Saturday, June 20, 2026

एकेकाचे स्वभाव

एकेकाचे स्वभाव

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर मानुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजात वावरताना आपल्याला विविध स्वभावाची माणसे भेटतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत, आवडी-निवडी आणि वागणूक वेगवेगळी असते. म्हणूनच “व्यक्ती तितक्या प्रकृती” असे म्हटले जाते.काही व्यक्ती शांत, संयमी व समंजस असतात, तर काही उत्साही, बोलक्या आणि मनमिळावू असतात. काही जण मेहनती, प्रामाणिक व शिस्तप्रिय असतात, तर काही जण हट्टी किंवा चटकन रागावणारे असतात. प्रत्येकाच्या स्वभावामागे त्याचे संस्कार, कुटुंब, वातावरण, शिक्षण आणि अनुभव यांचा प्रभाव असतो.एखाद्या व्यक्तीचा स्वभाव समजून घेणे आणि त्याचा आदर करणे हे चांगल्या नातेसंबंधांसाठी आवश्यक असते. इतरांच्या स्वभावातील उणिवांवर टीका करण्याऐवजी त्यांच्या चांगल्या गुणांचा स्वीकार केला पाहिजे. सहनशीलता, समजूतदारपणा आणि परस्पर आदर यांमुळे समाजात सौहार्द निर्माण होते. विद्यार्थ्यांनीही इतरांच्या स्वभावाचा आदर करावा. मित्रमैत्रिणींशी प्रेमाने वागावे, मतभेद झाल्यास शांतपणे संवाद साधावा आणि सहकार्याची भावना ठेवावी. त्यामुळे मैत्री दृढ होते व व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. शेवटी, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असला तरी सर्वांशी प्रेम, आदर आणि समंजसपणे वागणे हीच खऱ्या अर्थाने चांगल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. विविध स्वभावाच्या व्यक्तींना समजून घेतल्यास जीवन अधिक आनंदी आणि सुखकर बनते. विविधतेची निसर्गात लयलूट असते. दगड, पशू, पक्षी, झाडेझुडपे, फळेफुले - त्यांतही रूप, गंध, रंग यांची किती विविधता! विविधता हा निसर्गाचा आत्माच! माणसांचंही असंच आहे. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना ! माणसांचे स्वभाव किती वेगवेगळे!! चांगला आणि वाईट असेच खरे तर विभाजन होईल. दुसऱ्याचं दुःख पाहून कष्टी होणारे, सर्वांचं कल्याण चिंतणारे संत चांगले, तर दुसऱ्याचं दुःख पाहून आनंदी होणारे, दुसऱ्याचं वाईट चिंतणारे, जुलमी, पिडा देणारे वाईट. उमदा, कोता, दिलदार, कुजका, दुष्ट, प्रेमळ, रागीट, गोड, लाघवी, बडबड्या, घुमा, उधळ्या, कंजूष, मानी, लबाड, वेंधळा, करडा, विसराळू - स्वभावाच्या किती परी!मृत्यूलाही ओशाळायला लावणारा संभाजी मानी, तर औरंगजेबाच्या हातावर तुरी देणारा शिवाजी धोरणी! तलवार गाजवणारा पहिला बाजीराव धाडसी, तर जेवणावळी गाजवणारा दुसरा बाजीराव आळशी, पळपुटा. प्रश्नाला उत्तर म्हणून प्रश्नच विचारणारा व. पु. काळ्यांच्या गोष्टीतला जोशी भांडखोर, तर पैशाची व रूपाची श्रीमंती असूनही गरीब साध्या इंदूशी आणि लेखकाशी मैत्रीचा धागा राखणारा पु. लं. चा नंदा प्रधान वरून कोरडा पण अंतर्यामी हळवा. करून सवरून “तो मी नव्हेच” म्हणून सर्वांना टोप्या घालणारा अत्र्यांचा लखोबा लोखंडे बेरकी, तर स्मरणासाठी उपरण्याला गाठी मारणारा व कुठली गाठ कशाची याचेच विस्मरण होणारा गडकऱ्यांचा गोकुळ विसरभोळा. “दुरितांचे तिमिर जावो” म्हणत जगणारा बाळ कोल्हटकरांचा दिगू साधा, सरळ, भोळा; तर श्री. ना. पेंडशांचा “गारंबीचा बापू” अफाट. जग हे माणसांच्या स्वभावांचं म्युझियमच! “स्वभावो दुरतिक्रमः!” “स्वभावाला औषध नाही” असं म्हणतात. जन्मतः आपण तसे असतो का? स्वभावाला वारसा असतो का? कसं शक्य आहे? मग स्वभावांची घराणी झाली असती! सूर्यापोटी शनी आले नसते. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे हेच दिसते. परिस्थिती-संस्काराने स्वभाव घडत वा बिघडत जातात. एकदा का ते पक्के झाले की “वळणाचे पाणी”, “कुत्र्याचे शेपूट”, “मूळ स्वभाव जाईना” म्हणतात. कृती, सवयी, गुण, अवगुण यांची स्वभावाशी सांगड घालतात. मूलतः सारे एका माणसात असतेच. म्हटलंच आहे - “वाईट आणि चांगला स्वभाव असे आपला, कधी एक दिसतो दुसरा लपून असतो, माणूस इथेच फसतो.” कृती कधी कधी स्वभावाविरुद्ध असते. सवयी अनुकरणप्रियतेने येतात, त्या बदलतातही. स्वभाव हा अनेक गुणावगुणांचा गुच्छ असतो. ज्याचं प्रमाण जास्त, तो त्याचा स्वभाव म्हटला जातो. दुष्ट, क्रूर, वाईट दरोडेखोराच्या मुलांना त्यांचा बाप प्रेमळच वाटतो. मला तुसडा वाटणारा तुम्हाला सडेतोड, बाणेदार वाटतो. दिलदार हा बावळट, भोळसट वाटतो. दिलदार, हौशी, आनंदी, मानी मिळून उमदा स्वभाव होतो. तसा अनेक गुणांचा समुदाय एका स्वभावाच्या पोटी असतो. परिस्थिती किंवा संस्कार ही एका मर्यादेपर्यंतच त्याला कारणीभूत होतात. मूळ स्वभाव हा त्या पलीकडचा आहे. “स्वभावो न उपदेशेन कर्तुम् अन्यथा, सुतप्तस्य अपि पानीयं पुनर्गच्छति शीतताम्.” पाणी खूप तापवलं तरी पुन्हा थंड होतं. “असतो एकेकाचा स्वभाव” म्हणून ते आपल्याला स्वीकारावंच लागतं!

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा