महापौर जेन नेक्स्ट सिविक फेलोजचा ठराव सभागृहात मंजूर
मुंबई : मुंबईतील तरुणांना महानगरपालिकेच्या नागरी प्रशासन, विकासकामे आणि धोरणनिर्मिती प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून महापौर जेन नेक्स्ट सिविक फेलोज योजना सुरू करण्याच्या ठराव महापालिका सभागृहात मांडण्यात आला. महानगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य तेजिंदरसिंग तिवाना यांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला सभागृहाने मंजुरी दिली.
मुंबईतील रस्ते, कचरा व्यवस्थापन, जलभराव, सार्वजनिक सुविधा आणि इतर नागरी समस्यांवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी आधुनिक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि लोकसहभागावर आधारित यंत्रणा उभारण्याची गरज लक्षात घेऊन हा ठराव मांडण्यात आला. शहरातील वाढत्या नागरी तक्रारींचे जलद निराकरण करण्यासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे सभागृहात नमूद करण्यात आले. हे फेलोज रस्त्यांवरील खड्डे, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक, पायाभूत सुविधा आणि इतर नागरी सेवांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून भ्रमणध्वनी अनुप्रयोगाच्या (मोबाईल ॲप) माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांकडे नियमित डिजिटल अहवाल सादर करतील.
- ६० किमी वेगाने वाहणार वारे मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. सोमवारी शहरातील अनेक भागांत हलक्या ...
योजनेअंतर्गत निवड झालेल्या तरुणांना महानगरपालिकेकडून आवश्यक प्रशिक्षण, मासिक मानधन आणि यशस्वी प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. "मुंबईच्या विकासात तरुणांची ऊर्जा, कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. 'महापौर जेन नेक्स्ट सिविक फेलोज ही योजना तरुणांना शहराच्या प्रशासनाशी जोडणारा प्रभावी दुवा ठरेल. यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग अधिक बळकट होईल तसेच मुंबईच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल असे नगरसेवक तेजिंदरसिंग तिवाना यांनी स्पष्ट केले.






