Saturday, August 15, 2026

बाप्पा तोच, उत्सव नवा!

बाप्पा तोच, उत्सव नवा!

- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर

गणपती बाप्पा मोरया!” हा जयघोष कानावर पडला की मन आपोआप आनंदाने भरून येते. भाद्रपद महिन्याच्या आगमनाबरोबर घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाच्या स्वागताची लगबग सुरू होते. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र काळ बदलला, जीवनशैली बदलली, तंत्रज्ञान आले आणि त्याबरोबर गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धतही मोठ्या प्रमाणात बदलली.

एक काळ असा होता, की गणेशोत्सव म्हणजे साधेपणा, श्रद्धा, उत्साह, शेजारधर्म आणि माणसामाणसांतील आपुलकी. आज गणेशोत्सव अधिक भव्य, आकर्षक आणि तंत्रज्ञानसमृद्ध झाला आहे. पूर्वीच्या उत्सवात साधेपणातला आनंद होता; आजच्या उत्सवात भव्यतेतला आनंद आहे.

पूर्वी गणेशमूर्ती घरी आणण्याची तयारी अनेक दिवस आधीपासून सुरू होत असे. सजावट फार मोठी नसायची; परंतु त्यामागे कुटुंबातील प्रत्येकाचा सहभाग असायचा. सजावटीत बाजारातील तयार वस्तूंपेक्षा घरच्या कल्पकतेला अधिक महत्त्व असे. मुलांनी स्वतः तयार केलेली फुलांची माळ किंवा कागदी सजावट हीच त्यांच्यासाठी मोठी उपलब्धी असायची. गणपतीची आरती हा तर घरातील सर्वांचा आनंदाचा क्षण असे. संध्याकाळी ठरलेल्या वेळी घरातील सर्व मंडळी एकत्र येत. शेजारी-पाजारीही आरतीला येत. “सुखकर्ता दुःखहर्ता...”च्या स्वरात संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जात असे.

पूर्वी गणपती म्हणजे घरातील एक सदस्यच जणू! त्याच्याशी बोलणे, त्याच्यासमोर मनातील इच्छा व्यक्त करणे, त्याला नैवेद्य दाखवणे आणि विसर्जनाच्या वेळी भावुक होणे, या सगळ्या गोष्टींमध्ये एक वेगळीच आत्मीयता होती.

पूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाला विशेष सामाजिक महत्त्व होते. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊन समाजाला एकत्र आणण्याचे मोठे कार्य केले. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ पूजा-अर्चेपुरता मर्यादित न राहता समाजप्रबोधनाचे माध्यम बनला. गणेश मंडळांच्या माध्यमातून भजन, कीर्तन, व्याख्याने, नाटके, पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा त्यात सहभाग असे. आज गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले आहे. गणेशमूर्तीच्या आकारापासून सजावटीपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये भव्यता दिसते. आकर्षक विद्युत रोषणाई, मोठमोठे देखावे, डिजिटल स्क्रीन, लेझर शो, थीमवर आधारित सजावट, ध्वनिव्यवस्था आणि सोशल मीडियावरील थेट प्रक्षेपण यामुळे उत्सवाला आधुनिक रूप प्राप्त झाले आहे.

पूर्वी एखाद्या मंडळाचा देखावा पाहण्यासाठी लोक प्रत्यक्ष तेथे जात असत. आज त्याचे फोटो आणि व्हिडीओ काही क्षणांत हजारो लोकांपर्यंत पोहोचतात. तंत्रज्ञानामुळे उत्सवाला व्यापक स्वरूप मिळाले आहे.

पण भव्यतेसोबत काही प्रश्नही निर्माण झाले आहेत आजच्या गणेशोत्सवातील सर्व बदल सकारात्मक आहेत असे म्हणता येणार नाही. काही ठिकाणी भक्तीपेक्षा दिखावा, श्रद्धेपेक्षा स्पर्धा आणि संस्कृतीपेक्षा मनोरंजन यांना अधिक महत्त्व मिळताना दिसते. “आपल्या मंडळाचा देखावा सर्वात मोठा असावा”, “सजावट सर्वात आकर्षक असावी”, “मिरवणूक सर्वात मोठी असावी अशी स्पर्धा वाढत आहे. या स्पर्धेमुळे अनावश्यक खर्च वाढतो.

काही वेळा मोठ्या आवाजातील संगीत, वाहतूक कोंडी, गर्दी आणि ध्वनिप्रदूषण यामुळे इतरांना त्रासही होतो. गणरायाला आपण विघ्नहर्ता म्हणतो. मग त्याच्या आगमनामुळे पर्यावरणाला किंवा इतरांना त्रास होईल, असे वर्तन करणे योग्य आहे का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे.

आजच्या काळात पर्यावरणाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणपूरकतेचा विचार करणे आवश्यक आहे. शाडू मातीच्या मूर्ती, नैसर्गिक रंग, कमी प्लास्टिकचा वापर, कापडी सजावट, कागद व पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा उपयोग, कृत्रिम तलावात विसर्जन आणि निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन यांसारख्या उपक्रमांमुळे गणेशोत्सव अधिक जबाबदार पद्धतीने साजरा करता येतो. पूर्वीच्या गणेशोत्सवाचे सर्व काही आजच्या काळात जसेच्या तसे परत आणणे शक्य नाही. काळ बदलला आहे. आजची जीवनशैली वेगळी आहे. तंत्रज्ञान आणि आधुनिक साधने ही आपल्या जीवनाचा भाग बनली आहेत. मात्र पूर्वीच्या गणेशोत्सवातील साधेपणा, आपुलकी, सामाजिक बांधिलकी आणि संस्कृतीची जपणूक आपण आजही नक्कीच स्वीकारू शकतो.

गणेश मंडळांनी केवळ देखावे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम न करता रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, पुस्तक वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, स्वच्छता अभियान, महिला व बालसुरक्षा जनजागृती, व्यसनमुक्ती अभियान अशा सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले, तर गणेशोत्सवाचे सामाजिक महत्त्व अधिक वाढेल.

मुलांसाठी गणेशोत्सव म्हणजे संस्कारांची शाळा, गणेशोत्सव हा मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्याची सुंदर संधी आहे. गणेशाची कथा सांगणे, अथर्वशीर्षाचे पठण, आरती, भजन, चित्रकला, हस्तकला, पारंपरिक खेळ, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा अशा उपक्रमांतून मुलांना संस्कृतीशी जोडता येते. आजच्या डिजिटल युगात मुलांचा बराच वेळ मोबाईल आणि स्क्रीनवर जातो. अशा वेळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांना प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधण्याची, एकत्र काम करण्याची आणि सामाजिक जबाबदारी समजून घेण्याची संधी मिळू शकते. पूर्वी गणेशोत्सव साधा होता; आज तो भव्य आहे.पूर्वी सजावट हाताने केली जात असे; आज डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर होतो. पूर्वी आरतीसाठी शेजारी एकत्र येत; आज आरतीचे थेट प्रक्षेपण हजारो लोक पाहतात. पूर्वी माहिती तोंडी पसरत असे; आज सोशल मीडिया काही क्षणांत ती सर्वत्र पोहोचवतो.पूर्वी खर्चापेक्षा सहभागाला महत्त्व होते; आज काही ठिकाणी खर्च आणि भव्यतेला अधिक महत्त्व दिले जाते. पण या सर्व बदलांमध्ये एक गोष्ट मात्र कायम आहे, गणरायावरील श्रद्धा आणि “गणपती बाप्पा मोरया” या जयघोषातील भाव! आपल्याला पूर्वीचा गणेशोत्सव पूर्णपणे परत आणायचा नाही आणि आधुनिकतेलाही नाकारायचे नाही. आपल्याला हवा आहे तो परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम असलेला गणेशोत्सव.

तंत्रज्ञान असावे, पण त्याचा अतिरेक नसावा. भव्य सजावट असावी, पण पर्यावरणाची हानी होऊ नये.सांस्कृतिक कार्यक्रम असावेत, पण त्यातून संस्कारही घडावेत.

मिरवणूक असावी, पण शिस्त आणि सामाजिक जबाबदारीही असावी. उत्साह असावा, पण इतरांच्या शांततेचा विचारही असावा. गणपतीला महागडी सजावट करण्यापेक्षा एखाद्या गरजू मुलाला शिक्षणासाठी मदत करणे, एखाद्या वृद्धाला आधार देणे, एखा‌द्या झाडाचे संवर्धन करणे किंवा परिसर स्वच्छ ठेवणे हीसुद्धा गणरायाचीच सेवा आहे. पूर्वीचा गणेशोत्सव आपल्याला “एकत्र येण्याची” शिकवण देतो, तर आजचा गणेशोत्सव आपल्याला “तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याची” संधी देतो. पूर्वीची साधेपणाची संस्कृती आणि आजची आधुनिकता यांचा योग्य मेळ घातला, तर गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण होऊ शकतो.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा