Thursday, June 25, 2026

Nashik : येवला नगरपरिषदेची प्लास्टिक बंदीविरोधात धडक कारवाई; 44 किलो प्लास्टिक जप्त

Nashik : येवला नगरपरिषदेची प्लास्टिक बंदीविरोधात धडक कारवाई; 44 किलो प्लास्टिक जप्त

नाशिक /येवला : राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी येवला नगरपरिषदेच्या (Yeola Municipal Council) वतीने पुन्हा एकदा शहरात धडक कारवाई करण्यात आली. मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडे बाजार परिसरासह शहरातील विविध भागांत ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व इतर प्लास्टिक साहित्याचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

नगरपरिषद पथकाने एकूण 44 किलो प्लास्टिक जप्त केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ₹20,500 इतका दंड वसूल करण्यात आला. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून नाले, गटारी व जलवाहिन्या तुंबण्याच्या समस्या निर्माण होतात. तसेच जनावरांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याने शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक व व्यापाऱ्यांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे यांनी सांगितले की, प्लास्टिक बंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नगरपरिषदेची कारवाई यापुढेही नियमितपणे सुरू राहणार आहे. व्यापारी व नागरिकांनी बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर टाळून नगरपरिषदेच्या कारवाईस सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले. या मोहिमेत नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील अधिकारी दीपक जावळे संदीप बोढरे लखन बाकळे वृषाली अहिरे राहुल जाधव आदींनी सहभाग घेतला. शहर स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लग्नासाठी आता एसटी बस सवलतीच्या दरात

ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आता लग्नकार्यासाठी शेतकरी कुटुंबांना एसटी बस सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाणार असून, ही बस थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा मानस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. विधान परिषदेत एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

ग्रामीण भागात लग्न किंवा शुभकार्यासाठी एसटीच्या अभावामुळे अनेकदा वऱ्हाडी मंडळी ट्रक, डंपर किंवा इतर मालवाहू वाहनांचा वापर करतात. यामुळे जीवघेणे अपघात घडतात. नुकताच डहाणू तालुक्यात साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावर भाष्य करताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, गरीब शेतकरी कुटुंबांना होणारा हा धोका टाळण्यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे. लवकरच ताफ्यात समाविष्ट होणाऱ्या नवीन बसेसच्या माध्यमातून ही विशेष सेवा राबवली जाणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा