Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीतैलबैला सुळक्याच्या चारही बाजूंवर ‘मॅकविला’ची थरारक चढाई

तैलबैला सुळक्याच्या चारही बाजूंवर ‘मॅकविला’ची थरारक चढाई

गौसखान पठाण

सुधागड-पाली : सुधागड तालुक्यातील धोंडेस गावापासून काही अंतरावर व सुधागड किल्ल्याच्या समोर आणि मुळशी तालुक्यात २३० फूट उंचीचा तैलबैला हा सुळका आहे. वर्षाअखेर या अवघड सुळक्याच्या चारही बाजूंवर ‘मॅकविला द जंगल यार्ड’च्या टीमने दोन दिवस थरारक यशस्वी चढाई केली आहे. यामध्ये महिला गिर्यारोहकाचा समावेश होता.

सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द गावचे सुपूत्र व ‘मॅकविला द जंगल यार्ड’चे संस्थापक मॅकमोहन हुले यांनी रविवारी (ता. २) माहिती देताना सांगितले की, या सुळक्याचा ९० अंशांतील कातळकडा आणि अंतिम टप्प्यातील अवघड चढाईमुळे गिर्यारोहकांचा पूर्णपणे कस लागला. तैलबैला हा किल्लेवजा सुळका असून तो प्रस्तरारोहणासाठी अतिशय कठीण श्रेणीमध्ये ओळखला जातो. या नैसर्गिक भिंतीवर चारही बाजूंनी आरोहण करता येते. अनुभवी प्रस्तरारोहक मॅकमोहन यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम फत्ते करण्यात आली. अनुभवी गिर्यारोहक आपल्या तंत्रशुद्ध अभ्यासासहित तेलबैला सरावासाठी मोहिमा आखतात, असेही मॅकमोहन यांनी सांगितले. या मोहिमेत मॅकमोहन हुले, सागर मेस्त्री, आयुष सिंग व शोभा मोहपात्रा हे प्रस्तरारोहक सहभागी झाले होते.

दुसरी प्रस्तरारोहण चढाई

तेलबैलाच्या मध्यस्थानी मंदिराकडील डाव्या बाजूची प्रस्तरारोहण चढाई प्रथम श्रेणीतील आहे. गिर्यारोहक आयुष सिंग यांनी लीड क्लायम्बिंग करून पहिले स्टेशन गाठले. त्यांना सुरक्षादोर मॅकमोहन यांनी दिले. शोभा यांनी त्यांच्या मागोमाग चढाई केली. अशा प्रकारे दुसरे स्टेशन तसेच तिसरे स्टेशन करत अंतिम टप्प्यात माथा गाठला.

पहिली प्रस्तरारोहण चढाई

मॅकमोहन हुले यांनी सांगितले की, तैलबैलाची उजवीकडील बाजू सर्वात कठीण आणि चौथ्या श्रेणीत गणली जाते. सर्वप्रथम सागर मेस्त्री या अनुभवी गिर्यारोहकाने प्रस्तरारोहण चढाईला सुरुवात केली. ते ८० फुटांवरील पहिल्या स्टेशनला पोहोचले. त्यांना सुरक्षादोर आयुष सिंग यांनी दिले. सागर यांच्यापाठोपाठ आयुष सिंग हेसुद्धा पहिल्या स्टेशनला पोहोचले. नंतर मॅकमोहन हे सर्व दोर सोडवत पहिल्या स्टेशनवर पोहोचले. आयुष सिंग यांना पुढचा टप्पा अवघड जाणार म्हणून त्यांनी रॅपलडाऊन केले. पुढील चढाई मॅकमोहन यांनी लीड केली व दुसरे स्टेशन तसेच तिसरे स्टेशन करत अंतिम टप्प्यात पोहोचले.

तिसरी प्रस्तरारोहण चढाई

सुधागड किल्ल्याकडील बाजू अवघड असून ही तिसऱ्या श्रेणीत गणली जाते. सर्वप्रथम चढाई करण्यासाठी मॅकमोहन यांनी तयारी केली. त्यांना सागर मेस्त्री यांनी सुरक्षादोर दिला. प्रथम ५० फुटांचा कातळकडा चढून मॅकमोहन प्रस्तराच्या कंगोऱ्यावर पोहोचले. त्यापाठोपाठ झुमरिंग करत सागर मेस्त्री तेथे दाखल झाले. पुढील ९० अंशातील कातळकडा चढताना मॅकमोहन यांचा कस लागला. तिरक्या रेषेत चढाई करत त्यांनी ८० फुटांवर दुसरा टप्पा घेतला. त्यानंतर पुढील ३० फूट आणि ५० फुटांवर मॅकमोहन पोहोचले. ५० फुटांची अंतिम चढाई पूर्णपणे दगड, मातीमिश्रित ठिसूळ संरचनेची (स्क्री) आहे. त्यामुळे या मार्गात अत्यंत सावध राहत आणि दगड ढासळणार नाहीत, याची काळजी घेत मॅकमोहन सुळक्याच्या माथ्यावर पोहोचले.

पाठीवरील बॅगमध्ये दोन लिटर पाणी व पौष्टिक आहार असावा – मॅकमोहन हुले, प्रस्तरारोहक

थंडीच्या दिवशी सुळक्याभोवती खूप सोसाट्याचा वारा असतो. थंडीमुळे अंगावरील कपडे हे संपूर्ण शरीर झाकेल, असे उबदार असावेत. पाठीवरील बॅगमध्ये दोन लिटर पाणी व पौष्टिक आहार असावा. प्रस्तरारोहण करताना ऊर्जा मिळते.
– मॅकमोहन हुले,
प्रस्तरारोहक

चौथी प्रस्तरारोहण चढाई

तेलबैलाच्या मध्यस्थानी मंदिराकडील उजव्या बाजूची प्रस्तरारोहण चढाई दुसऱ्या श्रेणीत गणली जाते. मॅकमोहन यांनी प्रथम प्रस्तरारोहण चढाईला सुरुवात केली. त्यांना सुरक्षादोर सागर मेस्त्री यांनी दिले. अंतिम टप्प्यापर्यंत दोघांनी सुरक्षित आरोहण केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -