Friday, July 10, 2026

Solapur News : सातारा जिल्ह्यातून परीक्षेसाठी सोलापुरात आलेली २२ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

Solapur News : सातारा जिल्ह्यातून परीक्षेसाठी सोलापुरात आलेली २२ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण (Falatan) तालुक्यात राहणारी २२ वर्षीय विवाहित महिला सोलापुरात परीक्षा देण्यासाठी आल्यानंतर अचानक बेपत्ता (Missing) झाल्याची घटना समोर आली आहे. श्रुती संताजी कदम असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव असून, याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रुती कदम यांची आयटीआयची परीक्षा सोलापूर शहरातील डफरीन चौक परिसरातील परीक्षा केंद्रावर होती. 5 जुलै 2026 रोजी तिचे पती शुभम कदम यांनी तिला सोलापूरमध्ये आणले. परीक्षा असल्याने तिला सात रस्ता परिसरातील मुन्सिपल कॉलनी येथे राहणाऱ्या तिच्या मैत्रीण दिव्या बेरकोल्लू यांच्या घरी सोडण्यात आले. त्यानंतर शुभम कदम हे परत आपल्या गावी गेले.

मात्र, त्यानंतर श्रुती परीक्षा केंद्रावर न जाता मैत्रिणीच्या घरातून बाहेर पडल्याची माहिती समोर आली. बराच वेळ संपर्क न झाल्याने तिचा शोध सुरू करण्यात आला. पतीने सोलापूर शहरातील विविध ठिकाणी तिचा शोध घेतला. कंबर तलाव, नाना-नानी पार्क, सिद्धेश्वर मंदिर परिसर तसेच मध्यवर्ती एसटी बस स्थानक या भागांमध्ये शोध घेण्यात आला. मात्र, तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.

अखेर शुभम कदम यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे.

या प्रकरणात पोलिस मैत्रिणीची चौकशी करत असून, बेपत्ता महिलेच्या मोबाईलचे लोकेशन तपासले जात आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार आर. एन. मनोहर करत आहेत. नागरिकांना संबंधित महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >