Saturday, May 4, 2024
Homeसाप्ताहिककोलाजपक्षीविना विश्व हे अधुरे!

पक्षीविना विश्व हे अधुरे!

निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

पृथ्वीच्या भूगर्भ शास्त्रीय इतिहासाच्या पहिल्या ते दुसऱ्या कालावधीच्या युगाला “मेसोझोईक युग” असे म्हणतात. या युगात पक्षी, मोठे मासे, डायनासोर, मोठ्या वनस्पती-वृक्ष मोठी फुले, फळे, मुंग्या, कीटक जे काही जीवाश्मपुरावे आढळून आले त्यावरून यांची उत्पत्ती होती असे दिसते. म्हटलं तर इतिहास हेच सांगतो की, पृथ्वीवर प्रथम डायनासोर सारखे सगळे मोठे प्राणी होते आणि मग ते विलुप्त होऊन हळूहळू लहान पशु-पक्षी यांच्यामध्ये त्यांचे रूपांतर झाले पण यात किती तथ्य असेल हे आपण सांगू शकत नाही कारण काही अवशेषांवरून हे अंदाज बांधले जात आहेत.

एकंदरीत माझ्या अध्ययनानुसार पृथ्वी निर्मित झाल्यानंतर जसजशा पूरक वातावरणाची निर्मिती झाली तस तशी सजीव सृष्टीची निर्मिती होत गेली. साहजिकच प्रत्येक सजीवांची शरीर रचना ही पूर्णपणे या प्रकृतीवरच अवलंबून होती आणि सर्व प्रकृतीही पंचतत्त्वांवरच अवलंबून होती. याचाच अर्थ त्या युगातील प्रकृतीसह सजीव सृष्टीतील प्रत्येक घटक हा सशक्त आणि मजबूत होता कारण प्रदूषणच नव्हते. त्यामुळे मुळातच निसर्ग खूपच सुदृढ होता. म्हणूनच डायनासोरसारखे प्राणी, पशुपक्षी त्यावेळेला होते. असे म्हटले जाते की पक्षी हे डायनासोरचे वंशज आहेत. पण खरंच का? जरी बरेचशे गुण पशुपक्ष्यांशी जुळत असले तरीही जेव्हा डायनासोर होते तेव्हा पक्षी नव्हते का हा एक मोठा प्रश्न आहे. हा झाला पक्ष्यांचा इतिहास. आता आपण पक्ष्यांची कथा-व्यथा आणि मानवाचा त्यांच्या प्रति असलेला उपद्वयाप जाणून घेऊया.

या पंचतत्व संतुलनाचा सर्वात मोठा घटक आहे वृक्ष-वनस्पती. निसर्गात नैसर्गिकरीत्या वृक्ष लागवड ही होतच असते; परंतु ही लागवड करण्यासाठी कोणता मुख्य घटक कार्यरत आहे तर पशू-पक्षी आणि कीटक. पंचतत्व संतुलनाचे कार्य करण्याचे उपजतच ज्ञान असलेल्या एखाद्या अध्ययनशील शेतकऱ्यासारखे त्यांच्या कळत-नकळत कार्य करण्याची कार्यक्षमता त्यांच्यात असते. ही निसर्गाचीच किमया त्या अद्भुत शक्तीने केली आहे. पक्षी आपल्याला निसर्गाच्या जवळ राहायला शिकवतात. किंबहुना पक्षी स्वतःला, निसर्गाला त्यांच्या रंगांना, पंचतत्त्वांसह ओळखतात. ते निसर्गाचा पुरेपूर आनंद घेतात.

आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण निसर्गाला हानी न पोहोचवता जगतात. पक्ष्यांकडून स्वच्छता आणि निसर्गाचा समतोल राखला जातो. निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन केले जाते. पशु, पक्षी, कीटक त्यांच्या कार्यातून बीज पेरतात. निसर्गाच्या जवळ कायमच राहतात. निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी सर्व पक्षी आपापले कार्य करतात. जमिनीवर, पाण्यात, आकाशात, सर्वत्रच. पाणपक्षी जलप्रदूषण कमी करतात. सर्व पक्ष्यांच्या स्वभावात प्रेमाची निष्ठा दिसून येते. सर्व पक्षीप्रेम, आपुलकी, काळजी यांचे सार्वत्रिक प्रतीक आहेत. निसर्गातील सात रंगांचा समतोल राखण्यासाठी मानव सोडून सर्व जीवसृष्टी त्यांचे कार्य योग्य प्रकारे करतात.

शहरात राहणाऱ्या पक्ष्यांवर प्रदूषणाचा प्रभाव तर होतच आहे पण वनांपर्यंत पोहोचलेल्या वायू प्रदूषणामुळे वनांमध्ये सुद्धा पक्ष्यांवर काय परिणाम होत आहे याचा विचार कधी कोणी केला आहे का?

शहरात होणारे ध्वनी, जल आणि वायू ही तिन्ही प्रदूषण उच्च कोटीला पोहोचली आहेत. ज्याचे परिणाम मानवासारख्या अति ताकदवर जीवावर सुद्धा होत आहेत. पक्षी तर किती लहान आहेत. जसे आपल्याकडे लहान मुलांना हार्टअटॅक यायला लागलेत तसेच आजकाल पक्ष्यांना सुद्धा हार्टअटॅक यायला लागले. हे कधी कोणाच्या लक्षात आलंय का? जे अन्न पशुपक्षी खातात ते अन्न आपण पूर्णपणे विषमय केललेच आहे. ज्याचा परिणाम आपण सुद्धा भोगतोय. आधुनिक अन्नपद्धती ही किती कमकुवत आहे हे सांगावयासच नको. अन्न प्रदूषणामुळे आपल्यावर कितीतरी परिणाम होतात, अनेक आजारांना आपल्याला सतत सामोरे जावे लागत आहे आणि तेच कुठेतरी पक्ष्यांनाही खाऊ घातले जाते. शहरांमध्ये पक्ष्यांना गाठीया खाऊ घातल्या जातात. कशासाठी तर मानवाच्या पुण्ययादीत भर पडते म्हणे. पण या तेलकट गाठीया कावळे, साळुंख्या, चिमण्या खातात. यामुळे त्यांचे पंख झडतात, त्यांना विविध आजार होतात आणि हार्टअटॅकही येतो. मग हे पुण्य की पाप? आपल्या आनंदासाठी आपण ध्वनिप्रदूषण करतो. ७ वाजता झोपणारे पक्षी यांना त्याचा किती त्रास होत असेल? आपल्यासारख्या मानवाला सुद्धा या ध्वनी प्रदूषणामुळे हृदयातील धडधड वाढणे, रक्तप्रवाह योग्यरीत्या न होणे, डोके दुखणे असे अनेक आजार होतात. मग पक्ष्यांचं काय? आपण झाडांवर लाईट लावतो, त्यावर मोठे मोठे स्पीकर्स बसवतो. झाडांवर अनेक प्रकारचे बॅनर लावले जातात, रंग दिले जातात, वायर्स लावल्या जातात. मग झाडांनी श्वास घ्यायचा कसा? वृक्ष हे पक्ष्यांचे घरकुल. मग यांनी यांचे घरकुल सोडून जायचे कुठे आणि का? थोडक्यात काय तर या पक्ष्यांची घरकुल उद्ध्वस्त करण्याचे कार्य सुसंस्कृत मानवाने स्वतःच्या आनंदासाठी हाती घेतले आहे.

उद्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपलेही घरकुल नाहीसे होऊ शकते. म्हणजेच मानवाची परिस्थिती ही शेखचिल्लीसारखी आहे. आपले सण हे या जीवांसाठी घातक होतात की काय? कारण आपले सण साजरे करण्याची व्याख्याच बदलली आपण. सगळ्या प्रकारच्या प्रदूषणाचे एकत्रीकरण म्हणजे सण असं झालंय. मानवाने केलेल्या प्लास्टिक वापराचा अतिरेक सर्वच सजीव सृष्टीला भोगावा लागत आहे. मग पक्षी कसे सुटतील? बऱ्याचदा कोंबड्या, समुद्रावरील पक्षी यांची पिल्लं यांच्या पोटात हे प्लास्टिक अन्न-धान्याबरोबर जात असते. त्यामुळे यांच्या अन्नपचन करणाऱ्या अवयवांना हानी होते, यांची अन्नपचन क्रिया बिघडते, यांचे पंख उडण्याची क्षमता गमावून बसतात.

बऱ्याचदा प्लास्टिक जाळीमध्ये या पक्षांची चोच, पंख, पाय जखमी होतात. जर प्लास्टिकमुळे मानवाला कॅन्सर होतो तर पक्षी कसे सुटतील? यातून त्यांची अन्नपचनक्रिया कमकुवत झाल्यामुळे त्यांना अनेक आजार होतात आणि त्यांचा मृत्यू होतो. समुद्र, नद्या, नाले यातील प्लास्टिकमुळे मासे, जलपर्णी, जलपक्षी यांच्यासाठी मृत्यूला आमंत्रणच असते.
मला आठवते की, माझ्या लहानपणी मी प्रातःकाळी आणि सायंकाळी कायम पक्ष्यांचे गीत ऐकायचे जे आता सायंकाळी अजिबात ऐकू येत नाही. का बरे? सकाळी आनंदाने गात उठणारे पक्षी सायंकाळी का बरं कोमेजून जातात? जरी निसर्ग त्यांना सायंकाळच्या सूचना देत असलं तरी मानवाची तर सकाळ झालेली असते. त्यांचं नाईटलाइफ सुरू झालेलं असतं. या थकलेल्या पक्ष्यांनी शहरी वातावरणात गलिच्छ ध्वनी वायू प्रदूषणात जायचं कुठे? कुठे जाऊन त्यांनी त्यांचा थकवा घालवायचा?

नद्यांमध्ये कारखान्यातील पाणी सोडणे, गटारांमध्ये कचरा तुंबवणे, सर्व कचरा समुद्रावर टाकणे, नदी-नाले सर्व प्रदूषित करणे हा तर जणू काही आपला हक्कच झाला आहे. सर्व प्रकारचे जल प्रदूषणाचे प्रकार आपण अगदी मन लावून करत असतो. मग या पक्ष्यांनी पाणी कोणते प्यायचे? डम्पिंग ग्राऊंड तर सर्व प्रदूषणाचे स्रोतच आहे. समुद्र, नद्या, तलाव यांत सर्व सजीव सृष्टी आणि पंचतत्त्व संतुलनासाठी असणारी पोषक तत्त्व म्हणजेच खनिजे मानवनिर्मित प्रदूषणामुळे नष्ट होत आहेत. या पक्ष्यांचे आपल्या हिंदू धर्मात आध्यात्मिक महत्त्वसुद्धा खूप आहे. वेदांमध्ये, महापुराणांमध्ये पक्ष्यांचा संदर्भ अनेक ठिकाणी आला आहे. विष्णूचे वाहन गरूड, कार्तिकेयचे मोर, सरस्वतीचे हंस तर लक्ष्मीचे घुबड आहे. अनेक पौराणिक कथा या पक्ष्यांभोवती गुंफल्या गेलेल्या आहेत. शुक मुनी म्हणजे व्यासांचे पुत्र शुकचा अर्थ पोपट असा होतो.

शुकमुनी हे भागवत पुराणाचे निवेदक होते. पोपटाची ग्रहण शक्ती आणि वाक्चातुर्य सर्वांना माहीत आहे. शुक मुनींचा चेहरा हा पोपटाचा दाखवलेला आहे. जन्मतःच वेदाचे पाठांतर ते घेऊन आले. कारण त्यांचे वेदांचे ज्ञान उच्च कोटीचे होते. पक्ष्यांना आपले आत्मस्वरूप आपला आत्मप्रवास, ज्ञानार्जन अशा स्वरूपात दाखवले गेले आहे. यजुर्वेदामध्ये वैदिक पक्षी म्हणजे ‘सुवर्णपक्षी’ याचा उल्लेख आहे. जो पक्षी चांगले कर्म करणाऱ्याला स्वर्गात घेऊन जातो, तो आपल्या ग्रंथांमध्ये पक्ष्यांना मारणे, त्यांना खाणे हे पाप म्हटले आहे. आता गीता, वेद, पुराण सर्वच वाचन बऱ्यापैकी बंद पडले आहे, तर पर्यावरण संतुलन म्हणजे काय, हे समजेल का?

जे पक्षी तुम्हाला नैसर्गिक आपत्तीपासून सावध करतात, त्या पक्ष्यांचे जगण्याचे हक्कच तुम्ही काढून घेतलेत, तर त्यांनी जायचं कुठे? मृत्यूशिवाय त्यांना पर्यायच नाही ठेवला. म्हणूनच मी नेहमीच म्हणते की, आता तरी आपण निसर्गाच्या सानिध्यात राहून, निसर्ग नियमानुसार वागायला हवे. ज्या दिवशी आपण या निसर्गाप्रती सकारात्मक होऊ, तेव्हाच या जननीला वाचवू शकू. या पृथ्वीला वाचवायचे असेल, तर मानव हा सर्वात मोठा दुवा आहे. जो हे कार्य सकारात्मकतेने करू शकतो. आधुनिकीकरणाच्या नावाखाली मानव विचारहीन होत चालला आहे. निसर्ग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तो वाहत चालला आहे. ज्याचा शेवट हा पृथ्वीचा अंतच आहे. प्रदूषण काही निसर्गाने निर्माण केलेले नाही. प्रदूषण आपण निर्माण केले आहे.

या सर्व प्रदूषणामुळे जर पक्षी नाहीसे झाले, तर काय होईल? आजच्या घडीला किती तरी जीव नामशेष झाले आहेत. आता पक्षीसुद्धा बऱ्यापैकी नामशेष झालेले आहेत. काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. उद्या हीच वेळ हळूहळू आपल्यावर सुद्धा येईल. या पृथ्वीचे अस्तित्व नामशेष करणारा सजीव सृष्टीतला सर्वात मोठा घटक हा मानवच असणार आहे. मग? आपल्याला याचा गंभीरपणे विचार करावाच लागेल. एक न अनेक समस्या आहेत. ज्या त्या बिचाऱ्यांच्या वाट्याला या मानवाने दिल्यात. पण आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की, या सजीवसृष्टीतील नैसर्गिक संतुलन करणारा विश्वातील मानवानंतर पक्षी हा महत्त्वाचा घटक आपण जर गमावला, तर पर्यावरण संतुलन पूर्णपणे ढासळेल. म्हणून हे पक्षी काहीही करून संरक्षित करावेच लागतील आणि ही सर्वस्वी जबाबदारी आपलीच आहे.

dr.mahalaxmiwankhedkar@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -