Sunday, June 14, 2026

Bungee Jump Accident : ब्राझीलमध्ये बंजी जंपिंगचा थरार; सुरक्षा दोर बांधायला विसरल्याने २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Bungee Jump Accident : ब्राझीलमध्ये बंजी जंपिंगचा थरार; सुरक्षा दोर बांधायला विसरल्याने २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

São Paulo: ब्राझीलमधील साओ पाऊलो राज्यातील लाइमेइरा परिसरात बंजी जंपिंग (ब्रिज जंपिंग) करताना एका २१ वर्षीय तरुणीचा ४० मीटर (सुमारे १३० फूट) उंचीवरून पडून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे साहसी खेळांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नेमकी घटना काय?

मृत तरुणीचे नाव मारिया एडुआर्दा रोड्रिग्ज डी फ्रेटास असे आहे. मारिया बंजी जंपिंगचा आनंद घेण्यासाठी ब्रिज जंपिंग साइटवर पोहोचली होती. मात्र, साहसी खेळाच्या उत्साहाच्या भरात संबंधित कर्मचाऱ्यांनी तिच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असलेला ‘सेफ्टी रोप’ (सुरक्षा दोर) बांधायलाच विसरले. या भीषण निष्काळजीपणामुळे, तरुणीला उडी मारण्यासाठी उंचावरून फेकले असता, ती थेट जमिनीवर कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

व्हिडिओतून समोर आला भयानक प्रकार

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुणीची तयारी सुरू आहे आणि काही क्षणातच तिला उडी मारण्यासाठी सोडले जाते. तिला सोडताच कर्मचाऱ्यांना आपली चूक लक्षात येते आणि ते ओरडतात, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

भावी पती आणि कुटुंबियावर दु:खाचा डोंगर

मारियाचा अलीकडेच साखरपुडा झाला होता आणि तिचा भावी पतीही त्या ठिकाणी उपस्थित होता. डोळ्यांसमोर घडलेल्या या भीषण घटनेमुळे तो इतका हादरला की, त्याला प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. मारियाने या दुर्घटनेपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत "कोण पुलावरून उडी मारायला सांगतंय?" असे मजेशीर कॅप्शन दिले होते, जे आता तिचे शेवटचे क्षण ठरले आहेत.

कायदेशीर कारवाई

या गंभीर प्रकरणी स्थानिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ६ जणांना अटक केली आहे. सुरक्षिततेच्या नियमांचे इतके मोठे उल्लंघन कसे झाले आणि याला नेमके कोण जबाबदार आहे, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. या दुर्घटनेनंतर बंजी जंपिंगसारख्या साहसी खेळांमध्ये सुरक्षेचे नियम पाळण्याबाबत जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >