Wednesday, August 19, 2026

Daund electricity two brother die : दौंडमध्ये काळीज पिळवटणारी घटना; विजेचा धक्का बसून दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू, आई सुदैवाने बचावली

Daund electricity two brother die : दौंडमध्ये काळीज पिळवटणारी घटना; विजेचा धक्का बसून दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू, आई सुदैवाने बचावली

पुणे : पावसाळ्याच्या दिवसांत विजेच्या उपकरणांबाबत सुरक्षितता बाळगणे किती गरजेचे आहे, याचा एक अत्यंत हृदयद्रावक प्रत्यय पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून समोर आला आहे. राहू परिसरातील सोनवणेमळा येथे घरगुती कामादरम्यान विजेचा तीव्र धक्का बसून दोन तरुण चुलत भावांचा नाहक बळी गेला आहे. या भीषण अपघातातून मुलांची आई सुदैवाने बालंबाल बचावली असली, तरी दोन ऐन तारुण्यातील मुलांचा मृत्यू झाल्याने भोईटे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात भावाचाही अंत

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल भोईटे यांच्या घरी सकाळी घरगुती विजेचे काही काम सुरू होते. याच दरम्यान ओम भोईटे या तरुणाला अचानक जिवंत वीजप्रवाहाचा जोरदार झटका बसला. ओमला विजेच्या विळख्यात अडकलेले पाहताच, शेजारीच असलेला त्याचा चुलत भाऊ रोहित भोईटे हा क्षणाचाही विचार न करता मदतीसाठी पुढे धावला. मात्र, दुर्दैवाने ओमला सोडवण्याच्या प्रयत्नात रोहितलाही विजेचा तीव्र झटका बसला आणि दोघेही जागीच निष्प्राण झाले.

आईने मारली मदतीसाठी धाव; डॉक्टरांकडून मृत घोषित

दोन्ही मुलांना विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच त्यांच्या आईनेही अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत मुलांच्या बचावासाठी धाव घेतली. मात्र, सुदैवाने त्या वीजप्रवाहाच्या थेट संपर्कात आल्या नाहीत आणि थोडक्यात बचावल्या. घटनेनंतर घरातील मंडळींनी व ग्रामस्थांनी दोन्ही तरुणांना तातडीने यवत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती ओम आणि रोहित या दोघांनाही मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा