Sunday, June 28, 2026

'शुद्धते'चा बुरखा आणि पुरुषी मानसिकतेची झापड

'शुद्धते'चा बुरखा आणि पुरुषी मानसिकतेची झापड

प्रासंगिक-विवेक कांबळे

नमध्ये डेटॉलच्या लाँड्री सॅनिटायझरच्या जाहिरातीवरून सध्या वादळ उठलेले आहे. पण, ही केवळ एका ब्रँडकडून झालेली चूक नाही, तर हजारो वर्षांपासून स्त्रीकडे पुरुषी झापडं लावून पाहणाऱ्या नजरेतील घाण दाखवणारा हा आरसा आहे.जाहिरातीतला पुरुष १० पेक्षा अधिक स्त्रियांशी संबंध ठेवूनही आपल्या होणाऱ्या पत्नीने मात्र 'व्हर्जिन' असावे, अशी अपेक्षा करतो. जी स्त्री आधी कुणासोबत राहिली असेल ती 'प्रदूषित' आणि जी नाही ती 'स्वच्छ'. ही विभागणीच मुळात स्त्रीला माणूस म्हणून नव्हे, तर 'वापरण्याची वस्तू' म्हणून बघण्याच्या विकृत मानसिकतेचे द्योतक आहे.दुहेरी मापदंडाचा हा खेळ नवा नाही. "मी स्वतः व्हर्जिन नसेन, पण माझी होणारी पत्नी व्हर्जिनच असावी," हे वाक्य पुरुषसत्ताक व्यवस्थेचा जाहीरनामाच आहे. पुरुषाचा अनुभव हा 'पराक्रम' ठरतो, त्याचे चारित्र्य कर्तृत्वावर मोजले जाते. पण स्त्रीचे चारित्र्य मात्र तिच्या शरीराशी, 'शुद्धतेशी' बांधले जाते. जाहिरातीत तिची तुलना एखाद्या 'युद्ध करंडका'शी केल्याचे दिसते. करंडक म्हणजे जिंकलेली, न वापरलेली वस्तू. इथे प्रेम, विश्वास, बरोबरी गौण ठरते; महत्त्वाची ठरते ती 'मालकी'. डेटॉलसारखा ब्रँड जेव्हा स्त्रीच्या पूर्वायुष्याला 'प्रदूषण' म्हणतो, तेव्हा तो स्त्री आणि रोगजंतू यांची तुलना करतो. ही तुलना तर हीन आहेच, पण त्याहून धक्कादायक आहे तो तर्क. तो म्हणजे, 'प्रदूषित' करणारा पुरुष आहे, पण दोष मात्र स्त्रीच्या माथी. पुरुष १० जणींशी संबंध ठेवूनही 'अनुभवी' ठरतो, पण त्याच्या संपर्कात आलेली स्त्री 'अपवित्र' ठरते? जणू काही पुरुष हा खुद्द डेटॉल साबणच आहे. तो घाण काढतो, पण स्वतः घाण होत नाही, असा त्यातून अर्थ निघतो. ही मानसिकता काही एका दिवसात जन्माला आलेली नाही. कुटुंबव्यवस्थेत मुलीच्या चारित्र्यावर घराण्याची 'इभ्रत' तोलली जाते. सिनेमात खलनायकाचा स्पर्श झाला तरी नायिका 'भ्रष्ट' ठरते. भाषेतही 'खराब झालेली', 'हात लावलेली' ही विशेषणे फक्त स्त्रीसाठी राखीव आहेत. या साऱ्याचा परिणाम म्हणजे स्त्रीच्या निवडीचे स्वातंत्र्य हिरावले जाते, 'इभ्रती'च्या नावाखाली हिंसा घडते आणि पुरुषही 'मालक' असण्याच्या अहंकारात माणूसपण हरवून बसतो. डेटॉलने माफी मागून जाहिरात मागे घेतली, हे स्वागतार्हच. कंपनीचा हेतू 'लिंगभेदावर प्रहार' करण्याचा होता असे त्यांचे म्हणणे. पण हेतू चांगला असून चालत नाही, मांडणीही संवेदनशील हवी. जाहिरातीच्या शेवटी मुलगी म्हणते, "असे विषारी पुरुष जंतूंसारखे असतात". विषारी विचारांवर घाला घालायचा असेल, तर विषारी भाषाच वापरून कसे चालेल?मुद्दा एकच आहे, खरा डेटॉल कशासाठी हवा? कपड्यांवरच्या डागांसाठी नाही, तर मनात साचलेल्या 'शुद्धतेच्या' या विकृत कल्पनेला साफ करण्यासाठी. स्त्री 'प्रदूषित' नसते; प्रदूषित असते ती पुरुषी नजर जी तिच्याकडे माणूस म्हणून पाहू शकत नाही.जोवर समाज स्त्रीच्या चारित्र्याला 'शुद्ध-अशुद्ध' या तराजूत मोजत राहील, तोवर कोणताही साबण आपल्याला स्वच्छ करू शकणार नाही. कारण खरी घाण ही कपड्यांवर नसते, ती विचारांमध्ये असते. आणि त्या विचारांची साफसफाई करण्याची जबाबदारी केवळ एका कंपनीची किंवा एखाद्या जाहिरातीची नसून आपल्या सर्वांचीच आहे.
Comments
Add Comment