Sunday, August 23, 2026

जान है तो जहान है!

जान है तो जहान है!

- प्रतिभारंग, प्रा. प्रतिभा सराफ

चहा बरोबर बाजूला भरपूर ओले खोबरे आणि कोथिंबीर घातलेले पोहे खायला घेतले आणि समोरचा रिमोट दाबून बातम्या लावल्या. पहिलीच बातमी म्हणजे १० ऑगस्ट २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्यात धानोरी तालुक्यातील जपतलाई येथील शासकीय अनुदानित आश्रमशाळेत राहणाऱ्या काही मुलींचा साप चावून मृत्यू झाला आहे, तर संपूर्ण वृत्तानुसार आश्रमशाळेतील काही मुली पलंगावर झोपल्या होत्या; परंतु सगळ्यांसाठी तिथे पलंग उपलब्ध नव्हते त्यामुळे त्यांना खाली झोपवण्यात आले होते. रात्री २ वाजता एका विषारी सापाने जवळजवळ सहा विद्यार्थिनींना दंश केला. त्यापैकी तिघींचा तर ताबडतोब मृत्यू झाला. आणखी तिघी रुग्णालयापर्यंत पोहोचल्या. ही हृदयद्रावक घटना ऐकून पोह्याची बशी बाजूला सरकवली आणि डोळ्यांतले पाणी पुसत चहाचा कप उचलून बेसीनमध्ये ठेवला. त्या आठवड्यात, नंतर केव्हा तरी बातम्या पाहताना आणखी काही माहिती मिळू शकली... ज्या अहवालावरची सही पाहून शाळेची तपासणी योग्य झाली आहे, असे समजून शिक्कामोर्तब केले गेले, त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि वसतिगृह अधीक्षक यांनाही पोलिसांनी अटक केली.

यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) या घटनेची दखल घेत महाराष्ट्र सरकारला दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याची नोटीस बजावली.इतक्यावर शासन यावेळेस थांबलेले नाही, तर महाराष्ट्र सरकारने १८ ऑगस्ट २०२६ रोजी या घटनेच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानुसार ‘सर्पदंश’ हा ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. आता अधिसूचित आजार म्हणजे काय हे पण मी बारकाईने जाणून घेतले. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय व किंवा खासगी रुग्णालयात सर्पदंश झालेला रुग्ण भरती झाल्यास त्याच्या मृत्यूची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना ताबडतोब माहिती देणे बंधनकारक झाले आहे. एकंदरीत काय तर कोणीतरी जीव गमावल्यावर एक महत्त्वाचा आणि लोकोपयोगी कायदा झालाय, हेही नसे थोडके!

एकीकडे ही घटना घडली आणि श्रावणाची चाहूल लागली. ‘नागपंचमी’ सण साजरा करण्याच्या आनंदाच्या उत्साहाच्या क्षणी, भाषण करण्यासाठी काही मुद्दे मी काढत असताना अचानक वाचायला मिळाले की दगडाचा उंदीर, साप आपण पुजतो. पण तो खरा असला तर त्याला मारून टाकतो निर्जीवांच्या बाबतीत आपले प्रेम आणि श्रद्धा शिगेला पोहोचते आणि सजीवांचा आपण द्वेष करतो. खरेच आहे हे पण म्हणून खऱ्या सापांना मारायचेच नाही का? उंदरांना असेच घरभर वावरू द्यायचे का? हा कोणत्याही सामान्य माणसासारखा पडणारा प्रश्न मलाही पडला. त्यात गणपतीला महिनाही उरलेला नाही. कोणतीही गणपतीची मूर्ती उंदीर मामाशिवाय कधीच दिसत नाही. अशा वेळेस निसर्गाचे जे जैविक चक्र आहे ते अखंड फिरते राहण्यासाठी काही गोष्टी आपल्याला करणे आवश्यक आहे जसे की, या प्राण्यांच्या वाटेला आपण जर गेलो नाही, तर ते आपल्या वाटेला जात नाहीत, म्हणून त्यांना मारायचे नाही, हे तत्त्वज्ञान ऐकत आपण पर्यावरण आणि प्राणीप्रेम जागवत आलेलो असलो तरी जेव्हा निवांत झोपलेल्या निष्पाप बालकांचा सापाने चावा घेतला, या निवळ बातमीनेच आपण हादरून गेलो. ज्या पालकांची ही मुले असतील त्यांच्या जीवाचे काय हाल झाले असतील? यापुढे या आणि इतर आश्रमशाळेत किती विद्यार्थी टिकून राहतील याबद्दल शंकाच वाटते. शेवटी काय तर - जान है तो जहान है!

यापुढे ग्रामीण भागातील अँटी-स्नेक व्हेनम (ASV) लसींच्या साठ्याचे ताबडतोबीने नियोजन केले जाईलही, पण...?

आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो, याचा थोडा विचार करूया. चिमुकल्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी काही पलंग / खाटा विकत घेऊन देता येतील का?, याचा विचार करूया. कारण पावसाळ्याच्या दिवसांत बिळात पाणी भरल्यावर साप आणि किडेकीटकांना आपले घर सोडून बाहेर पडण्याची वेळ येतेच ना म्हणून त्यांच्यामुळे कोणी बेघर होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे!

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा