Thursday, May 2, 2024

अवकाश वसाहत

कथा: प्रा. देवबा पाटील

यक्षासोबत त्याच्या यानामध्ये दीपा व संदीप या बहीण-भावांची अंतराळयात्रा एकदम व्यवस्थित सुरू होती. त्यात ते यक्षाला काही गोष्टीसुद्धा विचारीत होते.

“अवकाशात अशी वसतिस्थाने वा वसाहती शास्त्रज्ञांनी तयार केली आहेत का?” दीपाने विचारले.
यक्ष म्हणाला, “पृथ्वीप्रमाणेच स्थिती असणारे छोटे-छोटे कृत्रिम उपग्रह तयार करायचे आणि ते पृथ्वीभोवती किंवा सूर्याभोवती फिरत राहतील, असे अवकाशात सोडायचे, अशी शास्त्रज्ञांची योजना आहे. अशा त­ऱ्हेने आधी पृथ्वीभोवती व नंतर सूर्यमालेत अशा अनेक अवकाश वसाहती निर्माण करावयाच्या अशा वैज्ञानिकांच्या योजना आहेत. चंद्रावर अशी वसतिस्थाने करावयाचा शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. मंगळ व गुरू यांच्यामधील पोकळीत जे खडक-दगडांचे असंख्य लघुग्रह आहेत. त्यांना अग्निबाणांच्या साहाय्याने एकत्र आणायचे व कृत्रिम गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने त्यांना एकत्र जोडून त्यांपासून नवीन मोठे ग्रह तयार करायचेत. त्यांना अवकाश वसतिस्थाने म्हणून वापरायचे, अशाही शास्त्रज्ञांच्या योजना आहेत.”

“तुम्ही आताच मानवाच्या दुरुपयोगी वापराची गोष्ट केली. तसा मग मानव या कृत्रिम उपग्रहांचा नाही का गैरवापर करू शकत?” दीपाने शंका काढली.                                                                                              “फारच महत्त्वाची शंका विचारली दीपा बाळा.” यक्ष म्हणाला, “मानवाच्या संकुचित वृत्तीमुळे मानवाची प्रगती रोखली जात आहे. या उपग्रहांचा गैरवापर मानवाने सुरू केलाच आहे. उपग्रहांद्वारे शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, अवकाशातून शत्रू प्रदेशावर शस्त्रास्त्रे डागणे, दुसऱ्या देशाचे कृत्रिम उपग्रह नष्ट करणे अशा मानवाच्या आताच एकमेकांच्या विरोधात काड्या करणे सुरू झाले आहे. अशा विघातक प्रवृत्तीमुळे मानव स्वत:चा विनाशच करून घेत आहे. मानव आता अवकाश प्रदूषणही करू पाहत आहे. सध्याच अवकाशात कृत्रिम उपग्रहांची गर्दी झालेली आहे व त्यातही पृथ्वीवरील अणुभट्ट्यांमधील किरणोत्सारी कचरा मानव आता अवकाशात फेकण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे अवकाशातील वातावरण प्रदूषित होत जाईल व पर्यायाने भविष्यात ते मानवासच घातक ठरेल.”

“अंतराळ कचरा म्हणजे काय असते मग?” दीपाने पुन्हा प्रश्न उकरला.
“अवकाशात आता कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने, अवकाश प्रयोगशाळा, अवकाशस्थानके यांचीही खूप भर पडत आहे. पृथ्वीवरील अनेक देशांनी विविध शोध मोहिमांसाठी वा वेगवेगळ्या तांत्रिक कारणासांठी अवकाशात असंख्य उपग्रह सोडले आहेत. हे उपग्रह त्यांची उपयुक्तता संपल्यानंतर कालांतराने निकामी होतात. मग ते पृथ्वीभोवती दिशाहीनपणे फिरत राहतात. असे निकामी झालेले जवळपास वीस हजार उपग्रह, रॉकेट्स व तत्सम उपकरणे पृथ्वीच्या कक्षेत सतत फिरत आहेत. त्यातील काहींचे तुकडेसुद्धा झालेले आहेत. ते तुकडेसुद्धा पृथ्वीभोवती सतत फिरतच आहेत. या सा­यांना अंतराळ कचरा म्हणतात. ते एखाद्या यानाच्या वा उपग्रहाच्या मार्गात आले, तर त्या यानाचे वा उपग्रहाचे नुकसान तर होतेच. पण ते पृथ्वीवर नागरी वस्तीवर पडल्यास जीवितहानीही होऊ शकते.” यक्षाने सांगितले.

“तुमच्या पृथ्वीवर जसे वेगवेगळे देश आहेत, तसे आमच्या वसुधा ग्रहावरही निसर्गरम्य, समृद्ध नि संपन्न देश आहेत. तुमच्या पृथ्वीसारखेच वातावरण आमच्या ग्रहावरही आहे म्हणूनच तुम्ही-आम्ही जवळपास सारखेच आहोत व म्हणूनच मी प्रत्यक्ष तुमच्या पृथ्वीवर उतरू शकलो. पण एक फरक मात्र आहे तो हा की, तुमच्या पृथ्वीवरचे देश नेहमी आपसात अतिशय भांडत असतात. सतत एकमेकांच्या कुरापती काढतात. वारंवार युद्धे करतात. तसे आम्ही करीत नाही म्हणूनच तुमच्यापेक्षा आम्ही सर्वच बाबतीत जास्त सुखी, सरस, प्रगत, समृद्ध व संपन्न आहोत.” यक्षाने स्पष्टीकरण दिले.

“म्हणूनच आमचे पृथ्वीवासीय मागे आहेत,” संदीप म्हणाला.
“हो. आता बघा ना, तुमच्या पृथ्वीपासून आमचा मित्र तारा हा चार प्रकाशवर्षे दूर आहे. म्हणजे पृथ्वीवरील उपकरणांद्वारे पाठवलेला संदेश आमच्यापर्यंत पोहोचायला किमान चार वर्षे लागतील. आमची उपकरणे जरी तुमच्या उपकरणांपेक्षा अति प्रगत आहेत, पण तुमची उपकरणे तेवढी प्रगत नसल्याने आमच्याकडून दिलेले उत्तर तुमच्या उपकरणांपर्यंत यायला पुन्हा चार वर्षे लागतील. असे संदेशाच्या देवाण-घेवाणीतच आठ वर्षे निघून जातील. तोपर्यंत आम्ही आणखी प्रगत झालेले असू. आताच बघा. मी पटकन तुमच्याकडे आलो व तुम्हाला घेऊनही निघालो नि लवकरच तुम्हाला पृथ्वीवर पोहोचवूनही देणार आहे.” यक्ष म्हणाला. अशा रीतीने त्यांचे त्यावेळचे बोलणे सुरू असतानाच यक्षाला संगणकावर काहीतरी संदेश आला व त्यांचे बोलणे थांबले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -