Sunday, May 5, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यचाकरमान्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे

चाकरमान्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे

  • रवींद्र तांबे

खेडेगावात शिक्षण घेऊन नोकरी नसल्यामुळे एखाद्या शहरात जाऊन नोकरी करणाऱ्या व्यक्तीला गावकरी लोक चाकरमानी असे म्हणतात. कारण गावापासून शहरापर्यंत त्याची सर्व जबाबदारी असते. त्यामुळे तो एक कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारीने वागत असतो. आता जरी मोबाइलच्या दुनियेत वावरत असताना एक वेळ ‘मदर सीरियस, स्टार्ट इमिजिएटली’ अशी तार आली की, चाकरमानी बाबलो आपल्या परिसरातील माकडवाल्यांजवळून व्याजाने पैसे घेऊन लाल परीने गावी जात असे. तसेच, कोणताही सण असो न चुकता नेहमीपेक्षा जास्त गावी मनिऑर्डर पाठवली जायची. त्यामुळे मनिऑर्डर आल्यानंतर सण आहे हे समजायचे. बऱ्याच वेळा जर सणाविषयी शेजाऱ्याने विचारले तर समोरून उत्तर यायचे अजून चाकरमान्यांनी कळवूक नाय आसा. म्हणजे समजायचे अजून मनिऑर्डर आलेली नाही. इतकेच नव्हे, तर कोण आजारी पडला तरी त्याचो सगळो खर्च चाकरमानी करता असे. एखाद्याचो लाग्नाचो सुद्धा थोडोफार खर्च उचलता. काही वेळा नातेवाईक आजारी जरी पडलो तरी त्याका बघुक गेल्यावर त्याच्या खिशात शे-पाचशे रुपये टाकूक विसरूचो नाय. त्यामुळे गावामध्ये कोणत्याही प्रकारची पैशा-अडक्याची सोय नसल्यामुळे चाकरमानी हा कुटुंबाची बँक समजली जायची. म्हणजे असे म्हणता येईल की, मोबाइलच्या दुनियेमुळे तारसेवा बंद पडली. तसेच बँकिंग सेवा झाल्याने मनिऑर्डर सेवेकडे लोकांनी पाठ फिरवली. तेव्हा मनिऑर्डर सेवेत सुधारणा करून तार सेवा बंद करण्याची वेळ भारत सरकारवर आली. आधुनिक तंत्रज्ञानामुळे एक मशीन अनेक लोकांचे काम बिनचूकपणे करू लागल्यामुळे राज्यात नव्हे तर देशात सुशिक्षित बेकारीचे प्रमाण वाढत आहे. हे विकसनशील देशाच्या विकासाच्या दृष्टीने घातक आहे. आता तर घरबसल्या सर्वकाही ‘मोबाइल’ असे झाले आहे. यात चाकरमान्याचो जीव खासावीत होताना दिसतो. कारण दिवसेंदिवस त्यांच्या डोक्यावर कर्जाचो डोंगर वाढत असताना दिसतो. त्यात वाढती महागाई यामुळे चाकरमान्याची अधिक होरपळ होताना दिसते.

तरी किती काय झाला तरी मे महिन्याच्या सुट्टीत चाकरमानी पोरांका घेऊन न विसरता गावाक येता. जवळजवळ पंधरा ते वीस दिवस राहून नंतर आपल्या रोजी-रोटीसाठी शहरातील आपण राहात असलेल्या ठिकाणी जातो. आता लवकरच मुलांच्या शाळा प्रवेशाची लगबग चालू होईल. सध्या मात्र चाकरमान्याची परिस्थिती वेगळी आसा. त्याचो संसार, गाव, घर आणि पै पावणे सांभाळत इतकेच नव्हे तर गावच्या लोकांचे मोबाइलचे रिचार्ज सुद्धा ते करतात. अशा अनेक कारणांमुळे चाकरमान्याच्या डोक्यावर कर्जाचे ओझे झाले आहे. त्यात वाढती महागाई यामुळे अधिक जेरीस आला आहे. आपण कुटुंबासाठी खूप काही केले. मात्र कोरोना काळात गावी गेल्यावर गावच्या शाळेत किंवा समाज मंदिरात १४ दिवस काढावे लागले, याची खंत त्याना आजही होत आहे. त्यावेळी जवळचे लोकसुद्धा घर बंद करून घरात बसले होते. त्यांच्या मनात आठवले की, ‘कुणी नाही कुणाचे’ आता तर एक एक खासगी कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे. तर काही १८ वर्षांपूर्वी शासकीय सेवेत लागून सुद्धा निवृत्ती वेतनाची टांगती तलवार आहे. हंगामी भरती त्यात दाम कमी, याचा फटकाही चाकरमान्यांना बसत आहे. काहींनी प्रपंच सांभाळत मुलांना पदवीपर्यंत शिक्षण दिले. मात्र त्यांच्या शिक्षणाच्या मानाने नोकरी मिळत नाही. काही ठिकाणी पदवीधर असून सुद्धा बसून पोसण्याची वेळ चाकरमान्यांवर आली आहे. त्यात घरात एकटा कमावणारा, त्यात मुलांचा शाळेतील खर्च, औषधे, किराणामाल, इस्त्रीवाला असा वाढता खर्च. यात चाकरमानी खचून गेलेला दिसतो. कोरोना काळात आपल्या गावी जाणारे चाकरमानी त्यांना त्यावेळची आठवण आली की, त्यांच्या डोळ्यांत आजही पाणी येते.

आता मात्र चाकरमान्याच्या घरातील प्रत्येकांने चाकरमान्यांच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी आपण त्यांच्या जीवावर जी पैशांची उधळपट्टी केली त्याला आता आळा घातला पाहिजे. शेवटी चाकरमानी सुद्धा एक माणूस आहे. सर्व काही करता येते, मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. तो टिकायचा असेल, तर आपण पण त्याला आधार दिला पाहिजे. घरातील प्रत्येक व्यक्तीने त्यांना समजून घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. एवढे करून सुद्धा बरेच लोक म्हणतात, माझ्यासाठी त्यांनी काय केले. त्याचप्रमाणे मुलाबाळांनी लग्नकार्य झाल्यानंतर नवीन संसार सुरू केला तरी त्यांचे उपकार विसरू नका. आता जे काय आहात, ते केवळ चाकरमान्यांमुळे. त्यांनी आतापर्यंत पैसोआडको दिल्यान तेचो डायरेत लिहिल्यान नाय. कधी बोलून दाखवल्यान नाय. तेव्हा आता त्यांना धीर देऊन त्यांना कर्जाच्या जाळ्यातून सोडविले पाहिजे. तरच उद्या चाकरमानी तर्तोलो नाही तर शेतकऱ्यांसारखी त्याच्यावर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ येईल. हे टोकाचे पाहूल चाकरमान्याने उचलण्यापूर्वी आपण सर्वांनी त्यांना कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढले पाहिजे. कारण आजही गावापासून शहरापर्यंत सर्वांचा पालनकर्ता चाकरमानी आहे, हे विसरून चालणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -