Saturday, July 18, 2026

‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामुळे वेगळीच अनुभूती

‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामुळे वेगळीच अनुभूती
 

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल 

 

मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामध्ये अश्वत्थामाचा ज्वलंत जीवनपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अश्वत्थामाची ज्वलंत भूमिका साकारणारे निर्माते अभिनेते अशोक समेळ प्रेक्षकांच्या लक्षात तर राहतातच, परंतु त्यांच्या सोबत नियतीच्या व अन्य भूमिकेत असणारी नवोदित कलाकार देखील प्रेक्षकांचे मन जिंकून घेते, तिचे नाव आहे धनश्री प्रधान दामले.धनश्रीचा जन्म ठाण्याचा, ठाण्यातील सरस्वती मंदिर शाळेत तिचे शालेय शिक्षण झाले. पुढील शिक्षण तिचे माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये असताना तिला अभिनयाची गोडी लागली. कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींकडून नाटकाविषयी चर्चा व्हायची, या चर्चेमध्ये तिचा सहभाग असायचा. त्याच वेळी मनोरंजनाच्या या क्षेत्रात काहीतरी करण्याचे बीज तिच्या मनामध्ये रोवले गेले. कॉलेज शिक्षण संपले. तिला ई. टी.व्ही. वर 'हीच माझी मैत्रीण' या मालिकेसाठी पहिला ब्रेक मिळाला. या मालिकेमध्ये तिला मुलाखत घ्यायची होती. निवेदन करायचे होते. त्या वेळी निवेदनाची तिला तोंडओळख पटली. त्यानंतर तिला ई. टी.व्ही., झी मराठी, दूरदर्शनसाठी निवेदनाचे कार्यक्रम मिळाले. तिने मराठी ‘सृष्टी टॉक’ हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे. त्या प्लॅटफॉर्मवर तिने अनेक मुलाखती घेतल्या. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभय ओक, कादंबरीकार, नाटककार, लेखक व अभिनेते अशोक समेळ, पाकिस्ताननामा पुस्तकाचे लेखक पत्रकार अरविंद गोखले यांच्या मुलाखती तिने घेतल्या आहेत. ब्रिगेडियर हेमंत महाजन, भरत दाभोलकर, वासुदेव कामत यांच्या मुलाखती केल्या. शासनाचे कार्यक्रम, राजभवनामध्ये कार्यक्रम आर्मीसाठी काही कार्यक्रम केले. विधू विनोद चोप्राच्या ‘फेरारी की सवारी’ या हिंदी चित्रपटात तिने लहानशी भूमिका केली.

त्याच दरम्यान तिला निर्माते दिग्दर्शक, लेखक अशोक समेळ यांनी ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या नाटकासाठी विचारले. त्यांना या नाटकासाठी नवोदित अभिनेत्री हवी होती, जिने अगोदर कधीही नाटकात काम केलेले नसेल. त्यांनी तिच्याकडून भरपूर तालीम करून घेतली. त्याचवेळेला तिला नाटकातील व्यक्तिरेखेचा अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य दिले. ज्यावेळी पहिल्यांदा तिला या नाटकाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिला आत्मविश्वास होता की नाटकाचे हे धनुष्यबाण ती यशस्वीरित्या पेलेल. तिची मेहनत घेण्याची तयारी होती. अशोकजींनी धनश्रीला आदरयुक्त भावनेने शिकविले.या नाटकात तत्त्वज्ञान व इतिहास आहे. या नाटकाची भाषा जड आहे, त्यामुळे तिला या नाटकासाठी जास्त तयारी करावी लागली. या नाटकातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील असे विचारले असता ती म्हणाली, की या नाटकामध्ये माझी मुख्य व्यक्तिरेखा नियतीची आहे. अश्वत्थाम्याची स्मृती परत आणण्याचा ती प्रयत्न करते. त्यांच्या आजूबाजूला अनेक व्यक्तिरेखा गुंफलेल्या आहेत, अश्वत्थाम्याला लहानपणाचा अर्जुन आठवतोय, ती भूमिका मी साकारली आहे, युद्धभूमीवर असलेला अर्जुन ज्याला अश्वत्थामा एका वेळी सखा वाटतो, तर दुसऱ्यावेळी त्याला शत्रू वाटतो, त्या द्विधा मनस्थितीत असणाऱ्या अर्जुनाची भूमिका मी साकारली आहे. विभावरी आपटे, त्र्यंबकेश्वर मंदिरातील पुरोहित प्रभाकर घैसास, महाराष्ट्रात गुजरात सीमेवरील गुजराती माणूस, द्वारकेत असलेला पुरोहित अश्या १८ भूमिका मी साकारलेल्या आहेत.

या नाटकाचे निर्माते, लेखक व दिग्दर्शक अशोक समेळ यांच्यासोबत काम करताना कसा अनुभव आला असे विचारले असता ती म्हणाली, की अशोक काकांनी मला अक्षरशः घडवलं कारण मी या अगोदर नाटक केलं नव्हतं, मला त्यांनी १८ भूमिका दिल्या, नाटकाची संहिता श्रीमंत असताना, त्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास माझ्यासाठी खूप मोलाचा आहे, तो मी कधीच विसरू शकत नाही. या नाटकाच्या तालमीच्या वेळी अशोक काकांनी प्रत्येक व्यक्तिरेखा साकारताना त्या व्यक्तिरेखेची भाषा, देहबोली याचा अभ्यास माझ्याकडून करून घेतला.

हे नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षक धनश्रीला भेटायला आल्यानंतर एकदम भारावून गेल्याचे तिने सांगितले. काही प्रेक्षक तर म्हणतात की या नाटकाचा विषय खूप कठीण आहे, परंतु तुम्ही तो खूप चांगल्या व सोप्या पद्धतीने सादर केला आहे. कमीत कमी गोष्टीमध्ये जास्तीत जास्त अनुभव देणारं हे नाटक आहे. हे नाटक मनोरंजन करणार, आत्मबोध, माहिती देणार, सकारात्मक, आपल्या इतिहासाबद्दल, पुराणाबद्दल माहिती देणार आहे. त्यामुळे नवीन पिढीला तरी हे नाटक दाखविणे आवश्यक आहे. अनेक लोक मोठ्या कादंबरी घेतात, वाचतात कारण त्यांना वाचनाची आवड असते, परंतु जे कादंबरी घेऊ शकत नाही, ज्यांना वेळ नाही, त्यांनी हे नाटक अवश्य पाहावे. पालकांनी आपल्या पाल्यांना हे नाटक दाखविणे आवश्यक असल्याचे धनश्रीने सांगितले. काही प्रेक्षक तर तिला म्हणाले की आम्हांला अश्वत्थाम्याबद्दल दोन ते तीन ओळींची माहिती होती. परंतु हे दोन तासांचे नाटक पाहिल्यानंतर आम्हांला अश्वत्थाम्याबद्दल भरपूर माहिती मिळाली. तो काळ जाणून घ्यायचा असेल, महाभारत जाणून घ्यायचे असेल, महाभारत कसे घडले, महाभारतामध्ये कोणत्या दिवशी काय घडले हे जाणून घ्यायचे असेल तर हे नाटक पाहणे आवश्यक आहे असे ती म्हणाली.

Comments
Add Comment