Tuesday, May 21, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सविविध जबाबदाऱ्या लीलया पेलणारी आजची स्त्री...

विविध जबाबदाऱ्या लीलया पेलणारी आजची स्त्री…

  • मनातले कवडसे: रूपाली हिर्लेकर

जन्माच्या आधीपासूनच मातेच्या गर्भात एका अर्भकाला ठाऊक असतं की, मला या भूतलावर अवतरण व्हायचंय, शांतपणे हे जग बघायचंय, शोधकतेने ही सृष्टी अभ्यासाचीय. कारण, जन्मानंतर लगेचच मुली आपल्या आईला समजून घेतात, असं वाटतं. त्यांच्यात समंजसपणा जन्मापासूनच असतो. परिस्थितीशी सामना करत भावंडांचा विचार करत आपले आयुष्य रेखाटताना त्या सचोटीने वागतात. कल्पकतेने प्रत्येक गोष्टीला नावीन्यतेचा आकार देतात. शांत असतात. पण खेळताना चंचल होतात. अवखळपणा असतानाही संयमाचे भान ठेवतात. या मुली म्हणजे घराघरातील सौंदर्य वाढवणाऱ्या शोभा असतात.

फूल जसं फुलतं ना तसं या घराला आपल्या असण्याने फुलवतात. त्यांचे बोल संपूर्ण कुटुंबाला बोलके करतात. पाकसिद्धी आत्मसात करून अन्नपूर्णा बनतात. तारुण्यात जणू त्यांना बहर येतो. वसंतात जसा सृष्टीला नवा गुलाबी रंग चढतो, तशा या सौंदर्याने न्हाऊन निघतात. शरीराची प्रत्येक ठेवण जपत आपल्या सौंदर्याला खुलवतात. हे करतानाही शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता प्रत्येक क्षेत्रात आगेकूच करतात. नावलौकिक मिळवून जेथे वाढल्या तेथून दुसऱ्या घरात प्रवेश करतात. नातं समजून उमजून वागतात आणि जणू वर्षानुवर्षे त्या घरच्याच आहोत, अशा सासरला माहेर बनवतात.

स्त्री ही अबला नाहीच मुळी, स्वतःच्या सच्चा वागण्याने, सहनशीलतेने, प्रेमाने सगळ्यांना आपलंसं करते. त्यांचे हसणे, रुसणे, खेळणे सारे काही निराळं निरागस! स्वतःपेक्षा घरात प्रत्येकाकडे लक्ष देतात. किंबहुना त्यांचा जन्मच दुसऱ्यासाठी झालाय. स्त्री ही जगतेच दुसऱ्यासाठी. जीवनात देण्याचं काम ती करते. खूप कष्ट करून सदनिका सजवते, कधी शिक्षण देणारी शिक्षिका, कधी सेवासुश्रूषा करणारी वैद्य, कधी सल्ला देणारी सल्लागार, घरात हिशोब ठेवणारी लेखनिक, घर सजवताना होम डेकोरेटर, मेजवानी बनवताना शेफ, मुलांबरोबर त्याला पुढे आणण्यासाठी झटणारी स्पोर्ट्स कोच. काय नाहीये ती! प्रत्येक क्षेत्र लीलया निभावणारी अष्टपैलू स्त्री आहे.

मला तर स्त्री म्हणजे अष्टभुजा असणारी देवी वाटते. आजच्या स्त्रीच्या एका हातात मोबाइल, एका हातात गाडीची चावी, एका हातात बाळ, एका हातात घरातील बील, एका हातात लॅपटॉप अशा सर्वच जबाबदाऱ्या पेलूनही सतत हसतमुख असते. हे सगळं करत असताना ती स्वतःच सत्त्व जपते. मर्यादेचे भान ठेवते. मनात येईल तेव्हा गाते, लिहिते, नृत्यांगना बनते आणि आपल्या साऱ्या भावना व्यक्त करते अन् जेव्हा एक स्त्री आई बनते, तेव्हा तर ती अंतर्बाह्य बदलून जाते. तिचा नवा जन्म सुरू होतो. आपल्या मुलाच्या संगोपनात ती आपले आयुष्य वेचते. या बदल्यात तिला काहीच नको असतं. तिचे घर छान राहावे हाच उद्देश असतो.

कोणत्याही कामात कितीही व्यग्र असली तरी घरच्या माणसांच्या आणि मुलांच्या जबाबदाऱ्या न विसरता ती पेलते. स्त्रीमध्येच एवढी अचाट शक्ती आहे की, हे सगळं सहज करते. सहनशक्ती हा शब्दच मुळी तिच्यासाठी जन्मलाय. सगळं सहन करूनही चेहऱ्यावर सतत स्मितहास्य करते. कसं जमतं हे तिला? याचे उत्तर तिलाही ठाऊक नाही. म्हणून मला स्त्रीबद्दल असं सांगावसं वाटतं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -