Friday, July 10, 2026

भूकंपाच्या धक्क्यांमुळे भीती

भूकंपाच्या धक्क्यांमुळे भीती

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के बसल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवार, दि. ९ जुलैच्या पहाटे दोन तासांमध्ये चार भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांनी रात्र जागून काढली. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेल्या प्रलयकारी भूकंपाची आठवण यानिमित्ताने काढली जात आहे.

हिगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, कळमनुरी व वसमत तालुक्यात गेल्या सहा वर्षांत ३७ पेक्षा जास्त सौम्य भूकंपाची नोंद झाली आहे. गुरुवारी पहाटे ०१.३७ ते ०३.२३ या दोन तासांमध्ये चार भूकंपाचे धक्के जाणवले. एकाच दिवशी चार धक्के बसण्याची ही हिंगोली जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. पहिला धक्का ४.६ रिश्टर स्केल एवढा होता. या भूकंपाचे केंद्रबिंदू सिर्ली-पांग्रा शिंदे गाव नोंदविण्यात आले. त्याची खोली १० किलोमीटर एवढी दर्शविलेली आहे. ९ जुलै रोजी पहाटे ०१.३७ वाजता हा भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर दुसरा धक्का ३.६ रिश्टर स्केल या क्षमतेचा होता. या धक्क्याचा केंद्रबिंदू काकडधाबा गाव नोंदविण्यात आले. त्याचीही खोली १० किलोमीटर अशी दिसत आहे. भूकंपाचा हा दुसरा धक्का गुरुवारी पहाटे ०२.१५ वाजता जाणवला. त्यानंतर मात्र हिंगोली व नांदेड जिल्ह्यामधील नागरिक प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होते. नागरिकांनी रात्रीच एकमेकांना फोन करून भूकंप झाल्याची खात्री करून घेतली. मराठवाड्यातील चार जिल्ह्यात या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांनी रात्र जागून काढली. भूकंपाचा तिसरा धक्का गुरुवारी पहाटे २ वाजून १७ मिनिटाला जाणवला.

या भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल एवढी नोंदविण्यात आली. त्यानंतर पुन्हा भूकंपाचा चौथा धक्का जाणवला. त्याची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल अशी नोंदविण्यात आली. भूकंपाचे केंद्रबिंदू काकडधाबा गाव हे नोंदविण्यात आले. त्याचीही खोली १० किलोमीटर अशी दर्शविण्यात आली. ९ जुलै रोजी पहाटे ३.२३ वाजता बसलेल्या भूकंपाच्या चौथ्या धक्क्यामुळे मात्र अनेकांनी घराबाहेर अंगणात तसेच रस्त्यावर थांबून रात्र काढली. ११ एप्रिल रोजी हिंगोली जिल्ह्यात ४.७ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्या भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिक अगोदरच घाबरलेले आहेत. कारण चारपेक्षा अधिक तीव्रतेचा भूकंपाचा धक्का हा धोकादायकच मानला जातो. हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे, कळमनुरी तसेच औंढा नागनाथ या परिसराला हे भूकंपाचे धक्के अधिक तीव्रतेने जाणवले. हिंगोली जिल्ह्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात प्रशासनाकडून आपत्तीविषयक पाहणी करण्याची मागणी होत आहे.

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यात हे धक्के जाणवल्याने लोकांनी रात्रभर एकमेकांची चौकशी करत जागून अक्षरशः देवाचे स्मरण केले. रात्रीची वेळ असल्याने प्रशासनाने म्हणावी तशी दखल घेतली नाही. नागरिकांमध्ये प्रचंड भीती असताना देखील कसल्याही प्रकारचे आवाहन करण्यात आले नाही, अशी तक्रार अनेक ग्रामस्थांनी केली. भूकंप किंवा मोठा पाऊस झाला तर कच्च्या घरांना सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे अशा घरात राहणाऱ्यांनी अधिक दक्ष राहणे आवश्यक असते. प्राथमिक माहितीनुसार, कोणतीही जीवित अथवा वित्तहानी भूकंपामुळे झालेली नाही. भूकंपाचे सौम्य धक्के लातूर जिल्ह्यातील काही ठिकाणी जाणवले. लातूर शहर तसेच निलंगा भागात धक्के जाणवल्याची माहिती आहे. तथापि प्राथमिक माहितीनुसार कसलीही जीवितहानी किंवा वित्तहानीची नोंद नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी भूकंपाचे धक्के बसत असताना पटकन मोकळ्या जागेत जावे, विशेषत: कच्चे बांधकाम, (दगड-मातीचे बांधकाम) असलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीची व सूचनांची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे यापूर्वी मोठा भूकंप झाला होता. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. त्या भूकंपाची भीती मराठवाड्यातील नागरिकांमध्ये आजही आहे. जेव्हा जेव्हा भूकंपाचे धक्के बसतात तेव्हा मराठवाड्यात किल्लारीच्या भूकंपाची आठवण काढली जाते. तसेच त्या प्रसंगाचे अनुभव देखील अनेक जण कथन करत असतात. अलीकडच्या काळात मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात अनेकदा भूकंपाचे धक्के बसले. असाच अनुभव नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनाही आलेला आहे. भूकंपाचे धक्के जास्तच बसत असल्याने आता नागरिकांना जास्तच भीती वाटत आहे. किल्लारीच्या भूकंपामुळे काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले होते. त्यामुळे भूकंप हा जास्त वेळ देत नाही, या भीतीने अनेकांना त्रासून सोडले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा