Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरकेळी बागा उद्ध्वस्त करण्याचा डाव सुरूच

केळी बागा उद्ध्वस्त करण्याचा डाव सुरूच

नालासोपारा येथे शेती माफियांकडून केले जाते नुकसान

कीर्ती केसरकर

नालासोपारा : गेल्या अनेक वर्षांपासून नालासोपारा पश्चिमेला असलेल्या गावांमध्ये केळीच्या बागांचे नुकसान करून शेतकऱ्यांना हैराण केले जात आहेत. असे अनेक शेती माफीया आहेत, जे मनमानी कारभार करत रात्रीच्या वेळेस केळीच्या बागा उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत.

नालासोपारा पश्चिम आणि विरार पश्चिमेला मोठ्या प्रमाणात केळीच्या बागा आहेत. यामध्ये शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून मेहनत करून शेती करत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहेत; परंतु या गावांमध्ये अजूनही जमिनींचे सातबारा एकच असल्याने कोणीही येऊन या जमिनीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

जमिनीची वाटणी अद्यापही व्यवस्थितरीत्या झालेली नाही. जमिनीचे सातबारे यांवर गावातील सर्वांची नावे असल्याने ज्यांना शेतीवर कब्जा मिळवायचा असेल, त्यांच्याकडून या ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांचे नुकसान करण्यात येत आहे. सध्या जमिनीचे दर हे वाढलेले आहेत. याचबरोबर या परिसरामध्ये पर्यटकांची ये-जासुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने जे नागरिक शेती करत नाहीत त्यांच्याकडून या ठिकाणी येऊन नुकसान केले जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

सातबाऱ्याचा प्रश्न लवकर सोडवावा

गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा ऐरणीवर आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी असेच केळीच्या बागांचे नुकसान करून त्या जमिनीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न नागरिकांकडून केला जात होता. पुन्हा अशीच घटना मंगळवार रात्री घडली आहे. यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून प्रशासनाने याकडे लक्ष देत लवकरात लवकर सातबाऱ्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -