Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणरायगड ते काणकोण परिक्रमेचा पाचवा टप्पा सुरू

रायगड ते काणकोण परिक्रमेचा पाचवा टप्पा सुरू

विविध मत्स्यपालन योजना आणि उपक्रमांचा लाभ मिळवून देऊन त्यांची उन्नती साधण्याचे उद्दिष्ट

अलिबाग (प्रतिनिधी) : सागर परिक्रमा उपक्रमाचा पाचवा टप्पा सुरू करण्याची घोषणा, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने केली आहे. महाराष्ट्रात रायगडहून १७ मे रोजी ही परिक्रमा सुरु झाली आणि १९ मे २०२३ रोजी गोव्यातील काणकोण येथे ती संपेल.

रायगड ते काणकोण या पट्ट्यातील मच्छिमार आणि तर मत्स्यव्यावसायिक तसेच संबंधितांच्या समस्या जाणून घेणे, प्रधानमंत्री मत्स्य संपदा आणि किसान क्रेडिट कार्ड यांसारख्या विविध मत्स्यपालन योजना आणि उपक्रमांचा लाभ मिळवून देऊन त्यांची उन्नती साधणे हे या परिक्रमेच्या पाचव्या टप्प्याचे उद्दिष्ट आहे.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्यासह विविध प्रतिष्ठित मान्यवर, तसेच विविध सरकारी संस्था, संघटना आणि आस्थापनांचे अधिकारी, परिक्रमेच्या या पाचव्या टप्प्यात सहभागी होणार आहेत. ही सागर परिक्रमा म्हणजे, भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त साजऱ्या झालेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ मागील भावनेचे स्मरण करत, आपले स्वातंत्र्यसैनिक, खलाशी आणि मच्छीमारांचा सन्मान करणारी, तसेच मच्छीमार, मत्स्य शेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि इतर संबंधितांप्रती दर्शवल्या जाणाऱ्या एकतेचे प्रतीक आहे.

गुजरात, दमण आणि दीव, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील १९ ठिकाणे समाविष्ट करून चार टप्पे यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.

कोकणच्या संस्कृतीची ओळख वाढेल
परिक्रमेच्या या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे, तर गोवा राज्यामधील वास्को, मुरगाव आणि काणकोण अशा एकूण सहा स्थानांचा समावेश असेल. ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेल्या महाराष्ट्रात, सागरी मत्स्यपालनाची प्रचंड क्षमता आहे.

शासनाची मदत
या प्रवासादरम्यान मच्छीमार, किनारपट्टीलगत मासेमारी करणारे मच्छीमार, मत्स्यपालन करणारे शेतकरी आणि युवा मत्स्य उद्योजकांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि किसान क्रेडीट कार्ड योजनांसह राज्य सरकारच्या योजनांशी संबंधित प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत. यासोबतच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, राज्य सरकारच्या योजना, ई-श्रम, मत्स्य्योद्योग आणि मत्स्यपालन पायाभूत सुविधा विकास निधी, किसान क्रेडिट कार्ड या आणि अशा संबंधित योजना आणि उपक्रमांविषयीच्या माहितीपूर्ण साहीत्याचा मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरून तसेच, चित्रफिती आणि डिजिटल प्रचार मोहिमेच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात प्रचार केला जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -