Tuesday, July 21, 2026

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत. परवानगीशिवाय आंदोलन केल्याचा आणि कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्याचा आरोप ठेवत ९०० हून अधिक आंदोलकांविरोधात एफआयआर (FIR) नोंदविण्यात आले असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Mumbai Police)

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सर्वाधिक ६०० हून अधिक आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर माहिम पोलीस ठाण्यात १०० हून अधिक, दादर पोलीस ठाण्यात ७० हून अधिक आणि सायन पोलीस ठाण्यात ४० हून अधिक जणांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. (Mumbai Police)

आठ पोलीस ठाण्यांत स्वतंत्र FIR :

याशिवाय वरळी पोलीस ठाण्यात २१, काळाचौकी पोलीस ठाण्यात २० हून अधिक, भोईवाडा पोलीस ठाण्यात २० हून अधिक आणि वडाळा टीटी पोलीस ठाण्यात २५ हून अधिक आंदोलकांविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंदोलन ज्या-ज्या भागात झाले, त्या-त्या संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र एफआयआर नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Mumbai Police)

चैत्यभूमीवरील आंदोलनावरही कारवाई :

दादर येथील चैत्यभूमी परिसरात झालेल्या आंदोलनाबाबतही मुंबई पोलिसांनी स्वतंत्र कारवाई केली आहे. या प्रकरणात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून ५० हून अधिक आंदोलकांना आरोपी करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आंदोलनासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे विनापरवानगी आंदोलन केल्याचा आणि सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचवल्याचा ठपका ठेवत संबंधितांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. (Mumbai Police)

पोलिसांचा तपास सुरू :

मुंबई पोलिसांनी सांगितले की, शहरातील विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, सर्व प्रकरणांचा सखोल तपास सुरू आहे. आवश्यक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य माहितीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. (Mumbai Police)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >