Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणबारसूमधील आंदोलकांना पोलिसांनी अडवले

बारसूमधील आंदोलकांना पोलिसांनी अडवले

खासदार विनायक राऊत यांच्यासह ७ जण ताब्यात

राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. आजही आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम होते. मात्र काही वेळापूर्वी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. अखेर आंदोलकांना पोलिसांनी अडवले आणि वातावरण निवळले.

बारसू रिफायनरीला विरोध करणा-या स्थानिकांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. दरम्यान, बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलनादरम्यान ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर राजन साळवी त्यांच्या भेटीसाठी पोलीस ठाण्यात पोहोचले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, सोलापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्प जेथे होणार आहे तेथील माती परीक्षणाला जोरदार विरोध होऊ शकतो. ही सर्व शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या कोकणातल्या माळारानावर एका बाजूला विरोधक आणि दुसऱ्या बाजूला पोलीस आमनेसामने उभे असल्याचे चित्र दिसत आहे.

सोमवारपासून या रिफायनरी संदर्भात ड्रिलिंग करून मातीचे परिक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने सगळ्या परिसरात कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू झाली आहे.

दरम्यान, हा तणाव का निर्माण झाला आहे, याच्या खोलाशी जाणे गरजेचे आहे. विद्यमान खासदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री आहेत. ठाकरे स्वत: पत्र देऊन उघडे पडल्याने काही करुन या प्रकल्पामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

लोकांची डोकी भडकवण्याचे काम सुरु आहे. बाहेरचे लोक आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलकांचे काहीही म्हणणे असले तरी सरकार चर्चेसाठी तयार आहे, चर्चेतून मार्ग निघेल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -