Saturday, June 13, 2026

Nashik : नाशिकमध्ये बीएसएनएल केबल चोरी प्रकरणाचा पर्दाफाश, २ कोटींहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

Nashik : नाशिकमध्ये बीएसएनएल केबल चोरी प्रकरणाचा पर्दाफाश, २ कोटींहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

नाशिक : शहरात बीएसएनएल (BSNL) कंपनीच्या महागड्या भूमिगत तांब्याच्या (यू.जी. केबल) चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक, गुंडा पथक व अंबड गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश करण्यात आला असून एकूण २ कोटी ८८ लाख ४२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

शहरात वायर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी संबंधित गुन्ह्यांचा शोध घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सन २०२४ मध्ये नाशिकरोड हद्दीत बीएसएनएल कार्यालयाजवळ बीएसएनएल कंपनीची (BSNL Company) भूमिगत कॉपर व अ‍ॅल्युमिनियम केबल चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासात निष्पन्न झाले की चोरी केलेला बीएसएनएल कंपनीचा भूमिगत कॉपर केबल माल मुंबईतील भांडुप परिसरातील एका गोदामात साठवून ठेवण्यात आला होता. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने भांडुप पश्चिम, मुंबई येथे छापा टाकून कारवाई केली . तेथे सुमारे साडेसतरा टन विविध रंगांचे अखंड व तुकडे केलेले अ‍ॅल्युमिनियम केबल, साडेचौदा टन जळून वेगळे केलेले कॉपर वायर्स आणि दीड टन विविध रंगांचे अ‍ॅल्युमिनियम केबलचे तुकडे असा एकूण दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख चाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सहा आरोपींना अटक

तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन वाहाब अब्दुल नवाज, सुरेश दिलीप वैराळ , बस्तीलाल राजाराम यादव , कमलेशकुमार सुखदेव रविदास , तनवीर मुफ्फिर शेख आणि राजकुमार केशूलाल जैन या सहा आरोपींना अटक केली.

या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकमार्फत सुरू आहे. दरम्यान अटक आरोपींकडून नाशिक शहरातील सरकारवाडा, मुंबई नाका पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे आणि म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे उघडकीस आले आहेत. ही संपूर्ण कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक, गुंडा पथक व अंबड गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पथकातील अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >