Monday, June 22, 2026

NEET UG Re-Exam 2026 : फेरपरीक्षेत विद्यार्थ्यांची मोठी गैरहजेरी; नाशिकमध्ये हजाराहून अधिक उमेदवार अनुपस्थित

NEET UG Re-Exam 2026 : फेरपरीक्षेत विद्यार्थ्यांची मोठी गैरहजेरी; नाशिकमध्ये हजाराहून अधिक उमेदवार अनुपस्थित

NEET UG Re-Exam 2026 : वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'नीट यूजी' (NEET UG) फेरपरीक्षा रविवारी (दि. २१) जिल्ह्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शांततेत पार पडली. मात्र या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीपेक्षा गैरहजेरीचीच अधिक चर्चा रंगली. मागील परीक्षेच्या तुलनेत यावेळी अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल चौपट वाढल्याचे चित्र समोर आले आहे.

पेपरफुटीच्या वादानंतर पुन्हा आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातील २१ परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील केंद्रांवर नोंदणी केलेल्या ९ हजार १११ विद्यार्थ्यांपैकी केवळ ८ हजार ६३ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले, तर तब्बल १ हजार ४८ विद्यार्थी गैरहजर राहिले. विशेष म्हणजे, मे महिन्यात झालेल्या मूळ परीक्षेत केवळ २७३ विद्यार्थी अनुपस्थित होते. त्यामुळे फेरपरीक्षेतील वाढलेली गैरहजेरी प्रशासनासाठीही चिंतेचा विषय ठरली आहे

प्रवेशासाठी कडक सुरक्षा तपासणी

विद्यार्थ्यांना दुपारी १२.३० वाजल्यापासून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात आली होती. दुपारी १.३० वाजता प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याची डिजिटल आणि बायोमेट्रिक पडताळणी करण्यात आली. मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करूनच विद्यार्थ्यांना आत प्रवेश देण्यात आला. मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, दागिने, मोठ्या हेअरपिन्स तसेच पेनसारख्या वस्तूही बाहेरच जमा करण्यात आल्या. विद्यार्थिनींना गळ्यातील सोन्याच्या साखळ्या व इतर धातूच्या वस्तू काढून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती.

प्रश्नपत्रिका बँकेच्या लॉकरमध्ये

मागील पेपरफुटीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यावेळी प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले होते. प्रश्नपत्रिकांचे दोन स्वतंत्र संच तयार करून ते बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होते. परीक्षेच्या दिवशी पहाटे केंद्रीय स्तरावरून कोणता संच वापरायचा याबाबत सूचना प्राप्त झाल्यानंतरच प्रश्नपत्रिकांचे जिल्ह्यातील विविध केंद्रांवर वितरण करण्यात आले. त्यामुळे प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने कोणतीही तडजोड केली नसल्याचे दिसून आले.

विद्यार्थ्यांचा सूर : प्रश्नपत्रिका अधिक कठीण

सायंकाळी ५.१५ वाजता परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अनेक विद्यार्थ्यांनी यंदाची प्रश्नपत्रिका मूळ परीक्षेच्या तुलनेत अधिक कठीण असल्याचे सांगितले. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांतील प्रश्न तुलनेने सोपे वाटले असले तरी भौतिकशास्त्राच्या प्रश्नांनी विद्यार्थ्यांची चांगलीच परीक्षा घेतल्याची प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली. मात्र यावेळी देण्यात आलेल्या अतिरिक्त १५ मिनिटांच्या वेळेमुळे प्रश्न सोडविण्यास काही प्रमाणात मदत झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.परीक्षा संपताच गंगापूर रोडवर वाहतूककोंडी

परीक्षा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि पालक एकाच वेळी केंद्राबाहेर पडल्याने गंगापूर रोड परिसरात वाहतूक विस्कळीत झाली. सरकारवाडा पोलिस स्टेशन ते मॅरेथॉन चौक या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही काळ या भागात वाहतूककोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती.

जिल्ह्यातील एकूण आकडेवारी

एकूण नोंदणीकृत विद्यार्थी : ११,१६२

परीक्षेला उपस्थित : १०,०२९

अनुपस्थित विद्यार्थी : १,१३३

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा