Saturday, July 18, 2026

Nashik : संतापजनक ! समाजकंटकांकडून एक एकर उभी कारल्याची बाग उद्ध्वस्त ! शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

Nashik : संतापजनक ! समाजकंटकांकडून एक एकर उभी कारल्याची बाग उद्ध्वस्त ! शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

Nashik : नाशिकच्या येवला तालुक्यातील धुळगाव येथे संतापजनक प्रकार समोर आला आहे. धुळगाव येथील एका कष्टकरी शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास अज्ञात समाजकंटकांनी हिरावून घेतल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील शेतकरी संजय बाळासाहेब वाळके यांच्या गट नंबर ३८२ मधील एक एकर क्षेत्रावरील उभ्या कारल्याच्या पिकाची अज्ञात विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी अक्षरशः राखरांगोळ केली आहे. या क्रूर कृत्यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

नेमकं काय घडलं ?

शेतकरी संजय वाळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे त्यांनी पर्यायी पीक म्हणून कारल्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यामुळे त्यांनी कर्ज काढून अत्यंत मेहनतीने एक एकरात ही बाग उभी केली. पीकही अतिशय जोमदार आले होते आणि कारल्याची तोडणी सुरू झाली होती. बाजारपेठेत कारल्याला ६०० ते ७०० रुपये प्रति कॅरेट असा चांगला दर मिळत असल्याने वाळके कुटुंबाला मोठ्या आर्थिक आधाराची आशा होती.

मात्र, गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी शेतात घुसून धुडगूस घातला. एका एकरात असलेल्या एकूण १५ लाईन्सपैकी तब्बल ९ लाईन्सवरील कारल्याचे वेल मुळासकट उपटून फेकून दिले. प्रत्येकी ३५० फूट लांबीच्या या ९ लाईन्स पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या आहेत. यामुळे वेल वाळून गेले असून चालू पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे वाळके यांचे अंदाजे १५ ते १६ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

​पोलिसांत गुन्हा दाखल; आरोपींचा शोध सुरू

या दुर्दैवी घटनेनंतर शेतकरी संजय वाळके यांनी येवला तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात रीतसर तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. पोलीस सध्या या विकृत कृत्य करणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत.

​शासनाने तात्काळ मदत करावी - पीडित शेतकरी

​आधीच कर्जबाजारी असताना कांद्याला भाव नाही म्हणून मोठ्या आशेने कारल्याचे पर्यायी पीक घेतले होते. पीक चांगले आल्यावर कोणीतरी आकसापोटी रात्रीतून माझी उभी बाग उद्ध्वस्त केली. शासनाने आणि प्रशासनाने मला या संकटातून बाहेर काढण्यासाठी तात्काळ आर्थिक सहकार्य करावे आणि माझ्या पिकाचे वाटोळे करणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी." अशी मागणी पीडित शेतकरी संजय बाळासाहेब वाळके यांनी केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा