Thursday, June 18, 2026

Maharashtra Politics : नाशिक आणि भंडाऱ्यात १०० टक्के मतदान

Maharashtra Politics : नाशिक आणि भंडाऱ्यात १०० टक्के मतदान

विधानपरिषदेच्या ११ जागांचा २२ जूनला निकाल; बनावट मतपत्रिकेमुळे नाशिकमध्ये काही काळ संभ्रम

मुंबई : राज्यात एकीकडे उबाठा गटाच्या खासदार फुटीवरून प्रचंड गदारोळ सुरू असतानाच, दुसरीकडे विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी गुरुवारी (१८ जून) शांततापूर्ण मतदान पार पडले. राज्यातील एकूण १७ जागांपैकी ६ जागांवर महायुतीचे उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित ११ जागांसाठी ही मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये नाशिक आणि

">भंडारा-गोंदिया मतदारसंघात मतदारांनी १०० टक्के मतदानाचा हक्क बजावला. गुरुवारी दुपारी ४ वाजता मतदान संपल्यानंतर सर्व मतपेट्या स्ट्राँग रूमकडे रवाना करण्यात आल्या असून, येत्या सोमवारी म्हणजेच २२ जून रोजी या निवडणुकीची मतमोजणी होऊन चित्र स्पष्ट होणार आहे.

नाशिक मतदारसंघात मतदानाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच, समाजमाध्यमांवर 'पसंती क्रमांक एक-गोकुळ गिते' अशी एक बनावट मतपत्रिका प्रसारित झाली. यामुळे महायुतीचे नियोजन कोलमडते की काय, अशी भीती निर्माण झाल्याने भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (girish mahajn) यांनी तातडीने सूत्रे हाती घेतली. त्यांनी गणेश गिते (ganesh gite) आणि गोकुळ गिते यांना जाहीर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. यानंतर गिते बंधूंनी माध्यमांसमोर येत, "आम्ही महायुतीचा धर्म पाळत निवडणूक आधीच सोडली आहे, आमचा प्रचारही बंद होता. कोणीतरी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्यासाठी हा खोडसाळपणा केला आहे," असे जाहीर आवाहन मतदारांना केले.

 

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसमधील अंतर्गत यादवी आणि बेबनाव उघडपणे चव्हाट्यावर आला. काँग्रेस पक्षाने आपल्या सदस्यांना या मतदानात तटस्थ राहण्याचा व्हीप बजवला होता. मात्र, काँग्रेसच्या तब्बल ९५

">नगरसेवकांनी पक्षादेश धुडकावून लावत मतदानात भाग घेतला. तिवसा येथील १२, अमरावतीचे ११ आणि दर्यापूर येथील १ सदस्य वगळता इतर सर्वांनी मतदान केले. काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख हे ५ जूनपासून आजारी असल्याने रुग्णालयात दाखल आहेत. उमेदवाराच्या अनुपस्थितीत पक्षाने घेतलेला तटस्थतेचा निर्णय सदस्यांनीच पायदळी तुडवल्यामुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली आहे. येथे भाजपचे प्रवीण पोटे(pravin pote) यांनी तिसऱ्यांदा विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

सातारा-सांगलीत ९९.८९ टक्के मतदान

सांगली-सातारा मतदारसंघात अत्यंत शांततेत ९९.८९ टक्के मतदान पार पडले. सातारा (satra) जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या जुन्या गोंधळाची पार्श्वभूमी लक्षात घेता, प्रशासनाने या वेळी १२ ही मतदान केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या जागेवर भाजपचे धैर्यशील कदम मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा दावा महायुतीने केला आहे, तर महाविकास आघाडीने येथे राजकीय 'चमत्कार' होईल, असा प्रतिदावा केला आहे. कोणत्या मतदारसंघात किती मतदान?

नाशिक : १०० टक्के भंडारा - गोंदिया : १०० टक्के सांगली - सातारा : ९९.८९ टक्के परभणी - हिंगोली : ९९.७८ टक्के सोलापूर : ९९.६८ टक्के धाराशिव - लातूर - बीड : ९९.४९ टक्के संभाजीनगर - जालना : ९८.९० टक्के नागपूर : ९८.४४ टक्के जळगाव : ९७.७८ टक्के अमरावती : ९४.६८ टक्के

६ जागा आधीच बिनविरोध

या निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यापूर्वीच महायुतीने आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीच्या जोरावर ६ जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. यामध्ये ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर, पुणे आणि अहिल्यानगर या जागांचा समावेश आहे. त्यामुळे महायुतीचे पारडे आधीच जड असून, २२ जूनच्या निकालात उर्वरित ११ जागांवर नेमका कोणाचा वरचष्मा राहतो, यावर आगामी राजकीय गणिते अवलंबून असतील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >