Wednesday, August 19, 2026

Mumbai University Exam New Rule : लेट लतीफ विद्यार्थ्यांना बसणार दणका; परीक्षेच्या ३० मिनिटे आधी हजेरी बंधनकारक

Mumbai University Exam New Rule : लेट लतीफ विद्यार्थ्यांना बसणार दणका;  परीक्षेच्या ३० मिनिटे आधी हजेरी बंधनकारक

- मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थ्यांसाठी नवा नियम

मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि त्यांच्याशी संलग्न सर्व महाविद्यालयांमधील परीक्षा प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी परीक्षांमध्ये प्रत्येक परीक्षार्थीला परीक्षा सुरू होण्याच्या निर्धारित वेळेच्या किमान 30 मिनिटे आधी परीक्षा कक्षात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.ऐन परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावर पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे होणारी धावपळ टाळणे आणि परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. (Mumbai University Exam New Rule)

ओळखपत्र आणि आसनव्यवस्थेसाठी मिळणार वेळ :

विद्यार्थी परीक्षा केंद्रावर अगदी शेवटच्या क्षणी पोहोचल्यास त्यांचे ओळखपत्र, प्रवेशपत्र आणि आसनव्यवस्थेची पडताळणी करण्यासाठी अतिरिक्त वेळ लागतो. त्यामुळे परीक्षा कर्मचाऱ्यांवर ताण येण्यासोबतच इतर विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवरही परिणाम होण्याची शक्यता असते. परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे आणि आसनव्यवस्था तपासून घेण्यासाठी ३० मिनिटांचा कालावधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही घाई न करता शांतपणे परीक्षा देता येईल, असा विद्यापीठ प्रशासनाचा उद्देश आहे. (Mumbai University Exam New Rule)

नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमांची अंमलबजावणी :

विद्यापीठाच्या विद्वत परिषद आणि व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये आणि परीक्षा केंद्रांना नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रवासाचा वेळ, वाहतूक कोंडी आणि इतर संभाव्य अडचणींचा विचार करून घरातून वेळेआधी निघावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. म्हणजेच, परीक्षा सुरू होण्याच्या वेळेवर धावत येणाऱ्या 'लेट लतीफ' विद्यार्थ्यांना आता वेळेचं भान ठेवावं लागणार आहे. (Mumbai University Exam New Rule)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा