Sunday, May 5, 2024

Dnyaneshwari : दीपतेज

  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

ज्ञानेश्वरी हा सुंदर ग्रंथ!, त्यातही विशेष म्हणजे यातील दाखले.
श्रद्धेचे तीन प्रकार होतात – सात्त्विक, राजस आणि तामस.
रंगतदार शिकवण हे ज्ञानेश्वरीचं खास वैशिष्ट्य आहे.
‘पैं एक दीपु लावी सायासें।
आणिक तेथें लाऊं बैसे।
तरी तो काय प्रकाशें।
वंचिजे गा?’

ज्ञानेश्वरी हा सुंदर ग्रंथ! याची सुंदरता कशात आहे? त्यातील तत्त्वज्ञानात, भाषेच्या श्रीमंतीत, काव्यमय रचनेत, रसाळपणात ! हे सारं आहेच. त्यातही विशेष आहेत यातील दाखले. ज्ञानदेव विचार स्पष्ट करण्यासाठी दृष्टान्तांची अशी अप्रतिम मालिका पुढे ठेवतात की अहाहा ! ती वाचताना तत्त्वविचार उलगडतो. पुन्हा मनाला आगळा आनंदही मिळतो. याचा अनुभव देणाऱ्या सतराव्या अध्यायातील काही ओव्या पाहूया आता.

या भागात सांगितलं आहे की, श्रद्धेचे तीन प्रकार होतात – सात्त्विक, राजस आणि तामस. यातील सात्त्विक श्रद्धेविषयी सांगताना येतो पुढील दाखला.

‘हे पाहा, एखादा मनुष्य मोठ्या प्रयासाने दिवा लावतो आणि त्या दिव्यावरून जर दुसरा कोणी दिवा लावू लागला तर, तर तो दिवा त्याला फसवील काय?’ (त्याच्या घरी उजेड पाडणार नाही असे होईल काय?) ही ओवी अशी –

‘पैं एक दीपु लावी सायासें। आणिक तेथें लाऊं बैसे।
तरी तो काय प्रकाशें। वंचिजे गा?’ ओवी क्र. ८८

‘वंचिजे गा’ या शब्दाचा अर्थ आहे ‘फसवील काय?’. काय सांगायचे आहे या ओवीतून? सात्त्विक बुद्धीने केलेल्या आचरणाचं महत्त्व.

या दाखल्यातील दिवा म्हणजे सात्त्विक बुद्धी होय. प्रयत्नाने दिवा लावणारा म्हणजे प्रयत्नपूर्वक वेद, शास्त्र यांचा अभ्यास करून सात्त्विकतेने वागणारा माणूस. त्या दिव्यावरून स्वतःचा दिवा लावणारा म्हणजे असा अभ्यास न करता सात्त्विक वागणूक ठेवणारा माणूस होय. दिवा हा प्रकाशाचे प्रतीक. तो कोणताही भेदभाव न करता सर्वांना प्रकाशित करतो. त्याप्रमाणे सात्त्विक श्रद्धा आहे. तिच्यानुसार वागणाऱ्याला तिचा लाभ होतो. मग तो ज्ञानी असो, की अज्ञानी असो.

ह्या एका दाखल्यातूनही वेदांची शिकवण स्पष्ट होते. पण ज्ञानदेवांमधील समाजसुधारक, सच्चा शिक्षक, कवी इथेच थांबत नाही. यापुढे ते एकापेक्षा एक सरस असे दृष्टान्त योजतात. ते असे –

‘एकाने बांधलेल्या घरात राहण्याचं सुख दुसऱ्याला येतं नाही काय? तळे बांधणाऱ्याचीच तहान त्यातील पाण्याने भागते काय? घरात स्वयंपाक करणाऱ्याचीच त्या अन्नाने तृप्ती होते, इतरांची होत नाही काय?’

दिवा, घर, तळं आणि अन्न ह्या गोष्टी सर्वांशी समतेने वागतात. त्यांच्यासाठी प्रयत्न न करणाऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा मिळतो. त्याप्रमाणे प्रयत्नपूर्वक वेद, शास्त्र यांचा अभ्यास करून सात्त्विकतेने वागणाऱ्याला त्याचा लाभ होतो. तसेच अभ्यास न करता सात्त्विक वर्तन करणाऱ्यालाही त्याचं फळ मिळतं. या दृष्टान्तातून ज्ञानदेव श्रोत्यांच्या मनावर शिकवण बिंबवतात. विशेष म्हणजे त्यासाठी अगदी साधे, सोपे दाखले योजतात. तसेच प्रत्येक ओवीच्या शेवटी प्रश्न विचारतात, जसे ‘नाही काय?’ या प्रश्नातच होकार दडलेला असतो. यामुळे विचारांची खुमारी वाढते. ही रंगतदार शिकवण हे ज्ञानेश्वरीचं खास वैशिष्ट्य आहे. रुक्ष वाटणारं तत्त्वज्ञान व्यासमुनींच्या प्रज्ञेने सूत्रमय करून बीजरूपात गीतेत मांडलं. तेच ज्ञान ज्ञानदेवांनी वृक्षरूपात रंगतदार करून सादर केलं. म्हणून संधी मिळेल तेव्हा आपण बीजरूप गीतेचा अभ्यास करूया. वृक्षरूप ज्ञानेश्वरीचा आनंद घेऊया..
नमन व्यासदेवा !
नमन ज्ञानदेवा !

manisharaorane196@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -