Wednesday, August 19, 2026

Nashik : कौतुकास्पद ! नाशिकचा बुद्धिबळपटू विदित गुजरातीला ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर

Nashik : कौतुकास्पद ! नाशिकचा बुद्धिबळपटू विदित गुजरातीला ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर

National Sports Awards 2025 : केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ मध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्कार २०२५ साठी महाराष्ट्रातील दोन बुद्धिबळपटूंची निवड झाली आहे. ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराती आणि ग्रँडमास्टर दिव्या जितेंद्र देशमुख यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

विदित संतोष गुजराती यांना अर्जुन पुरस्कार

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे नाशिकचे ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराती यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विदित यांच्या या यशामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्रासह जिल्ह्यातील बुद्धिबळप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विदित गुजराती यांच्या या कामगिरीमुळे नाशिककरांसाठी हा केवळ एका खेळाडूचा पुरस्कार नसून संपूर्ण शहरासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. बुद्धिबळाच्या पटावर आपल्या बुद्धिमत्तेची आणि कौशल्याची चमक दाखविणाऱ्या विदित यांच्या यशामुळे नाशिकच्या युवा खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार आहे.

त्याचबरोबर ग्रँडमास्टर दिव्या जितेंद्र देशमुख यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. नेमबाजी प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार, तर पुणे येथील आर्मी पॅरालिम्पिक नोड यांना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या शिफारशींनुसार विविध श्रेणींमध्ये हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

विदित गुजराती यांच्या अर्जुन पुरस्कारामुळे नाशिकचे नाव पुन्हा एकदा देशाच्या क्रीडा नकाशावर ठळकपणे उमटले आहे. त्यांच्या या यशाबद्दल नाशिककरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, शहरातील क्रीडा क्षेत्रातूनही या कामगिरीचे कौतुक केले जात आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >