Monday, June 22, 2026

Nashik : नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी महावितरणाची 'तारीख पे तारीख'; मंत्री भुजबळांच्या शिफारस पत्राला महावितरणकडून केराची टोपली

Nashik : नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी महावितरणाची 'तारीख पे तारीख'; मंत्री भुजबळांच्या शिफारस पत्राला महावितरणकडून केराची टोपली

Nashik : लोकप्रतिनिधींच्या पत्रालाही किंमत नाही आणि सामान्य जनतेच्या हक्काचीही दखल घेतली जात नाही, असा संतापजनक प्रकार येवला तालुक्यात समोर आला आहे. सायगावजवळील निमदरी वस्ती परिसरातील नवीन ट्रान्सफॉर्मर (डीपी) बसवण्याचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून रखडला असून, महावितरण प्रशासनाच्या उदासीन कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.

८५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचे दोन वर्षांपासून हेलपाटे

गेल्या दोन वर्षांपासून केवळ आश्वासनांवर वेळ मारून नेणाऱ्या महावितरण प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या समस्येचे विदारक चित्र म्हणजे, सायगाव येथील निमदरी वस्तीतील ८५ वर्षीय ज्येष्ठ शेतकरी रत्नाकर सयाजी भालेराव हे गेल्या दोन वर्षांपासून न्याय मिळावा म्हणून दर मंगळवारी माजी मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात पाठपुरावा करत आहेत. वयाच्या या टप्प्यावरही त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत, मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

मंत्री भुजबळांच्या शिफारस पत्राला केराची टोपली

विशेष म्हणजे, राज्याचे माजी मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी या प्रश्नाची दखल घेत महावितरण प्रशासनाला शिफारसपत्र दिले होते. मात्र, या पत्राचीही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी भुजबळ यांनी दिलेले शिफारसपत्र त्यांच्याच संपर्क कार्यालयात परत करून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. "जर मंत्र्यांच्या पत्राची प्रशासनाकडे किंमत नसेल, तर आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांचे काय ? दोन वर्षांपासून आम्ही केवळ आश्वासनांवर दिवस काढत आहोत. आता सहनशीलतेचा अंत झाला आहे. महावितरणने तातडीने डीपी बसवला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू," असा इशारा ज्येष्ठ शेतकरी रत्नाकर सयाजी भालेराव यांनी दिला.

आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवे

सध्याच्या ट्रान्सफॉर्मरपासून निमदरी वस्ती सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होत असून, शेतीपंप चालवणे अडचणीचे झाले आहे. परिणामी पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवे," अशा शब्दांत निमदरी दिला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणला इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

निमदरी वस्ती परिसरात तातडीने नवीन ट्रान्सफॉर्मर (डीपी) बसवण्यात यावा.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा.

दोन वर्षापासून दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी.

वीज समस्येमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी.

या आंदोलनात अशोक ढाकणे, अरुण भालेराव, कानिफनाथ भालेराव, अरुण गायकवाड, काशीराम गायकवाड, संजय ठोंबरे, मटू ढाकणे, दिलीप जेजुरकर, आण्णा गायकवाड, एकनाथ भालेराव, संजय भालेराव, पिनू देवरे, बापू देवरे, तुषार भालेराव, नितीन भालेराव, कपिल भालेराव, राजेंद्र भालेराव यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा