Tuesday, August 4, 2026

Pradeep Rawat : लगान, गझनीतून चमकलेले; महाभारतातील अश्वत्थामा फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे ७४ व्या वर्षी निधन

Pradeep Rawat : लगान, गझनीतून चमकलेले; महाभारतातील अश्वत्थामा फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे ७४ व्या वर्षी निधन

मुंबई : लगान, गझनी, छावा अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारलेले महाभारतातील अश्वत्थामा फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे ७४ व्या वर्षी निधन झाले. लगान चित्रपटातील अभिनेते यशपाल शर्मा यांनी इन्स्टा पोस्ट केली आणि प्रदीप रावत यांना श्रद्धांजली वाहिली. या पोस्टमुळेच अनेकांना अभिनेते प्रदीप रावत यांच्या निधनाची माहिती मिळाली. अभिनेते प्रदीप रावत यांचे मॅनेजर सिद्धार्थ तिवारी यांनी निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

प्रदीप रावत यांना कॅन्सर झाला होता. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. आधी उपचारांमुळे परस्थिती नियंत्रणात होती. पण काही दिवसांपूर्वी कॅन्सर उलटला आणि तब्येत ढासळली. मागील एक महिन्यापासून प्रदीप रावत रुग्णालयात होते पण त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. अखेर मंगळवार ४ ऑगस्ट २०२६ रोजी अभिनेते प्रदीप रावत यांची प्राणज्योत मालवली.

प्रदीप रावत यांनी करिअरच्या सुरुवातीलाच बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत या टीव्ही मालिकेत अश्वत्थामा ही भूमिका साकारली होती. त्यांनी हिंदी, तेलुगु, तमिळ, कानडी, मल्याळम, बंगाली आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले होते. लगान, सरफरोश, गझनी, बैजू बावरा, आवारापन, ग्रँड मस्ती या हिंदी चित्रपटांमधील त्यांची भूमिका अनेकांच्या लक्षात राहिली. तेलुगु फिल्म सई मधून त्यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. दाक्षिणात्य सिनेमात त्यांनी अनेकदा व्हिलनची अर्थात खलनायकाची भूमिका केली होती. तमिळ आणि हिंदी 'गझनी' चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली होती. तसेच कानडी चित्रपट 'पॅरोडी', मल्याळम आणि हिंदी चित्रपट 'चायना टाऊन', बंगाली चित्रपट 'हिरो ४२०', भोजपुरी चित्रपट 'क्रॅक फायटर'मधील त्यांची भूमिका गाजली होती. अभिनेता सलमान खान सोबतही त्यांनी पाच चित्रपटांमध्ये काम केले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >