Tuesday, August 11, 2026

Nashik : शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेला विशाल काळाच्या पडद्याआड

Nashik : शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेला विशाल काळाच्या पडद्याआड

Nashik : संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या अनेक सर्वसामान्य आणि अनोळखी लोकांच्या मदतीला धावून जाणारा नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या मनमाडचा (Manmad) विशाल सुभाष राऊत याचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. इलेक्ट्रिशियन (Electrician) म्हणून काम करणाऱ्या विशालने आपल्या मदतकार्यामुळे दीडशेपेक्षा अधिक जणांना संकटाच्या काळात आधार दिला होता. मात्र, इतरांसाठी देवदूत ठरलेल्या विशालवरच काळाने घाला घातला.

मनमाड शहरातील विवेकानंद नगर परिसरात एखाद्या व्यक्तीचे नाव घेतले की, मदतीसाठी तत्पर असणारा, कोणाचीही ओळख न पाहता धावून जाणारा आणि अडचणीत सापडलेल्या माणसाला आपलासा करणारा विशाल अनेकांच्या आठवणीत उभा राहतो. मात्र, शेकडो अनोळखींसाठी आधार बनलेला हाच विशाल आज काळाच्या पडद्याआड गेल्याने मनमाड शहरातील अनेकांचे डोळे पाणावले आहेत. (Nashik AccIdent News)

अनोळखींसाठी आधार ठरलेला विशाल पडद्याआड

ओळख होती म्हणून मदत केली, असे नव्हे; माणूस अडचणीत आहे एवढेच त्याच्यासाठी पुरेसे होते. त्यामुळे विवेकानंद नगर परिसरापुरता मर्यादित न राहता अनेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा विशाल अनेकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण करून गेला होता. कुणाला तातडीची मदत हवी असो, कुणी अडचणीत असो किंवा कुणाला आधाराची गरज असो; विशाल शक्य तितक्या तत्परतेने मदतीला उभा राहत असे. त्याच्या या स्वभावामुळे अनेक अनोळखी व्यक्तीही त्याच्यासाठी नंतर आपलीच माणसं बनली. नात्यांपेक्षा माणुसकी मोठी असते, हे आपल्या कृतीतून दाखवून देणारा विशाल आता मात्र आठवणींत उरला आहे. एका अपघाताने त्याचे आयुष्य अचानक हिरावून घेतल्याची बातमी समोर येताच मनमाड शहरात हळहळ व्यक्त होत आहे. कालपर्यंत मदतीसाठी फोन केल्यावर धावून येणारा चेहरा आता कायमचा दिसणार नाही, ही जाणीवच अनेकांसाठी अस्वस्थ करणारी ठरत आहे. (Nashik AccIdent News)

‘आपला माणूस गेला’

विशालच्या जाण्याने केवळ एका कुटुंबाचा आधार हरपलेला नाही, तर ज्यांनी त्याच्याकडून कधी ना कधी मदतीचा हात अनुभवला, अशा असंख्य अनोळखी माणसांचाही एक आपला माणूस हरपला आहे. त्याने केलेल्या मदतीची यादी कदाचित कुठेही लिहिलेली नसेल; मात्र ज्यांच्या आयुष्यात त्याने संकटाच्या वेळी हात दिला, त्यांच्या मनात त्याचे ऋण कायम जिवंत राहणार आहे. माणूस किती मोठा होता हे त्याच्याकडे किती पैसा किंवा पद होते यावर ठरत नाही; तर त्याच्या जाण्यानंतर किती डोळे पाणावले आणि किती जणांनी ‘आपला माणूस गेला’ असे म्हटले, यावर ठरते. विशालच्या अकाली जाण्याने मनमाडमध्ये उमटलेली हळहळ त्याच्या माणुसकीचीच साक्ष देत आहे. (Nashik AccIdent News)

आज विवेकानंद नगरचा परिसर शांत मदतीसाठी धावणारा एक हात थांबला आहे, पण त्याने केलेली माणुसकीची कामे आणि अनेकांच्या मनात निर्माण केलेली आपुलकी मात्र कायम जिवंत राहणार आहे. विशालच्या अकाली निधनाने मनमाड शहरावर शोककळा पसरली असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा