Tuesday, August 4, 2026

Nashik : शहरातील शालेय पोषण आहारावर आता 'एफडीए'ची करडी नजर

Nashik : शहरातील शालेय पोषण आहारावर आता 'एफडीए'ची करडी नजर

Nashik : अन्न सुरक्षा व औषध प्रशासनाकडून (Food Safety and Drug Administration) राज्यात कारवायांचा धडाका सुरु आहे. 'एफडीए' नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक हॉटेल्सवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली असून आता 'एफडीए'ने आपला मोर्चा विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संस्थांकडे वळवला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेशी खेळणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व औषध प्रशासन आता थेट कारवाई करणार आहे. (Nashik News)

एफडीएची राहणार करडी नजर

दरम्यान, नाशिक महापालिका क्षेत्रातील (Nashik Municipal Corporation area) सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वच्छ, पौष्टिक आणि संतुलित अन्न पुरवले जाते की नाही, यावर आता एफडीएची नजर राहणार आहे. नाशिक मनपा हद्दीतील महापालिका शाळांसह इतर अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील सुमारे सव्वालाखांहून अधिक विद्यार्थ्यांना दररोज सेंट्रल किचन योजनेच्या माध्यमातून शालेय आहार पुरवला जातो. यासंदर्भात निर्देशांनंतर खडबडून जाग्या झालेल्या मनपा शिक्षण विभागाने शहरातील सर्व शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांचे संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांना तातडीने परिपत्रक जारी करून नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. (Nashik News)

निकृष्ट अन्नपुरवठा करणाऱ्यांवर कारवाई

विनापरवाना किंवा निकृष्ट अन्नपुरवठा करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई होणार आहे. तर नवीन नियमांनुसार शाळेच्या आवारात, तसेच प्रवेशद्वारापासून ५० मीटर अंतराच्या क्षेत्रात लहान मुलांसाठी घातक ठरणाऱ्या 'हाय फॅट, शुगर आणि सॉल्ट 'युक्त जंकफूडच्या विक्रीवर, मोफत वितरणावर आणि जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, शाळेत विद्यार्थ्यांना पुरवले जाणारे पिण्याचे पाणी पूर्णपणे सुरक्षित आणि शुद्ध असल्याची खात्री करण्याचे निर्देश शिक्षण संस्थाचालक व मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >