Tuesday, June 16, 2026

भटकंती : आत्मशोधाची मुक्त वाट

भटकंती : आत्मशोधाची मुक्त वाट

प्रवास-स्वाती जोशी भटकंती म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नव्हे; ती मनाच्या, विचारांच्या आणि आत्म्याच्या प्रवासाची एक गूढ अनुभूती असते. काही लोक जग पाहण्यासाठी प्रवास करतात, तर काही जण त्या प्रवासातून स्वतःला समजून घेण्यासाठी प्रवास करतात. माझ्यासाठी ‘भटकंती’ म्हणजे कोणत्याही बंधनांशिवाय, कोणत्याही ठरावीक ध्येयाशिवाय निसर्गाच्या कुशीत स्वतःला मुक्त सोडणं. जिथे मनाला दिशा असते, पण गंतव्य नसतं. जिथे पाय चालत राहतात आणि आत्मा हळूहळू जागा होत जातो.पहाटेच्या मंद धुक्यातून एखाद्या डोंगरवाटेवर चालताना, पक्ष्यांच्या आवाजांनी भरलेल्या जंगलातून मार्ग काढताना किंवा समुद्रकिनारी बसून क्षितिजाकडे पाहताना मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते. शहरातलं सततचं धावपळीचं जीवन, मोबाइलच्या स्क्रीनमधलं कृत्रिम जग, जबाबदाऱ्यांचं ओझं - हे सगळं त्या क्षणात विरघळून जातं. निसर्गात गेल्यावर जाणवतं की आपण किती कृत्रिम आयुष्य जगतो आहोत. निसर्गाच्या सान्निध्यात कोणालाही स्वतःला सिद्ध करायचं नसतं, कोणाशी स्पर्धा करायची नसते. तिथे फक्त आपण आणि आपला श्वास असतो. डोंगर, पर्वत नेहमी आपल्याला स्थैर्य शिकवतात. कितीही वादळं आली, पाऊस पडला, ऋतू बदलले तरी डोंगर आपल्या जागी खंबीर उभे असतात. माणसाचं आयुष्य मात्र छोट्या संकटांनीही हादरून जातं. पण जेव्हा आपण त्या पर्वतांकडे शांतपणे पाहतो, तेव्हा नकळत मनालाही एक ताकद मिळते. असं वाटतं की, “हेही दिवस जातील.”समुद्र आपल्याला विशालता शिकवतो. त्याच्या अथांग लाटांकडे पाहताना जाणवतं की आपल्या समस्या किती लहान आहेत. लाटा सतत किनाऱ्यावर आदळतात, परत जातात आणि पुन्हा नव्याने येतात. अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा कदाचित समुद्रापेक्षा चांगली कोणीच देऊ शकत नाही.वाहणारी नदी आपल्याला जीवनाचं तत्त्वज्ञान शिकवते. ती कधी थांबत नाही. तिच्या मार्गात दगड येतात, वळणं येतात, खोल दऱ्या येतात, पण ती आपला प्रवाह कायम ठेवते. माणसालाही असंच जगायला हवं. वाहणारं पाणी जीवन निर्माण करतं. भटकंतीतून मला हे समजलं की आयुष्य म्हणजे सतत चालत राहण्याचं नाव आहे. प्रत्येक अनुभव, प्रत्येक वेदना, प्रत्येक आनंद आपल्याला घडवत असतो.भटकंती करताना अनेक अनोळखी माणसं भेटतात. त्यांच्याशी असलेलं नातं काही क्षणांचंच असतं, पण त्या क्षणांतून आयुष्यभर लक्षात राहतील असे अनुभव मिळतात. एखाद्या छोट्या गावातला टपरीवरचा गरमागरम चहा, पावसात एखाद्या झोपडीत घेतलेला आसरा, एखाद्या गावच्या पारावर आजोबांनी सांगितलेली गोष्टी— या गोष्टी कदाचित बाहेरून साध्या वाटतील, पण त्या मनाच्या खूप खोलवर जाऊन बसतात.

एकदा एका डोंगरगावात भटकताना एका वृद्ध आजोबांची भेट झाली होती. त्यांचं छोटंसं टुमदार घर, घरच, अंगण, बाहेर बांधलेली गुरं आणि चेहऱ्यावर विलक्षण समाधान. त्यांनी मला विचारलं, “कुठून आलीस?” मी मुंबईचं नाव सांगितलं. ते हसले आणि म्हणाले, “मोठ्या शहरात सगळं मिळतं म्हणे… पण मनाची शांतता मिळते का?” त्या एका प्रश्नाने मी काही क्षण निरुत्तर झाले. खरंच, आपण इतक्या गोष्टी मिळवण्यासाठी धावत असतो, पण स्वतःसाठी जगणं विसरतो. त्या वृद्धाच्या चेहऱ्यावरचं समाधान मला कधीच, कोणाही व्यक्तीच्या चेहऱ्यावर शहरात कधीच गवसल नाही. भटकंती म्हणजे फक्त निसर्ग पाहणं नसतं; ती स्वतःच्या आत डोकावण्याची संधी असते. अनेकदा आपण लोकांमध्ये राहूनही स्वतःपासून दूर जातो. पण जेव्हा आपण एकटे एखाद्या कड्यावर बसतो, मावळत्या सूर्याला शांतपणे पाहतो, तेव्हा आतमध्ये दडलेले प्रश्न वर यायला लागतात. “मी नेमकं काय शोधतेय?”, “मला खरंच कशात आनंद मिळतो?”, “मी जगतेय की फक्त धावते आहे?” या प्रश्नांची उत्तरं कोणत्याही पुस्तकात किंवा इतरांच्या शब्दांत मिळत नाहीत. ती फक्त अनुभवातून मिळतात, आणि भटकंती हा अनुभव देत राहते. ध्यानधारणा म्हणजे फक्त डोळे मिटून बसणं नव्हे, तर वर्तमान क्षणात पूर्णपणे जगणं. भटकंती मला हेच शिकवते. जेव्हा मी एखाद्या जंगलातून चालत असते, तेव्हा पानांची सळसळ, पक्ष्यांचा आवाज, ओलसर मातीचा सुगंध - या प्रत्येक गोष्टीत मन इतकं हरवून जातं की विचार थांबतात. त्या क्षणी ना भूतकाळ असतो ना भविष्यकाळ; फक्त वर्तमानकाळ असतो. हीच खरी ध्यानाची अवस्था आहे.अध्यात्म आणि भटकंती यांचं नातं खूप खोल आहे. अनेक जण देव शोधण्यासाठी मंदिरं, मशीद, चर्च किंवा तीर्थक्षेत्रं गाठतात. पण मला वाटतं, देव सर्वात जास्त निसर्गात जाणवतो. कारण निसर्गात कोणताही दिखावा नसतो. झाडं सावली देताना काही अपेक्षा ठेवत नाहीत. नदी अविरत वाहत असते. “मी किती मोठं काम करतेय.”हा आविर्भाव तिच्यात नसतो. सूर्य रोज उगवतो आणि मावळतो, कोणत्याही कौतुकाशिवाय. निसर्ग आपल्याला नि:स्वार्थपणे जगायला शिकवतो. निसर्ग आपल्याला निरपेक्ष प्रेम करायला शिकवतो. कधी कधी मी डोंगराच्या माथ्यावर बसून फक्त आकाशाकडे पाहत राहते. त्या अथांग निळाईत स्वतःचं अस्तित्व किती लहान आहे, याची जाणीव होते. पण त्याच वेळी हेही जाणवतं की आपण या विश्वाचा एक भाग आहोत. आपल्या प्रत्येक श्वासाचा संबंध या निसर्गाशी आहे. ही भावना मनाला एक वेगळीच नम्रता देते.भटकंतीत एक सुंदर गोष्ट असते - ती आपल्याला स्वीकारायला शिकवते. कधी वाट चुकते, कधी पाऊस अचानक सुरू होतो, कधी थकवा येतो. पण प्रवास थांबत नाही. आयुष्यही असंच असतं. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडणार नाही, पण त्यातून पुढे चालत राहणं महत्त्वाचं असतं.झाडं पानगळ स्वीकारतात म्हणूनच पुन्हा फुलू शकतात. माणसालाही तुटणं, हरवणं आणि पुन्हा उभं राहणं शिकावंच लागतं.आजच्या काळात माणूस तंत्रज्ञानाने खूप पुढे गेला आहे, पण मनाने मात्र अधिक अस्वस्थ झाला आहे. सोशल मीडियावर हजारो लोकांशी जोडलेलं असूनही आतून एकटेपणा वाढतोय. अशा वेळी भटकंती म्हणजे स्वतःला पुन्हा शोधण्याचा मार्ग वाटतो. मोबाईल नेटवर्क नसलेल्या एखाद्या डोंगरावर उभं राहिल्यावर समजतं की जगण्यासाठी इंटरनेटपेक्षा श्वास अधिक महत्त्वाचा आहे. त्या शांततेत मन स्वतःशी बोलायला लागतं. भटकंतीची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिच्यात कोणताही कृत्रिमपणा नसतो. तिथे महागड्या हॉटेल्सची गरज नसते, ना कोणत्याही दिखाव्याची. एका छोट्याशा तंबूतली रात्र, शेकोटीभोवती बसून केलेल्या गप्पा, पावसात भिजलेली वाट - हे अनुभव कोणत्याही ऐश्वर्यापेक्षा अधिक श्रीमंत असतात. माणूस म्हणून आपण अधिकाधिक संपन्न होत असतो कारण ते थेट मनाला स्पर्श करतात. प्रत्येक प्रवास शेवटी आपल्याला स्वतःकडे परत आणतो. आपण जगभर फिरतो, नवीन ठिकाणं पाहतो, नवीन लोक भेटतात; पण त्या सगळ्यांतून हळूहळू स्वतःचीच नवीन ओळख तयार होत जाते. आपण किती मजबूत आहोत, किती संवेदनशील आहोत आणि खरंच आपल्याला काय हवं आहे - हे समजायला लागतं. आणि म्हणूनच, आजही जेव्हा एखादी नवीन वाट मला खुणावते, तेव्हा मी कोणताही जास्त विचार करत नाही. त्या वाटेला धरून मी चालू लागते कारण मला माहीत असतं की त्या वाटेच्या शेवटी फक्त एखादं नवीन ठिकाण मिळणार नाही, तर स्वतःचा एखादा नवीन पैलूही सापडणार आहे. भटकंती म्हणजे मग केवळ प्रवास राहत नाही, ती एक सवय होते, एक छंद होतो मुक्तपणे जगण्याचा, प्रत्येक क्षण अनुभवण्याचा आणि स्वतःला सतत नव्यानं शोधत राहण्याचा एक सुंदर प्रवास.

Comments
Add Comment