Saturday, June 13, 2026

Concentration : कामात एकाग्रता असावी

Concentration : कामात एकाग्रता असावी

आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक जीवनात यश मिळविण्यासाठी अनेक गुणांची आवश्यकता असते. त्यापैकी एकाग्रता हा सर्वांत महत्त्वाचा गुण आहे. मन स्थिर ठेवून एखाद्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे म्हणजे एकाग्रता होय. ज्या व्यक्तीचे मन एकाग्र असते, ती व्यक्ती आपले काम अधिक चांगल्या प्रकारे, कमी वेळेत आणि यशस्वीपणे पूर्ण करू शकते.

एकाग्रता नसल्यास मन सतत इतर गोष्टींकडे भटकत राहते. त्यामुळे चुका होतात, कामात विलंब होतो आणि अपेक्षित यश मिळत नाही. विद्यार्थी अभ्यास करताना, खेळाडू खेळताना, कलाकार कला सादर करताना किंवा शास्त्रज्ञ संशोधन करताना एकाग्रतेची आवश्यकता असते. एकाग्रतेमुळे कार्यक्षमता वाढते आणि आत्मविश्वास दृढ होतो.

स्वामी विवेकानंद, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर यांसारख्या महान व्यक्तींच्या यशामागे त्यांची प्रखर एकाग्रता होती. त्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून कठोर परिश्रम केले आणि यशाचे शिखर गाठले. एकाग्रता वाढवण्यासाठी नियमित दिनचर्या, पुरेशी झोप, योग्य आहार, ध्यानधारणा आणि सकारात्मक विचार यांची मदत होते. काम करताना अनावश्यक मोबाईल, दूरदर्शन किंवा इतर व्यत्यय टाळल्यास मन अधिक केंद्रित राहते.

“एकाग्र मनाने केलेले कार्य नेहमीच यशस्वी होते.” या कारणे सावधान । एकाग्र असावे मन । तरी मग जेवता भोजन। गोड वाटे ॥ - श्रीमद् दासबोध

आपणा सर्वांची एक तक्रार असते. आम्ही अभ्यासाला बसतो, पण आमचे मन एकाग्र होत नाही. पण समर्थांचे निरीक्षण किती सूक्ष्म आहे ते पाहा. अभ्यासाचे सोडा, जेवताना तरी आपले लक्ष असते का?

अभ्यासच नव्हे, प्रत्येक कर्म शांतपणे, एकाग्रतेने करावयाचे असते. जेवतानासुद्धा आपली किती वळवळ चालू असते? अन्नापासून रक्त बनते व रक्तावरून वृत्ती तयार होते. म्हणून जेवताना मन शांत व प्रसन्न असावे. म्हणून आपल्याकडे जेवण करताना श्लोक म्हणण्याची पद्धत आहे. याचा अर्थ जेवताना आपली वृत्ती आणि मुद्रा आनंदी असावी.

मानसशास्त्र म्हणते की, जेवताना चिडचिड केली, तर स्वभावही चिडका होतो. जेवताना मन एकाग्र व शांत असेल, तर स्वभाव तसाच होईल. याबाबतीत स्वामी विवेकानंदांची एक कथा बोलकी आहे. स्वामी विवेकानंदांचा मुक्काम इंग्लंडमधील एका छोट्या गावात होता. सकाळी स्वामीजी फिरायला गेले होते. ते फिरत फिरत एका सरोवराजवळ आले. तिथे त्यांनी पाहिले की, काही ब्रिटिश मुले बंदुकीने नेमबाजीचा अभ्यास करीत आहेत. त्या सरोवरात अंड्यांची अनेक टरफले तरंगत होती. मुले हातातील बंदुकीच्या सहाय्याने अंड्याच्या टरफलावर नेम धरीत होती; परंतु कुणालाही टरफल उडवता येत नव्हते. त्या पाच-सहा मुलांपैकी प्रत्येकाने ३-४ हा वेळा प्रयत्न केला पण कुणालाही यश मिळाले नाही. स्वामीजी तो सर्व प्रकार पाहून हसले. त्या मुलांना तो मोठा अपमान वाटला. त्यांनी स्वामीजींना विचारले, “हसता काय? तुम्हाला तरी नेम धरून टरफल उडवता येईल का?”

स्वामीजी म्हणाले, “ही बंदूक कशी धरायची, चाप कसा ओढायचा ते तुम्ही मला सांगा. मी प्रयत्न करतो.” स्वामीजींनी आयुष्यात पहिल्यांदा बंदूक हातात घेतली. तिचे नियम शिकले. त्यांनी तीन गोळ्या झाडल्या. आश्चर्य म्हणजे त्यांनी अड्याची तीन टरफले उडवली. त्या मुलांना स्वामीजी म्हणाले, “मन एकाग्र हवे. एकाग्रतेने सारे काही शक्य होते. प्रत्येक कर्म करताना मन शांत व स्थिर ठेवण्याचा अभ्यास करा.” धनराज पिल्ले, सचिन तेंडुलकर, विश्वनाथ आनंद हे खेळाडू खेळतानासुद्धा एकाग्र होतात. केवळ अभ्यासच नव्हे, तर आपले प्रत्येक कर्म शांतपणे व एकाग्रतेने करायचे असते.

Comments
Add Comment