Wednesday, June 17, 2026

Kanjurmarg Dumping Ground : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर साडेतीन हजार झाडांची लागवड

Kanjurmarg Dumping Ground : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर साडेतीन हजार झाडांची लागवड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घनकचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधांचे हरित आणि शाश्वत परिसंस्थेमध्ये रूपांतर करण्याच्या उद्देशाने कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडमध्ये १६ हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अंतर्गत आतापर्यंत साडेतीन हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षाच्या लागवडीमुळे तसेच इतर उपाययोजनांमुळे कांजूरमार्गमधील दुर्गंधीचा प्रमाण कमी झाल्याचे बोलले जात आहे.

घनकचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधांचे हरित आणि शाश्वत परिसंस्थेमध्ये रूपांतर करण्याच्या उद्देशाने कांजूरमार्ग क्षेपणभूमी परिसरात १६ हजार १४४ नवीन वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये सातपेक्षा अधिक स्थानिक व पर्यावरणास अनुकूल वृक्षप्रजातींचा समावेश असेल. याठिकाणी आधीपासून अस्तित्वात असलेल्या १२,८०० वनस्पतींसोबत ही वृक्षलागवड करण्यात येणार आहे. मुंबईच्या हरित क्षेत्रात मोठी भर पाडण्याच्या दृष्टीकोनातून ही वृक्ष लागवड केली जात आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या वृक्ष लागवडीला सुरुवात करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ६१०० वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्यातील आतापर्यंत साडेतीन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. तर उर्वरीत झाडांची लागवड जूनपर्यंत केली जाणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा