- विज्ञानकथा, प्रा. देवबा पाटील
शिवम व त्याच्या मित्रांची प्रश्नोत्तरे सुरूच होती. “भूकंपनाभी म्हणजे काय असते?” कौशलने प्रश्न फेकला. शिवम म्हणला, “भूपृष्ठाखाली भूकंप नेमका जेथून सुरू होतो म्हणजे भूकंपाचे उगमस्थान नेमके ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणाला भूकंपनाभी किंवा भूकंपाचे केंद्र अथवा अधिकेंद्र म्हणतात. अशी केंद्रे जमिनीच्या खाली सहसा १६ ते २० कि.मी. अंतरावर असतात.” “भूकंप कसा मोजतात?” यात्रेकरूने प्रश्न केला. “भूकंपाची तीव्रता रिश्टर या मापकाने मोजतात; परंतु भूकंप कधी व केव्हा होईल ह्याचे भविष्य मात्र अजूनही शास्त्रज्ञांना सांगता येत नाही.” शिवमने उत्तर दिले.“भूकंपाचे काय परिणाम होतात?” यात्रेकरूनेच पुन्हा विचारले. “भूकंप जर खूप जोराचा असला, तर जमिनीला खूप मोठमोठ्या भेगा पडतात. जमिनीची खूप उलथापालथ होते. जमीन उंच-सखल होते. नदीचा प्रवाहसुद्धा बदलतो. काही ठिकाणी नवीन तलाव तयार होतात, तर काही ठिकाणचे तलाव नष्टही होतात. कुठे नवीन झरे निर्माण होतात, तर कुठले झरे नाहीसे होतात. कुठे विहिरींना भरपूर पाणी येते, तर कोणाच्या विहिरींचे पाणी आटते. झाडे, घरे उन्मळून पडतात,” शिवमने सांगितले.
“ज्वालामुखी कसा होतो. त्याच्या स्फोटानेही भूकंप होतो असे म्हणतात. त्याबद्दल तुला काही माहिती आहे का?” कैवल्यने विचारले. “हो, ह्या पुस्तकात सगळी माहिती आहे. सांगतो तीही,” शिवम सांगू लागला,” एखादे वेळी अचानक जमीन एकदम फाटते नि त्या फाटलेल्या जागेतून जोराने अतिशय उष्ण ज्वाला, गरम रसाचे फवारे बाहेर उडू लागतात. त्यातूनच जोरजोरात दगडधोंडे फटाफट बाहेर फेकले जातात. मग तो तप्त रस वाट मिळेल तिकडे वेगाने सर्वत्र वाहू लागतो आणि सभोवताल त्या आगीच्या तप्त रसात बुडून, आसमंत ज्वाळांमध्ये होरपळून, भस्म होऊ लागतो.” “त्याचे कारण असे आहे मित्रांनो,” शिवम पुढे सांगू लागला, “पृथ्वीच्या गर्भातील तप्त शिलारस हा सतत उकळता असतो. पृथ्वीच्या पोटात तो अतिशय जोराने उसळ्या मारत असतो. कधी कधी तो पृथ्वीच्या एखाद्या ठिकाणच्या कमकुवत कवचातून उफाळून खूप जोराने उसळत बाहेर येतो. तो अत्यंत जोराने उसळत बाहेर येत असल्याने त्याला ज्वालामुखीचा उद्रेक वा स्फोट झाला असे म्हणतात. ह्या बाहेर आलेल्या शिलारसालाच लाव्हारस म्हणतात. तप्त लाव्हारसासोबत अति उष्ण राख, खडकांचे तुकडे, वाफ, धूर, विषारी वायू इत्यादीही ज्वालामुखीतून वेगाने बाहेर फेकल्या जातात. वायू, खडकांचे तुकडे व वितळलेल्या खडकाचा शिलारस पृथ्वीच्या पोटातून पृष्ठभागापर्यंत छिद्र करून जोराने वातावरणात फेकला जातो त्याला ज्वालामुखी म्हणतात. सहसा तो एखाद्या पर्वताच्या भेगाळलेल्या नळीसारख्या टोकातून उसळत बाहेर येतो. त्या स्थळाला वा पर्वतालाही ज्वालामुखी म्हणतात. ह्या लाव्हारसासोबत अतिशय उष्ण वायूंच्या ज्वाळा उफाळत बाहेर येतात म्हणून त्याला ज्वालारसही म्हणतात. अशा ज्वालामुखींच्या स्फोटानेसुद्धा भूकंप घडतात.”
“मागे काही ठिकाणच्या समुद्रावर पर्वतप्राय अशा त्सुनामी लाटा आल्या होत्या. त्या कशा निर्माण होतात?” कैवल्यने प्रश्न केला. शिवम म्हणाला, “सुनामी लाटा ह्या समुद्रतळावर किंवा समुद्रतळाखाली झालेल्या भूकंपामुळे अथवा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्यावर निर्माण होतात. त्या अतिदीर्घ लांबीच्या, खूप मोठमोठ्या व प्रचंड विध्वंसक लाटा असतात. त्या खूपच भयंकर थैमान घालतात व अतोनात नुकसान करतात.”






