Friday, May 3, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखTraffic Jam : मेट्रोमुळे वाहतूक कोंडी भविष्यात तरी फुटेल का?

Traffic Jam : मेट्रोमुळे वाहतूक कोंडी भविष्यात तरी फुटेल का?

  • मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रे

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून लाखो मुंबईकर दररोज प्रवास करतात. त्याचप्रमाणे बेस्ट बसमधूनही रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबईकरांना आणखी एका परिवहन सेवेची गरज होती. त्यात आता मुंबईत तीन मेट्रो नव्याने सुरू झाल्यामुळे व भविष्यात आणखी काही मार्ग सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे मुंबईकरांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे. कारण नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून ज्या ठिकाणी मेट्रो सुरू झाली आहे, त्या ठिकणाची वाहतूक कोंडी कमी होण्याच्या ऐवजी वाढलीच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एक प्रकारे भविष्यात ही धोक्याची घंटा असू शकते. त्यामुळे यावर आतापासूनच तातडीने काहीतरी तोडगा काढणे आवश्यक बाब बनली आहे. जर इतकी गुंतवणूक करून, एवढा खर्च करून प्रसंगी निसर्गावर आघात करून भविष्यकालीन नियोजनासाठी बनवलेली ही मेट्रो सेवा जर आपले मूळ उद्देशच साध्य करत नसेल तर साऱ्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

मुंबईत रेल्वेचे मध्य, हार्बर आणि पश्चिम असे रेल्वेचे तीन मार्ग आहेत. जे मुंबईतल्या बहुतांश भागांना जलद गतीने एकमेकांशी जोडतात; परंतु यामुळे लोकल रेल्वेवर प्रचंड ताण पडतो. रेल्वेच्या या तिन्ही मार्गांवर विशेषत: कार्यालय सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी मोठी गर्दी होते. यामुळे अनेकदा प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करतात. तर अनेक अपघात होतात, ज्यात प्रवाशांचा मृत्यूदेखील होतो. दुसऱ्या बाजूला रस्ते मार्गावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसभर एकाच वेळी येणाऱ्या जड व अवजड वाहनांचा लोंढा, त्यात होणारी वाहतूक कोंडी यामुळे येथील स्थानिक बस सेवा वाहतूक कोंडीत अडकून पडते. त्यामुळे मुंबईत सक्षम पर्यायी वाहतूक व्यवस्थेची गरज निर्माण झाली आणि मुंबईत मेट्रोचे काम सुरू झाले. मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तर आणि दक्षिण जोडणाऱ्या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गिका आता सुरू झाल्या आहेत. यापूर्वीच अंधेरी व घाटकोपर यांना जोडणारी मेट्रो एक सेवा सुरू आहे. यामुळे मुंबईकरांना ३५ ते ४० मिनिटांत आपल्या इच्छित स्थळी जाणे आणखी सोपे झाले. या मेट्रो सेवांमुळे पश्चिम द्रूतगती मार्ग व लिंक मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार असा दावा केला गेला. जरी प्रवाशांना जलद वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला असला तरी रस्त्यावरील वाहतूक जरा ही कमी झाली नसल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणात आढळले आहे. का नवीन सर्वेक्षणानुसार मुंबईतील वाहनांची संख्या गेल्या तीन वर्षांत ३५ टक्क्यांनी वाढली आहे तर वांद्रे ते मीरा रोड या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीत तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तीच परिस्थिती पूर्व द्रुतपती महामार्ग म्हणजे सायन ते ठाणे या पट्ट्यात झाली आहे. घाटकोपर ते सीएसटी दरम्यान पूर्व मुक्त मार्ग बांधला गेल्याने तेथील वाहतुकीच्या संख्येत प्रचंड पटीने वाढ झाली आहे. मात्र जुन्या घाटकोपर ते लालबागमार्गे सीएसटीएम मार्गावरील वाहतूक कोंडी आहे, ती तशीच आहे. गेल्या वर्षी म्हणजे विशेषत: कोरोनानंतर या आकडेवाडीत भयंकर वाढ झाली आहे. मुंबईत सध्या परिस्थितीला ४२.१३ लाख वाहने आहेत. कोरोना यात ४.९% हलक्या वाहनांमध्ये वाढ झाली तर ३.५% प्रवासी वाहनात वाढ झाली आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने हे शहर व्यापाराचे मोठं केंद्र आहे. मुंबईतील अंदाजे ८० टक्क्यांहून अधिक लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. त्यात रेल्वेपाठोपाठ येथील बेस्ट बस सेवा दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर नंतर रिक्षा टॅक्सी यांचा नंबर लागतो. आता मेट्रो सेवा हा नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. सध्याची उपनगरीय रेल्वे व्यवस्था मुंबईतील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे; परंतु यावरील वाढता ताण कमी करण्यासाठी आणि आगामी लोकसंख्येचा आणि गरजेचा विचार करता मुंबईत मेट्रोचे जाळे उभारण्यावर भर दिला गेला. मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि समुद्रालगत असलेल्या शहरात मेट्रो व्यवस्था उभी करणे नक्कीच सोपे नव्हते. याउलट भुयारी मार्ग उभारणे व मुंबईसारख्या गुंतागुंतीच्या व दाटीवाटीच्या शहरात मेट्रो उभी करणे आव्हानात्मक होते. शिवाय, भौगोलिक परिस्थितीमुळे मुंबईत पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी पाणी साचते आणि शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून जाते. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही भुयारी व रस्त्यावरून जाणारी मेट्रो सेवा उभारण्याचे काम पूर्णत्वास नेले जात आहे. तसेच मुंबईसारख्या दाटीवाटीच्या ठिकाणी मेट्रोचे सुरू असलेले काम हे गेल्या काही वर्षांपासून सुरु असून आणि यापुढेही कित्येक वर्षे रोजच्या वाहतूक कोंडीला कारणीभूत असणार आहे. पण मुंबई मेट्रोसारखी पर्यायी व्यवस्था ही शहराची आजची व भविष्यकालीन गरज होती हेही नियोजनकर्त्यांनी ओळखले व त्या दिशेला पावले टाकली. मुंबईकरांची दररोजची ऊर्जा कामावर जाण्यासाठी आणि कामावरून परत घरी पोहचण्यासाठी खर्च होते आणि यात खूप वेळ जातो,’ ही तक्रार मुंबईत नोकरी करणारा जवळपास प्रत्येक नोकरदार करत असल्याचे दिसते. कारण मुंबईत नोकरी करणाऱ्यांचा किंवा कामानिमित्त लोकल किंवा बसमधून दररोज प्रवास करणाऱ्यांचा दिवसभरातील बराचसा वेळ प्रवासात जातो. मुंबईत मेट्रोचा विस्तार होत असताना प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आणखी एक मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे. मुंबईत आतापर्यंत तीन मेट्रो प्रकल्प सुरू झाले असून बाकी ११ प्रकल्पांचे काम प्रलंबित आहे. मुंबईत सगळीकडे रिअल इस्टेटचे जाळं पसरत चालले आहे, सगळीकडे घरं बांधली गेली. पण अपेक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीटशी पोहोचली नाही. त्यामुळे मुंबई व उपनगरात आजही जीवघेणी वाहतूक कोंडी अनुभवायला मिळते. “मुंबईत एकाचवेळी एवढे प्रकल्प कधीच सुरू नव्हते. त्यामुळे प्रदूषण प्रचंड वाढलंय. पुढील आणखी ५ ते ६ वर्षे हा त्रास कायम राहील असा अंदाज आहे. जानेवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे मार्ग दोन सातचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर काही कालावधीतच रस्त्यावरील रहदारी कमी झाल्याचे आढळून आले होते. कारण बऱ्याच लोकांनी मेट्रोने जाणे पसंत केले होते. मात्र काही दिवसांनी पुन्हा वाहतूक कोंडीचा अनुभव इथून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येत आहे. बहुतेक खासगी वाहनांचा वापर करणाऱ्या मंडळींना नवीन मेट्रो सेवा नव्याची नवलाई संपल्यानंतर नापसंतीस उतरलेली दिसते. कारण आपल्या घरातून मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे व मेट्रोतून उतरून पुन्हा आपले इच्छितस्थळी जाणे हाच एक त्रासदायक अनुभव असल्याचे प्रवासी व्यक्त करत आहेत. त्याच्यापेक्षा डोअर टू डोअर असणारे आपले खासगी वाहन त्यांना सोयीचे वाटते व परवडते अशी स्थिती आहे.

मुंबईत याच्या अगोदर वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो एक सुरू आहे, हा ही मार्ग वर्सोवा ते अंधेरी व अंधेरी ते घाटकोपर अशा दाटीवाटीच्या मार्गातून जातो या मेट्रोलाही प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद आहे. मात्र आजही घाटकोपर ते अंधेरी व अंधेरी ते वर्सोवा या मार्गावरील रहदारी कमी झाल्याचे कुठे आढळून येत नाही व दिसूनही येत नाही. ना रिक्षावाल्यांचे धंदे बंद झाले ना बेस्ट बस मार्गावरील बस गाड्या कमी झाल्या. याउलट या मार्गावर धावणाऱ्या बस व रिक्षाला प्रवाशांचा तुडुंब प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत आणखी चेंबूर ते सातरस्ता दरम्यान एक मोनोरेल सुरू आहे. मात्र त्या मार्गावरील वाहतूक कमी झाल्याचे कुठे ऐकू येत नाही. उलट मेट्रो व मोनो सेवा झाल्यामुळे त्याला पूरक अशी पर्यायी व्यवस्था निर्माण झाली आहे.मेट्रोतून उतरून लोकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी बस व रिक्षाचा पर्याय घ्यावाच लागत आहे. अशांने मुंबईची वाहतूक कोंडी कमी कशी होणार. त्यामुळे जरी मुंबई व महामुंबईतील सर्व मेट्रो मार्ग जरी सुरू झाले तरी वाहतूक कोंडी कमी होईल अशी कोणतीही लक्षणे सध्या दिसत नाहीत. उलट खेदाने म्हणावे लागत आहे की मेट्रो सुरू झाल्याने रस्त्यावरील वाहतुकीला पर्याय निर्माण झाला नाही तर तुडुंब भरणाऱ्या रेल्वेला हा पर्याय निर्माण झाला आहे. कदाचित रेल्वेवरील गर्दी भविष्यात कमी होईल. मात्र रस्त्यावरील गर्दी कमी होणार नाही हेच सत्य आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -