Monday, May 20, 2024

धाडस

गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी

नव्या वर्षात प्रत्येकाने काही संकल्प सोडले असतील. ते पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे धाडस हवे. तडजोड करून जगण्यापेक्षा परिस्थितीवर मात करा. परिस्थिती बदला. जगात जे जे नवनिर्माण झाले आहे ते धाडसामुळेच! टेक रिस्क. जोखीम पत्करल्याशिवाय प्रगती होत नाही, पाहिजे ते मिळत नाही.

वर्क इज वर्कशीप’ या पुस्तकातले उदाहरण – मी नव्याने धंद्यात पाऊल टाकत होतो. पेप्सी कंपनीचे अध्यक्ष कोलोराडो विद्यापीठात येणार, हे कळल्याने मी त्यांच्या सचिवाला गाठून भाषणानंतरची १५ मिनिटे घेतली. भाषण संपता संपेना, मला दिलेल्या १५ मिनिटांतील पाच मिनिटे संपल्यावर मी माझ्या व्हिझिटिंग कार्डवर मुलाखतीची आठवण लिहून, मंचावर जाऊन त्यांना कार्ड दिले. त्यांनी लगेच भाषण आटोपते घेतले. दरवाजा बंद करून माझ्याशी दहा मिनिटांऐवजी अर्धा तास बोलले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली, “मी त्यांना थांबविण्याचे जे धाडस केले ते कुठेही, विशेषतः धंद्यात महत्त्वाचे आहे. धाडस केल्याने तुमचं पाऊल क्षणभर घसरू शकेल. पण धाडस केले नाही, तर तुम्ही स्वतःला हरवून बसाल.” आपली पात्रता नाही, मला जमणार नाही हे नकारात्मक विचार बाजूला ठेवा. तुम्ही तुम्हाला येणाऱ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा नि पुढे चला.

नंदुरबारमधून उचललेले पाऊल विदेशापर्यंत पोहोचविलेल्या ‘स्पा अॅण्ड वेलनेस’च्या उद्योजिका, ‘ग्लोबल वेलनेस अॅम्बेसेडर’ रेखा चौधरी यांची भरारी स्वशब्दांत – “१८व्या वर्षी लग्न, मातृत्व, घरबसल्या नाना व्यवसाय-उद्योग चालू असतानाच, लहानपणापासून आवड असलेल्या सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात काहीतरी करायचे हे मनाशी होतेच. संधी मिळताच सौंदर्यप्रसाधनाचा एक वर्षाचा कोर्स एका महिन्यात पूर्ण केला. घरात कुणाचे मत बदलले तर? मनात कसलाही न्यूनगंड न ठेवता शहरात आल्यावर सौंदर्यक्षेत्रात पाय रोवण्यासाठी, शहराची ओळख, इंग्रजी भाषा, गावरान पोशाख या साऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी कोणत्याही क्लासला न जाता कान, डोळे, मन उघडे ठेवून शिकले. मुख्यतः सौंदर्योपचार तंत्राचे माझे ज्ञान चांगले होते. व्यवस्थित समजावून देण्याने माझ्याकडे बघायचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. रेमीक्यूलरच्या माध्यमातून फ्रान्सला गेले नि पुढे व्यक्तिमत्त्व घडत गेले.” रेखाताई म्हणतात, “नवा उद्योग सुरू करण्यासाठी वय, पैसा, शहर, शिक्षण, भाषा या कशाचेही बंधन नसते. महत्त्वाची असते ती जिद्द, महत्त्वाकांक्षा, चिकाटी आणि धाडस.”

ऑनलाइन जगात आजचे विद्यार्थी हे पराक्रमी महापुरुषांच्या धाडसी कथा चित्रपटांत टेक्निकद्वारे पाहतात. ‘लाथ मारीन तेथे पाणी काढीन’ असा स्वतःवर आत्मविश्वास हवा. बौद्धिक, शारीरिक, काल्पनिक, मानसिक हे धाडसाचे चार प्रकार. आपण एकत्रित धाडसाचे रूप पाहतो. दैनंदिन जीवनात सारेच सशक्त बनून दृश्य-अदृश्य अडथळे धाडसाने दूर करतो. १) संकट काळात जनतेला मदत करणारे युवक, २) लोकांच्या हक्कासाठी लढणारे नेते, ३) स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्रसैनिक, ४) जनतेच्या भल्यासाठी लढणारे सुधारक, ५) सत्य बोलणारे महापुरुष. ही सारी उदाहरणे धाडसाची होय.

काळानुसार समाजातील प्रश्न बदलतात. आज तृतीयपंथीयांना उशिरा का होईना ओळख मिळाली, हक्क मिळाले. तरीही समाजाचा एक भाग म्हणून त्यांचा स्वीकार झालेला नाही. जनता आणि त्यांच्यात भिंत उभी आहेच. विविध सामाजिक-धार्मिक कार्यात, नोकरीत तृतीयपंथीयांना सहभागी करून घ्यावे, यासाठी कृपाली बिडयेने त्यांच्याशी मैत्री करून विश्वास संपादन केला. २००९मध्ये ‘आनंदी आनंद गडे’ ही चळवळ सुरू करून तृतीयपंथीयांसाठी धाडसी पाऊल उचलले.

आज अनेक जोखमीच्या पुरुष प्रधान क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढत आहे. त्याचे धाडसी, कर्तव्यदक्ष, कॅप्टन राधिका मेनन हे एक उदाहरण! मोकळ्या वेळेत सागरकिनारी भटकताना उसळणाऱ्या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीने सागर सफरीला जावे, हे बालवयातील राधिकाचे स्वप्न. मग तारुण्यात रेडिओलहरी कोर्सची पदवी घेऊन नौसेनेत जोखमीचे काम स्वीकारले. जून २०१५ला रात्रीचा ११चा सुमार. कप्तान म्हणून जहाजावर काम करणाऱ्या राधिकाच्या टीमने बंगालच्या खाडीत, वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या सात मच्छीमारांना वाचविले. विशेष समुद्रात ९ मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. वादळी वारा ७० सागरी मैल वेगाने वाहत होता. पहिले दोन प्रयत्न अयशस्वी झाले तरी मागे न फिरता तिसऱ्यांदा टीमसह पुढे गेल्या. कॅप्टन राधिका यांना ‘एक्सेप्शनल ब्रेव्हरी अॅवॉर्ड’ देण्यात आला.

चार्ली चॅप्लिनला सुरुवातीच्या काळात सिनेमाची ऑफर आली असता धाडसी चार्ली, “मी ज्या चित्रपटात काम करणार त्या चित्रपटाची कथा माझीच असणार”, असे ठणकावून सांगून घरी निघून गेले. खरे तर चार्लीकडे जागायलासुद्धा पैसे नव्हते. पण चार्ली आपल्या विचारांवर ठाम होता. त्याची अट मान्य झाली.

परंतु काही वेळा धाडसाने नुकसानही होऊ शकते. तरीही तारुण्यात पाहिजे ते मिळविण्यासाठी धाडस करावे, कारण मार्ग बदलून, नुकसान भरून काढायची तेव्हा हिंमतही असते.

ऐन तारुण्यात रामदास फुटाणे यांनी बंगला, गाडी अशी स्वप्ने न रंगवता साहित्य क्षेत्रात एक चांगला चित्रपट निघावा यासाठी ३६५ रुपयांची नोकरी सोडून दीड लाख रुपयांचा चित्रपट (‘सामना’) काढण्याचे धाडस केले. फुटाणे म्हणतात, “हा तारुण्यातला जुगार होता. ते एक धाडस होते. फक्त चित्रपट पडला, तर अंगी असलेल्या कलेतून लोकांचे पैसे मी फेडू शकेन एवढी खात्री त्या वयात होती.” रामदास फुटाणे म्हणतात, “युवकांनो! जगण्याचे तीन-चार पर्याय स्वतःला उपलब्ध करणे हे पंचविशीत/तारुण्यात शक्य असते.” सरळ मार्गापेक्षा वळण घ्या नि समृद्ध व्हा. त्यासाठी मनी धाडस हवे.
mbk1801@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -