Tuesday, June 23, 2026

Gold and silver Rate : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना मोठा दिलासा

Gold and silver Rate : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना मोठा दिलासा

Gold and silver Rate : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या वाढीमुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी सुवर्ण बाजारपेठ उघडताच सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोन्याचे आजचे दर

जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून दरांमध्ये मोठी चढ-उतार सुरू आहे. शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख ५० हजार १७४ रुपयांवर स्थिर होते. त्यानंतर सोमवारी बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाल्याने सोन्याच्या दरात १ हजार ७५१ रुपयांची वाढ झाली आणि सोने प्रति १० ग्रॅम १ लाख ५१ हजार ९२५ रुपयांपर्यंत पोहोचले. मात्र, ही तेजी केवळ एक दिवसच टिकली. मंगळवारी सकाळी बाजारपेठ सुरू होताच सोन्याच्या दरात पुन्हा १ हजार ७५१ रुपयांची घसरण झाली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर पुन्हा जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख ५० हजार १७४ रुपयांवर आले. त्यामुळे लग्नसराई, गुंतवणूक किंवा दागिने खरेदीची तयारी करणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

चांदीत मोठी घसरण

सोनेप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. शनिवारी चांदीच्या दरात २ हजार ६० रुपयांची घट झाल्याने ती जीएसटीसह प्रति किलो २ लाख ४४ हजार ११० रुपयांवर आली होती. त्यानंतर सोमवारी अचानक तेजी आल्याने चांदीच्या दरात ५ हजार १५० रुपयांची वाढ झाली आणि दर प्रति किलो २ लाख ४९ हजार २६० रुपयांपर्यंत पोहोचले.

मात्र, मंगळवारी बाजारपेठ उघडताच चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली. एका दिवसात तब्बल ९ हजार २७० रुपयांनी दर कमी झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २ लाख ३९ हजार ९९० रुपयांवर आली. त्यामुळे गुंतवणूकदारांसह सराफ व्यावसायिक आणि ग्राहकांमध्येही या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू आहे.

अमेरिकेच्या निर्णयाचा जागतिक बाजारावर परिणाम

दरम्यान, जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या एका महत्त्वाच्या घडामोडीमुळेही सोने-चांदीच्या किमतींवर दबाव निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेने इराणला ६० दिवसांची तात्पुरती सूट दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे इराणला कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवून ते आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करण्याची संधी मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या पुरवठ्याबाबत सकारात्मक संकेत मिळाल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय मानल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीमधून काही प्रमाणात माघार घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही धातूंच्या किमतींमध्ये घसरण झाली असल्याचे बाजार विश्लेषकांचे मत आहे.

आता आगामी काही दिवसांत आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरची स्थिती, कच्च्या तेलाचे दर आणि जागतिक गुंतवणूकदारांचा कल यावर सोने-चांदीच्या किमतींची पुढील दिशा ठरणार आहे. त्यामुळे दर आणखी खाली येतात की पुन्हा तेजीचा मार्ग पकडतात, याकडे ग्राहक, गुंतवणूकदार आणि सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >