शमशुद्दीन नसीरुद्दीन आत्तार एखाद्या शाळेची इमारत बंद झाली, तर त्याची बातमी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर झळकते. गावात चर्चा रंगते. पालक चिंतेत पडतात. लोकप्रतिनिधी निवेदने देतात. आंदोलने होतात. पण एखाद्या शाळेत गणित, विज्ञान किंवा इंग्रजीचा शिक्षक नसल्यामुळे संपूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहते, त्यांची स्वप्ने मावळतात, स्पर्धेतील त्यांची पावले मागे पडतात, याची बातमी मात्र कुठेच दिसत नाही. हीच आजच्या शिक्षण व्यवस्थेची सर्वात मोठी शोकांतिका आहे.आपल्या जिल्ह्यातील शाळांमधील उपलब्ध माहितीनुसार पाचवी ते दहावीपर्यंतच्या वर्गांसाठी जवळपास ७५ ते ८० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. विशेषतः गणित, विज्ञान आणि इंग्रजीसारख्या मूलभूत विषयांमध्ये शिक्षकांचा गंभीर तुटवडा आहे. या विषयांमध्ये विद्यार्थ्यांचा मजबूत पाया घातला गेला नाही, तर पुढील उच्च शिक्षणात त्यांना मोठी किंमत मोजावी लागते. हे नुकसान केवळ एका वर्षापुरते मर्यादित राहत नाही; ते त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारे ठरते.आज आपण पटसंख्या कमी झाल्यामुळे बंद होणाऱ्या शाळांबद्दल भावनिक चर्चा करीत आहोत. त्या चर्चेची गरज नक्कीच आहे. कारण प्रत्येक शाळा म्हणजे त्या गावाच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो. त्या इमारतींनी अनेक पिढ्या घडविलेल्या असतात. असंख्य विद्यार्थ्यांची स्वप्ने त्या भिंतींनी पाहिलेली असतात. त्या आठवणींचे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही; परंतु या वास्तवाची दुसरी बाजू आपण तेवढ्याच प्रामाणिकपणे पाहण्यास तयार आहोत का?
शाळा बंद झाली म्हणजे शिक्षण बंद होत नाही. त्या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतात. शिक्षकांचेही समायोजन केले जाते. म्हणजेच शिक्षणाचा प्रवाह सुरूच राहतो. बंद होते ती फक्त एक इमारत. होय, त्या इमारतीशी असलेली भावनिक नाळ तुटते; पण विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत नाही. मात्र रिक्त शिक्षकपदांची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. इथे इमारत उभी असते. वर्ग भरलेले असतात. विद्यार्थी उपस्थित असतात. पालकांच्या अपेक्षा जिवंत असतात. पण शिकविण्यासाठी विषय शिक्षकच नसतो. वर्गात फळा असतो, बाके असतात, पुस्तके असतात, गणवेशातील विद्यार्थी असतात—फक्त शिक्षक नसतो. ही परिस्थिती किती वेदनादायक आहे, याचा विचार आपण कधी केला आहे का? विद्यार्थ्यांना गणित शिकविणारा शिक्षक नाही. विज्ञानातील प्रयोग समजावून सांगणारा शिक्षक नाही. इंग्रजीची भीती दूर करणारा शिक्षक नाही. मग त्या विद्यार्थ्यांचे भविष्य कोण घडवणार? शिक्षक नसलेल्या वर्गातील प्रत्येक दिवस म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील कायमचा गमावलेला दिवस असतो. हा दिवस पुन्हा कधीच परत येत नाही.
आज ग्रामीण भागातील अनेक पालक मोठ्या त्यागाने आपल्या मुलांना शिकवत आहेत. शेतीचे उत्पन्न कमी असले, आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करतात. पण शाळेत विषय शिक्षकच नसेल, तर त्या पालकांच्या आशा कोण पूर्ण करणार? शासनाने पटसंख्येच्या निकषांवर काही शाळांचे समायोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे आर्थिक, प्रशासकीय आणि व्यवस्थापनाचे काही तर्क असू शकतात. त्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते; परंतु त्याच वेळी ज्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या न्यायाचा प्रश्न अधिक गंभीर आहे.
एका बाजूला आपण रिकाम्या इमारती वाचविण्यासाठी झटत आहोत; तर दुसऱ्या बाजूला शिक्षकांशिवाय चालणारे वर्ग मात्र आपल्या संवेदनांपासून दूर राहिले आहेत. हा विरोधाभास आपल्याला अस्वस्थ करणारा नाही का? गावोगावी उभारलेल्या शाळा या केवळ विटा आणि सिमेंटच्या रचना नाहीत. त्या समाजाच्या स्वप्नांचे स्मारक आहेत. त्या इमारतींमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडले आहे. जर त्या इमारतींमध्ये विद्यार्थी कमी झाले असतील, तर त्या इमारती समाजोपयोगी कामांसाठी वापरण्याचे पर्याय नक्कीच शोधता येतील. कौशल्य विकास केंद्र, वाचनालय, प्रशिक्षण केंद्र, डिजिटल शिक्षण केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अशा अनेक उपयुक्त कामांसाठी त्या वापरता येऊ शकतात; परंतु विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने मात्र कोणत्याही परिस्थितीत बंद पडू देता कामा नयेत.
आजची खरी गरज म्हणजे रिक्त पदांवर तातडीने समायोजन करणे. ज्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक आहेत, तेथे योग्य नियोजन करून गरजू शाळांमध्ये त्यांची नियुक्ती करणे. यासाठी संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षण विभाग आणि शासन यांनी एकत्र येऊन संवेदनशीलतेने निर्णय घेण्याची गरज आहे. हा प्रश्न कोणाच्या प्रतिष्ठेचा नाही. हा प्रश्न कोणाच्या अधिकाराचा नाही. हा प्रश्न कोणाच्या विजय-पराजयाचा नाही. हा प्रश्न फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. आज आपण घेतलेला प्रत्येक निर्णय पुढील अनेक वर्षांच्या पिढ्यांवर परिणाम करणार आहे. म्हणूनच रिक्त आणि अतिरिक्त या शब्दांमध्ये संघर्ष शोधण्याऐवजी त्यातून उपाय शोधणे अधिक आवश्यक आहे. अतिरिक्त असलेली मनुष्यबळाची क्षमता जिथे गरज आहे तिथे पोहोचली, तर अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळू शकते. सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांना मनापासून एकच विनंती आहे. या विषयाकडे केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून पाहू नका. प्रत्येक रिक्त पदामागे शेकडो विद्यार्थ्यांची स्वप्ने उभी आहेत. प्रत्येक न भरलेल्या जागेमुळे एखादा विद्यार्थी डॉक्टर, अभियंता, वैज्ञानिक, शिक्षक किंवा अधिकारी होण्याची संधी गमावत असू शकतो. शाळा बंद होण्याची वेदना नक्कीच मोठी आहे; पण शिक्षक नसलेल्या शाळेत विद्यार्थ्यांचे भविष्य हळूहळू बंद होत जाते, ही वेदना त्याहूनही मोठी आहे. आज निर्णय इमारतींचा नाही…. आज निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे आणि भविष्याला कुलूप लागण्यापूर्वी आपण सर्वांनी एकत्र येऊन त्याचे दार उघडणे, हीच काळाची सर्वात मोठी गरज आहे.





