Tuesday, August 25, 2026

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट

मुंबई : मासेमारी व्यवसायाला आर्थिक दिलासा देण्यासाठी आणि राज्यातील मच्छिमार बांधवांचे हित जपण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून, राज्यातील यांत्रिक मासेमारी नौका व मच्छीमार सहकारी संस्थांना प्रचलित किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्यावे, या प्रमुख मागणीसाठी खासदार नारायण राणे, राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे तसेच आमदार निलेश राणे यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथील कर्तव्य भवन येथे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांची भेट घेतली. या भेटीत मच्छिमारांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा होऊन सकारात्मक तोडगा काढण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

डिझेलच्या वाढत्या किमती आणि दरांमधील तफावतीमुळे मच्छिमारांच्या मासेमारी फेऱ्या, बाजारातील मासळीची आवक तसेच एकूणच उत्पन्नावर विपरीत परिणाम होत आहे. हाच कळीचा मुद्दा केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडत मच्छीमारांना योग्य ती आर्थिक सवलत मिळवून देण्यासाठी तातडीने हस्तक्षेपाची विनंती करण्यात आली. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो मच्छीमार समाजाला मोठा दिलासा मिळणार असून सागरी मत्स्यव्यवसायाची आर्थिक व्यवहार्यता व शाश्वतता वाढण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी या वेळी व्यक्त केला.

या बैठकीला महाराष्ट्र राज्य मच्छिमार संस्था संघाच्या अध्यक्षा ज्योती राजेश मेहेर, सिंधुदुर्ग जिल्हा मच्छिमार संस्था फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद गणपत धुरी, रत्नागिरी जिल्हा मच्छिमार सहकारी संघाचे अध्यक्ष हरेश्वर हरिश्चंद्र कालेकर, देवगड यांत्रिक नौका मालक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यकांत खवळे, देवगड फिशर मेन्स सोसायटीचे तज्ञ संचालक सचिन दत्ताराम कदम, मुंबई जिल्हा मच्छिमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास पांडुरंग संघ, रायगड जिल्हा मच्छिमार सहकारी संघाचे अध्यक्ष प्रल्हाद दिनेश पाटील तसेच नगरसेवक तथा मच्छिमार नेते निवृत्ती रवींद्र तारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >