Thursday, June 18, 2026

'उबाठा'च्या सर्व ६ बंडखोर खासदारांना 'वाय+' दर्जाची सुरक्षा

'उबाठा'च्या सर्व ६ बंडखोर खासदारांना 'वाय+' दर्जाची सुरक्षा

मुंबई : उबाठा गटातील सर्व ६ बंडखोर खासदारांना 'वाय+' दर्जाची(Y Plus Security) विशेष सुरक्षा व्यवस्था मंजूर करण्यात आली आहे. फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात उमटू शकणाऱ्या प्रतिक्रिया आणि या खासदारांच्या जीवाला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन गृह विभागाने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा सुरक्षा यंत्रणांना वायरलेस संदेश पाठवून या सर्व नेत्यांना चोवीस तास कडक सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.

सुरक्षा देण्यात आलेल्या खासदारांमध्ये संजय देशमुख (यवतमाळ), संजय जाधव (परभणी), संजय दिना पाटील (मुंबई उत्तर-पूर्व), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), ओमराजे निंबाळकर (धाराशिव) आणि भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) या ६ नेत्यांचा समावेश आहे. गुप्तवार्ता विभागाच्या गोपनीय अहवालानंतर गृह विभागाने या खासदारांच्या सुरक्षेचे तातडीने मूल्यांकन केले.त्यानुसार, संबंधित जिल्ह्यातील पोलीस यंत्रणांनी स्थानिक परिस्थिती आणि संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन या खासदारांच्या दौऱ्यांदरम्यान कडक बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, पुढील जिल्हा किंवा आयुक्तालय स्तरावरील सुरक्षा समितीच्या बैठकीत या खासदारांच्या सुरक्षेचा पुन्हा आढावा घेतला जाईल. त्यानुसार ही सुरक्षा कायम ठेवणे, वाढवणे किंवा कमी करण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असेही या निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे.

काय असते 'वाय+' सुरक्षा श्रेणी?

'वाय+' सुरक्षा श्रेणी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या श्रेणीअंतर्गत संबंधित व्यक्तीला धोक्याच्या आकलनानुसार विशेष सशस्त्र सुरक्षा कर्मचारी आणि वैयक्तिक सुरक्षा अधिकारी पुरवले जातात.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >