यातील ५ हजार २७९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, केळी, कांदा, खरीप ज्वारी, गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळी, बीड तालुक्यातील २१५ हेक्टर क्षेत्रातील कांदा, ज्वारी, भाजीपाल्याचे नुकसान झाले आ. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील १०० हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, पूर्णा, पालम मानवत सोनपेठ, सेलू तालुक्यातील १ हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी, कापूस, सीताफळ, पेरू, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड तालुक्यातील ५० हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बुलडाणा, नांदुरा, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, मेहकर, जळगाव जामोद, मलकापूर, खामगाव, शेगाव, मोताळा, नांदुरा तालुक्यातील ३३ हजार ९५१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -