Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीदडपशाही बंद करा; कायद्याने राज्य करा : नारायण राणे

दडपशाही बंद करा; कायद्याने राज्य करा : नारायण राणे

कुडाळ (प्रतिनिधी) :सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला अनुकूल वातावरण असल्याने सत्तारूढ पक्षाकडून सुडाचे, आकसाचे राजकारण सुरू झाले आहे. कणकवली येथील एका कार्यकर्त्याच्या हल्ल्याप्रकरणी महाविकास आघाडीकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सूडबुद्धीने सत्तेचा गैरवापर केला जात आहे. जिल्ह्यात अवैध धंदे सुरू आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पोलिसांना हाताशी धरून सत्तेचा दुरुपयोग केल्यास सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढू, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथे रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई उपस्थित होते.

जिल्ह्यात पोलिसांनी सरकारचे ऐकून जिल्ह्यात दडपशाही सुरू ठेवली, तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. केंद्रात आमची सत्ता आहे. मी केंद्रीय मंत्री आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी दडपशाही न करता कायद्याचे राज्य करावे, असा नारायण राणे यांनी यावेळी राज्य सरकारला दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायती आणि जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या बाजूने विजयाचा कौल मिळणार आहे. तसे वातावरण तयार झाल्याने जिल्ह्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी हतबल झाली आहे. तिन्ही पक्ष मिळून भाजपचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना सुडाच्या भावनेतून पोलिसांच्या साथीने त्रास देत अटक करण्याचे सत्र सुरू आहेत.

कणकवलीतील एका सज्जन कार्यकर्त्याला कोणी तरी मारहाण केली, अशी बातमी आली. त्यातील आरोपी पकडले तरीसुद्धा आमदार नितेश राणे आणि जि.प.चे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांना वारंवार पोलीस ठाण्यात बोलावून विचारपूस करून अटक करण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे. हे सुडाचे व आकसाचे राजकारण आहे. पोलिसांच्या बळाचा वापर करून सत्तेचा दुरुपयोग केला जातो आहे. कुठलाही संबंध नसताना असे अटकसत्र सरकारने ताबडतोब बंद करावे. तसे न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढून जिल्ह्यातील बेकायदेशीर धंदे व भ्रष्टाचार उजेडात आणू, असेही नारायण राणे यांनी राज्यकर्त्यांना सुनावले.

यावेळी राणे यांनी राज्य सरकारचे वाभाडे काढले. सिंधुदुर्गातील जनता या दडपशाहीला जुमानणार नाही. ही निवडणूक भाजपच जिंकणार आहे. जिल्हा बँकेत भाजपचीच सत्ता येणार, यात कुणाचेही दुमत नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकार येथील जनतेला काहीही देऊ शकले नाही. दोन वर्षांत महाराष्ट्राला दहा वर्षे मागे नेले, असे नारायण राणे म्हणाले.

तुमच्याच कार्यकर्त्यांना अक्कल शिकवा

जिल्हा बँक चालवण्यासाठी अक्कल लागते, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी, संचयनी प्रकरणी घोटाळा करणारे महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये आहेत. त्यामुळे हा सल्ला त्यांनी आपल्या पॅनेलमधील कार्यकर्त्यांना दिला असावा. कारण जिल्हा बँक चालवायला, कशा प्रकारे कामकाज करणे अपेक्षित आहे, हे त्यांनी सांगितले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -