Monday, July 27, 2026

कोकणचं कॅलिफोर्निया अन् बारामती...!

कोकणचं कॅलिफोर्निया अन् बारामती...!

राजकीय विरोध करणं वेगळं आणि विकासाच्या आडवं जात सातत्याने विकासप्रक्रियेला विरोध करणं वेगळी गोष्ट आहे. आपल्या कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात कोणताही नवीन विकासाचा प्रकल्प आला, त्याची साधी चर्चा जरी झाली तरीही त्याला विरोध हा ठरलेलाच असतो...

कोकणच्या कॅलिफोर्नियाच्या ‘गजाली’ ऐकूणच कोकणातील आजची साठी-सत्तरीतली पिढी लहानाची मोठी झाली. त्यावेळच्या जाहीर सभा, समारंभामध्ये विशेषकरून निवडणूक काळात तर, कोकणचं कॅलिफोर्निया केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारची भाषणं ऐकायला मिळायची. त्याकाळच्या विद्यार्थी दशेतील सर्वांनाच ‘कॅलिफोर्निया’ म्हणजे काय आहे? कोकणचं कॅलिफोर्निया होणार म्हणजे काय होणार? हा प्रश्न सतत मनात यायचा. कोकणचं निसर्ग सौंदर्य कॅलिफोर्नियापेक्षाही सुंदर आहे. इथली नैसर्गिकता ही सर्वात अग्रस्थानी आहे. हे नंतरच्या काळात चर्चेतून ऐकायला मिळाले. १९९० पर्यंतच्या जवळपास कोकणातील होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कॅलिफोर्निया आणि कोकण याची भाषणातून तुलना व्हायची. त्यासंबंधी किमान कोकण हे कॅलिफोर्नियापेक्षाही अधिक उजवं आहे. हे नंतरच्या काळात कोकणाला कळून चुकले.

कोणत्याही भागाचा विकास हा सकारात्मक मानसिकतेवर अवलंबून रहातो. महाराष्ट्राची राजधानी मुंबईला लागून असलेला ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे मिळून कोकण होतं. या कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाची भौगोलिकता एकसमान आहे. रायगड ते सिंधुदुर्गला निसर्ग, समुद्र हे सारेच सोबत आहेत. एवढं सृष्टीसौंदर्य आपणाकडे असतानाही ज्या पद्धतीने प्रगतीची गती अधिकतर असायला हवी होती, तशी ती आपणाला राखता आली नाही. कोकणचा कॅलिफोर्निया होणार या गावगप्पांमध्येच अनेक वर्षे आपण वाया घालवली. १९९० नंतर खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासासंबंधी काही चर्चा होऊ लागली. तत्पूर्वीपर्यंत, कोकणाला काय हवे - मासे, भात आहे. दोन वेळची भ्रांत कोकणवासियांना नाही. या अशा विचारातच आपण गढून गेलो होतो. शेती, बागायती पलीकडे विकासाच्या वाटा आहेत. या वाटेवरून चालण्याचा प्रयत्न पूर्वी कोणी केला नाही. शिक्षणाच्या सोईच उपलब्ध नसल्याने तरूणांना शिक्षणाच्या नवीन वाटा खुणावण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे दहावी, बारावी पास झाल्यावर मुंबईला जाऊन मिळेल ते काम करणे या अशा चौकटीतल्या वातावरणात कोकणचा तरूण खरंतर नवीन काही करण्याच्या मानसिकतेतच राहिला नाही. कॅलिफोर्नियाच्या स्वप्नरंजनातून कधीचाच कोकण बाहेर आला. परंतु विकासाच्या नव्या वाटेवर चालण्याची त्याची मानसिकता मात्र खुज्या मनाच्या राजकीय पुढाऱ्यांनी वाढूच दिली नाही. त्यामुळे कोकणातील काहींच्या मते कोकणात नवीन काही उद्योग नको, विकासाचे कोणतेही प्रकल्प नको. आम्हाला काही नको. पण आम्हाला विकास हवा. काही नको असं एकीकडे म्हणायचं, तसा आग्रह धरत काहींचा बुद्धीभेद करायचा आणि दुसरीकडे रोजगाराच्या कोणत्याही संधी कोकणात नाहीत म्हणून गळा काढायचा, अशा दुटप्पी आणि कोणतंही ‘व्हीजन’ नसलेल्या विचारधारेने कोकणाचं फार मोठं नुकसानच झालं आहे.

एकीकडे या अशा मानसिकतेचीच लोकं पुन्हा बारामतीचा किती विकास झाला. मग कोकणात एवढे मोठे नेते असून काय केलं? म्हणून प्रश्न उपस्थित करणार. बारामतीचा विकास निश्चितच नजरेत भरणारा झाला आहे. परंतु त्यामागच्या कारणांची चर्चा करण्याचीही आपली तयारी असायला हवी. ज्येष्ठ नेते खा. शरद पवार अनेक वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. केंद्रिय मंत्री राहिले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार दीर्घकाळ महाराष्ट्राच्या सत्तेचे वाटेकरी राहिले. अर्थमंत्रालय अनेकवर्षे त्यांनी सांभाळले. साहजिकच सत्तेतील विकासनिधीच्या माध्यमातून सारा वाटा बारामतीकडे वळवला गेला. अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांची निर्मिती झाली. जे प्रकल्प उभे राहिले त्यामागे निश्चितपणे नेते शरद पवार आणि पवार कुटुंबियांचे मोठं योगदान राहिले आहे. परंतु त्याचबरोबर बारामतीच्या गतिमान विकास प्रक्रियेला बारामतीच्या जनतेने विरोधाची भूमिका न घेता सतत त्याची पाठराखण करत राहिले. विरोधासाठी विरोध करणारी आणि जनतेचा बुद्धीभेद करणारी टाळकी बारामतीत नाहीत. उलट विकासाला मूक सहमती देणारे राजकीय पुढारी एकीकडे बारामतीत असाताना निवडणुका जाहीर झाल्यावर पक्षीय, वैचारिक विरोध म्हणून शरद पवार, अजित पवार यांच्याविरोधात निवडणुकीला कडाडून विरोध करणारेही गेली अनेकवर्षे बारामतीत आहेत. राजकीय विरोध करणं वेगळं आणि विकासाच्या आडवं जात सातत्याने विकासप्रक्रियेला विरोध करणं वेगळी गोष्ट आहे.

या गफलती बारामतीत कधी कोणी केल्या नाहीत. त्यामुळेच बारामतीचा विकास होऊ शकला ही वस्तुस्थिती आहे. याउलट आपल्या कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात कोणताही नवीन विकासाचा प्रकल्प आला, त्याची साधी चर्चा जरी झाली तरीही त्याला विरोध हा ठरलेलाच असतो. काही संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते केवळ विरोधी वातावरण तयार करतात. जेणेकरून चांगल काहीही उभं राहू नये, विकासाचा प्रकल्प कोकणात येऊच नये यासाठी प्रयत्न करणारे काही तथाकथित सामाजिक, राजकीय कार्यकर्ते कार्यरत आहेच. गंमत म्हणजे हेच विरोध करणारे बारामतीत शरद पवार, दिवंगत अजित पवार यांनी कसा विकास केला यावर गजाली करताना दिसतात. १९९० साली कोकणच्या राजकारणात खा. नारायण राणे यांची एंण्ट्री झाल्यानंतर अनेक प्रकल्प आणण्याचे प्रयत्न केले. परंतु प्रत्येक नवीन येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करण्याचाच प्रयत्न काहींनी केला. कोकणातील कोणताही विकास प्रकल्प ठराविक कालमर्यादेत उभा राहू शकला नाही. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ आज ज्या स्वरूपात आहे, खरंतर चिपी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा मूळ आराखडा होता. परंतु चिपी विमानतळ प्रकल्पाला काळे झेंडे दाखवत विरोध झाला, तेव्हा मोपाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रस्तावही नव्हता. तेव्हा चिपीला विमानतळाचा प्रस्ताव पुढे आलेला. परंतु राजकारणासाठी विकासाला विरोध करण्याच्या मानसिकतेने चिपीला आंतरराष्ट्रीय विमानतळही नाही. आंतरदेशीय विमानतळ उभारणीलाही विलंबच झाला. याच वास्तविकतेचा कधीतरी विचार करण्यात आला पाहिजे. बारामतीतील झालेला विकास याच सारं श्रेय जसे शरद पवार, अजित पवार यांना आहे तसंच ते तिथल्या जनतेने पवार यांना जी साथ, पाठींबा आणि सहकार्य केलं त्यालाही जातं हे निश्चितपणे कुणालाही नाकारता येणारे नाही. त्यामुळे कोकणची नेहमी बारामतीशी तुलना केली जात असताना कोकणच्या राजकीय नेते, पुढाऱ्यांनी, जनतेने सकारात्मक विचार करण्याची आवश्यकता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा