Tuesday, June 16, 2026

Nashik : एल निनोचं संकट! नाशिकच्या शेतकऱ्यांची वाढली धाकधूक; खरीप हंगामासाठी ‘आत्मा’च्या महत्त्वाच्या सूचना

Nashik : एल निनोचं संकट! नाशिकच्या शेतकऱ्यांची वाढली धाकधूक; खरीप हंगामासाठी ‘आत्मा’च्या महत्त्वाच्या सूचना

Nashik : यंदा चांगला पाऊस पडेल आणि भरघोस उत्पादन मिळेल, या आशेवर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत आता ‘एल निनो’ (El Nino) मुळे आणखी भर पडली आहे. कारण चालू वर्षात एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे वितरण अनियमित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (Agricultural Technology Management Agency) अर्थात ‘आत्मा’कडून शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

एल निनोचं शेतकऱ्यांवर संकट

वेगवेगळ्या संकटांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पीक नियोजन केले होते. मात्र, एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसात उशीर, दीर्घ खंड किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पारंपरिक शेती पद्धतीऐवजी हवामान आधारित पीक नियोजनावर भर देणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘आत्मा’ नाशिकचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद यांनी शेतकऱ्यांना प्रमाणित आणि स्थानिक हवामानास अनुरूप वाणांची निवड करण्याचा सल्ला दिला आहे. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे, उपलब्ध ओलाव्यानुसार पेरणीचे नियोजन करणे, तसेच कमी कालावधीत येणारी आणि दुष्काळसदृश्य परिस्थिती सहन करणारी पिके निवडणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्या

सोयाबीन, मूग, बाजरी आणि तूर यांसारख्या पिकांसाठी शिफारस केलेल्या वाणांची निवड करून आंतरपीक पद्धतीचा अवलंब करा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पावसात खंड पडल्यास पुनर्पेरणीची वेळ येऊ नये यासाठी पर्यायी पीक नियोजन तयार ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. ज्या भागांत पाणीटंचाईची निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या भागांत कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सरी-वरंबा पद्धत, मल्चिंग (Mulching), सेंद्रिय खतांचा वापर, जलसंधारण आणि पावसाचे पाणी साठवण यांसारख्या उपाययोजनांचा अवलंब करावा. रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि मृदा परीक्षणानुसार खत व्यवस्थापन केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होईल, असेही सांगण्यात आले आहे.

हवामान अंदाज, पीक सल्ला आणि आपत्कालीन पीक नियोजनासंदर्भात अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी विभाग (Agriculture Department) , कृषी विज्ञान केंद्र (Krishi Vigyan Kendra) किंवा तालुका कृषी कार्यालयाशी (Taluka Agriculture Office) संपर्क साधावा, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा