Friday, June 26, 2026

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम

रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि संस्कृतीशी जोडलेले पीक असलेल्या भातशेतीला गेल्या पाच वर्षांत (२०२० ते २०२५) खारजमीन क्षेत्रातील वाढ, वाढते नागरिककरण , निसर्गाच्या लहरीपणा आणि हवामान बदलाचा प्रचंड फटका बसला आहे. मुसळधार पाऊस, अरबी समुद्रातील चक्रीवादळे आणि ऐन काढणीच्या वेळी येणारा अवकाळी पाऊस यामुळे कोकणातील 'भाताचे कोठार' आता गंभीर संकटात सापडले आहे. कृषी विभागाच्या अंतिम आगाऊ अंदाजांच्या कलानुसार आणि प्रादेशिक संशोधन केंद्रांच्या अहवालांनुसार, कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत भात लागवडीखालील क्षेत्र, उत्पादकता आणि एकूण उत्पादन यात सातत्याने घसरण हाेत आहे. २०२०-२१ मध्ये कोकणात सुमारे ३.६५ ते ३.७० लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लावणी केली जात होती, ती २०२४-२५ मध्ये घटून ३.२० ते ३.२५ लाख हेक्टरावर आली आहे. म्हणजेच गेल्या ५ वर्षांत भातशेतीचे क्षेत्र १० ते १२ टक्क्याने घटले असून, एकूण तांदूळ उत्पादनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत मोठी घट झाली आहे.

मान्सूनचे बदलते चक्र आणि रेनफॉल पॅटर्न

कोकणात सरासरी ३००० ते ३५०० मिमी पाऊस पडतो, पण त्याचे वार्षिक वितरण कमालीचे बिघडले आहे. जूनच्या सुरुवातीला कडक ऊन किंवा अतिवृष्टी होते, ज्यामुळे भाताची कोमल रोपे एकतर करपतात किंवा वाहून जातात. जुलै-ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड पडल्यास पिकाची वाढ खुंटते. भात पीक जेव्हा लोंब्या धरण्याच्या संवेदनशील टप्प्यात असते, तेव्हा पडणारा कडक खंड किंवा अतिवृष्टी परागीभवन प्रक्रियेत अडथळा आणते.

ऐन कापणीच्या वेळी अवकाळी आणि चक्रीवादळे

२०२० ते २०२५ या काळात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या परतीच्या पावसाचा जोर आणि अरबी समुद्रातील 'निसर्ग', 'तौक्ते' यांसारख्या चक्रीवादळांची वारंवारता वाढली आहे. भात कापणीवर आलेला असताना किंवा शेतात कापून ठेवलेला असताना झालेल्या अतिवृष्टीमुळे दाणे काळे पडतात, त्यांना कोंब फुटतात आणि लोंब्या शेतातच गळून पडतात. यामुळे पारंपरिक प्रति हेक्टर २५ ते २८ क्विंटल मिळणारी उत्पादकता थेट १५ ते १८ क्विंटलवर घसरली आहे.

जमिनीची धूप आणि समुद्राची क्षारता

समुद्र किनाऱ्यालगतच्या भागांत, विशेषतः रायगड आणि सिंधुदुर्गच्या खाडी भागांत चक्रीवादळांमुळे समुद्राचे खारे पाणी शेतात शिरण्याचे प्रमाण वाढले आहे. समुद्र संरक्षक बंधाऱ्यांची वेळेत दुरुस्ती न केल्याने रायगडमधील पेण, पनवेल आणि अलिबाग तालुक्यांत हजारो हेक्टर 'खाजण जमीन' नापीक बनली असून खार जमिनींवरील भात पिकाची उत्पादकता कमालीची घटली आहे. जागतिक तापमान वाढ आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव हवामानातील वाढती आर्द्रता आणि अचानक वाढणारे तापमान यामुळे भात पिकावर 'करपा', 'लष्करी अळी' आणि 'तुडतुडे' या कीड-रोगांचा प्रादुर्भाव गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे पिकाचे अपरिमित नुकसान होते आणि कीटकनाशकांचा खर्च वाढून शेती तोट्यात जाते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा