Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीउपचार नाकारल्याने आदिवासी महिलेचा मृत्यू

उपचार नाकारल्याने आदिवासी महिलेचा मृत्यू

या महिलेला चार-पाच ठिकाणी उपचार नाकारला, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच झाला तिचा मृत्यू

वसंत भोईर

वाडा : वाडा तालुक्यातील कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका तेवीस वर्षीय आदिवासी महिलेची प्रकृती सलाइन लावताच गंभीर झाली. त्यानंतर या महिलेला चार-पाच ठिकाणी उपचार नाकारल्याने तिचा मृत्यू झाला. रुचिता रूपेश वड असे या मृत महिलेचे नाव असून, ती चांबळे गावातील रहिवासी आहे. या महिलेच्या मृत्यूने तिच्या तीन वर्षांच्या कुपोषित असलेल्या बालकाचे मातृछत्र हरपले आहे.

सोमवारी रुचिता वड ही थोडा ताप आणि अशक्तपणा असल्याची तक्रार घेऊन पती रूपेशसोबत प्राथमिक आरोग्य केंद्र कुडूस येथे गेली. तिला महिला डॉक्टरने तपासले आणि सलाइन लावले. त्यानंतर तिला थंडी भरून आली आणि जुलाब सुरू झाले. याची माहिती मिळताच, सुरुवातीला कर्तव्यावर उपस्थित नसलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान पगारे तेथे आले आणि त्यांनी तिला पुढे मोठ्या रुग्णालयात घेऊन जा असे सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्राची १०८ रुग्णवाहिका घेऊन पती रूपेश पत्नीला घेऊन कुडूस येथील खासगी डॉक्टरकडे गेला. दरम्यान, तिला ऑक्सिजन, आयव्ही, काहीही न लावता किंवा सोबत नर्स अथवा डॉक्टर न देता, बेजबाबदारपणे पाठविल्याचा आरोप वड यांनी केला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात दिलेली ट्रीटमेंट तपशील असणारे रेफर लेटर न देता डॉक्टरांनी अत्यंत बेजबाबदारपणे पेशंट पाठविल्याचा आरोप मृत महिलेच्या पतीने केला आहे. कोणत्याही शासकीय रुग्णालयात गंभीर रुग्ण संदर्भित करण्याचे काही नियम आणि तत्त्व आहेत, या सगळ्याला फाटा देत कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. समाधान पगारे आणि इतरांनी रुचिता हिला अक्षरशः मरणासाठी वाऱ्यावर सोडून दिले आणि त्यामुळेच तिला मृत्युमुखी पडावे लागले, असा आरोप तिचे पती रूपेश वड यांनी केला आहे.

डॉ. ठाकरे यांनी ती गंभीर असल्याचे सांगितले. अखेर गाडीने रुचिताला अंबाडी येथील साईदत्त हॉस्पिटलमध्ये नेले. येथील डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर ठेवले. मात्र, ऑक्सिजन पातळी ३० ते ३५ इतकी कमी होती. तेथील डॉक्टरने त्यांची रुग्णवाहिका घेऊन रुचिताला आधी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नेले. मात्र, त्यांनीही उपचार नाकारला. पुढे सायन येथे नेल्यानंतर तिथेही उपचार नाकारले. पुन्हा ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, तोपर्यंत रुचिता हिने प्राण सोडले होते. त्यानंतर, शवविच्छेदन केले गेले आणि ठाणे वागळे इस्टेट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली, असे श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी सांगितले.

हा गंभीर हलगर्जीपणा असून, एका तेवीस वर्षीय महिलेच्या मृत्यूला कुडूस येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असून, या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी केली आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळला

या संदर्भात कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान पगारे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी रूपेश वड यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. ही रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात येण्याआधी त्यांना जुलाब व उलटीचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांचा बीपी अत्यंत कमी झाला होता. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर १०८ रुग्णवाहिका देऊन त्यांना पुढे ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, अशी माहिती त्यांनी दिली.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -