Thursday, June 4, 2026

“हरि बोल...!’’

“हरि बोल...!’’

काझीसाब, आज आपला सारा गावच पागल झालाय, असे वाटतेय. प्रत्येकाच्या तोंडून फक्त एकच शब्द येतोय.. “हरि बोल... हरि बोल..." “अरे त्या वेड्यांची मिरवणूक चक्क आपल्या महालापर्यंत येऊन पोचली की ! केवढे बेमुर्वतखोर लोक हे! बघा बघा तरी" नवद्विप गावचा कोतवाल चांदकाझी नावाच्या एका मुस्लीम अधिकाऱ्याला सांगत होता. त्याचे बोलणे ऐकून काझीही संतापला. “काय कोलाहल चाललाय या लोकांचा?" असे म्हणत तो आपल्या महालाच्या सज्ज्यात आला. तेव्हा त्याला रस्त्यावर मोठे विलक्षण दृश्य दिसले. ग्राममंदिराचा कर्मठ पुजारी गावकुसाच्या महाराला टाळ्या देत नाचत होता! बडी हवेलीतली पडदानशीन शेटाणी बाजारातल्या भाजीवालीबरोबर टिपऱ्या खेळत नाचत गात होती. श्रीमंत, गरीब, लहान, मोठे, अठरापगड जातीचे सर्वच जण मृदुंग, झांजाच्या तालात “हरि बोल, हरि बोल...’’ चा गजर करीत होते. त्यांच्यातल्या भेदभावाच्या भिंती जण गळून पडल्या होत्या.

त्या भक्तियात्रेच्या मुकुटमण्याकडे - चैतन्यमहाप्रभूंकडे काझीचे लक्ष गेले आणि तेथेच त्याचे डोळे खिळून राहिले. सोन्यासारखा चमकणारा गौरवर्ण, कमळासारखे डोळे, लालबुंद ओठ, रसरशीत देहयष्टी आणि नखशिखांत डवरून गेलेली भक्तिभावपूर्णता अशी चैतन्यमूर्ती पाहून काझी आपला क्रोध तर विसरलाच पण चैतन्यप्रभूंच्या चरणी लोळण घ्यायला तोही घराबाहेर धावत आला! तेव्हा त्याला दिसले, आतापर्यंत आपल्यापाशी मिरवणुकीची तक्रार करणारा कोतवालही त्या मिरवणुकीत सामील होऊन “हरि बोल, हरि बोल " म्हणत नाचत आहे...!!

पंधराव्या शतकातील बंगालमधल्या नवद्विप नामक गावी हा चमत्कार घडला होता. वैष्णवसंत श्री चैतन्यमहाप्रभूंचा तेथे १८ फेब्रुवारी १४८६ मध्ये जन्म झाला. हे गाव आता मायापूर या नावाने ओळखले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव जगन्नाथ व आईचे नाव शचीदेवी होते. चैतन्यांच्या मातापित्यांनी त्यांचे नाव विश्वंभर ठेवले होते. पण लाडाने त्यांना निमाई म्हणत. चैतन्यांचा चमकदार गोरापान रंग असल्याने सर्व त्यांना गौरांग असेही म्हणू लागले. शचीदेवींचे वडील प्रख्यात ज्योतिषी होते. महाप्रभूंच्या जन्मानंतर त्यांच्या अंगावरची शुभचिन्हे पाहून त्यांनी भविष्य वर्तवले होते की, हा मुलगा नक्कीच अत्यंत प्रभावी श्रेष्ठ पुरुष होईल. आणि तसेच घडले. शालेय जीवनात ते अत्यंत कुशाग्र विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. तसेच ते अतिशय प्रतिभासंपन्नही होते.

लहान वयातच त्यांनी संस्कृत, व्याकरण आणि न्यायशास्त्र यात प्राविण्य मिळविले होते. चैतन्य महाप्रभू हे विद्यार्थीदशेत असताना न्यायशास्त्रावर ग्रंथ लिहित होते. त्यांच्याच पाठशाळेतील दुसरा एक रघुनाथ नावाचा बुद्धिमान विद्यार्थीही न्यायशास्त्रावरच ग्रंथ लिहीत होता. एकदा हे दोघेही आपापले ग्रंथ घेऊन नावेतून चालले होते. रघुनाथाच्या विनंतीवरून चैतन्यमहाप्रभू त्याला आपला ग्रंथ वाचून दाखवू लागले. वाचता वाचता जेव्हा त्यांनी रघुनाथकडे पाहिले तेव्हा रघुनाथाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहताना त्यांना दिसल्या. रघुनाथ म्हणाला, “माझा ग्रंथ सर्वश्रेष्ठ ठरावा, अशी माझी फार इच्छा होती. पण तुझ्या या अप्रतिम ग्रंथासमोर माझा ग्रंथ कोण वाचणार? म्हणून मला रडू आले रे..!" हे ऐकल्यावर चैतन्यांनी आपला ग्रंथ नदीत भिरकावून दिला आणि मित्राच्या आनंदापुढे “मला दुसरे काही नको ’’ असे म्हटले. असा त्याग संतच करू जाणे!

चैतन्य महाप्रभू प्रथम व्याकरणशास्त्राचे पंडित होते. त्यांची मोठी पाठशाळाही होती. त्यांच्या प्रथम पत्नीचे नाव लक्ष्मीप्रिया होते. तिच्या निधनानंतर त्यांचा विवाह विष्णूप्रियाशी झाला. पण नंतर त्यांनी केशवभारती नावाच्या गुरूंकडून संन्यासदीक्षा घेतली. तेव्हापासून त्यांचे नाव चैतन्य झाले. एकदा गोपालकृष्णाचे नामस्मरण करता करता त्यांच्यातला पंडित हरपून ते केवळ कृष्णाचे परम भक्त बनले. त्याच सुमारास ते गयेला गेले असता कृष्णपदांचे दर्शन घेताच ते उन्मनी अवस्थेत जाऊन खाली कोसळणार तेवढ्यात त्यांना ईश्वरपुरी नामक साधूंनी सावरले. या ईश्वरपुरी साधुमहाराजांकडून चैतन्यमहाप्रभूंना गुरुअनुग्रह मिळाला. या अनुग्रहानंतर महाप्रभूंनी अवघ्या बंगालमध्ये गोपीजनवल्लभ श्रीकृष्णाच्या अनन्य भक्तीचा कल्लोळ उठवला! भक्तांच्या मोठ्या मेळाव्यात टाळ्यांच्या गजरात, ढोल, मृदुंग, झांजांच्या नादात, नाचत हरिनामसंकीर्तन करण्याची भजनाची नवीन शैली त्यांनी रुढ केली. हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।

"> " class="section-post-content-internal-post-title">Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘वन प्लॅटफॉर्म’ यंत्रणा , गर्दी, वाहतूक अन् सुरक्षेचे होणार रिअल टाइम व्यवस्थापन

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Nashik Simhastha Kumbh Mela) दरम्यान कोट्यवधी भाविकांचे आगमन अपेक्षित असल्याने गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी ...

हा ३२ अक्षरांचा महामंत्र चैतन्य महाप्रभूनीच आपल्याला दिला आहे. त्याला तारकब्रह्ममहामंत्र म्हणतात. केवळ बंगालच नव्हे तर महाप्रभूंनी दक्षिण, पश्चिम भारतातही तीर्थयात्रा करीत निष्काम हरिभक्तीचा प्रसार केला. श्रीकृष्ण-गोपिकांची रासक्रीडा जेथे झाली, ते वृंदावनाचे स्थान शोधून काढून चैतन्यमहाप्रभूंनी त्याचे माहात्म्य पुन्हा प्रस्थापित केले. चैतन्यमहाप्रभूंनी अचिंत्यभेदाभेद नामक वेदान्त संप्रदाय स्थापन केला. याला गौडीय वैष्णव संप्रदाय असेही म्हणतात. आपल्या हृदयात कृष्णमीलनाबद्दलच्या अनिवार तळमळीचा राधाभाव अखंड जागृत असावा, म्हणजे श्रीहरीची एकनिष्ठ भक्ती मनात सदैव ताजी रहावी, अशी त्यांची शिकवण होती. एका अनमोल श्लोकाष्टकाखेरीज महाप्रभूंनी काहीही लिहिले नाही. पण त्या श्लोकाष्टकात भक्तीची सारी रहस्ये उलगडली आहेत.

"> " class="section-post-content-internal-post-title">Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘वन प्लॅटफॉर्म’ यंत्रणा , गर्दी, वाहतूक अन् सुरक्षेचे होणार रिअल टाइम व्यवस्थापन

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Nashik Simhastha Kumbh Mela) दरम्यान कोट्यवधी भाविकांचे आगमन अपेक्षित असल्याने गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी ...

आपल्या श्लोकाष्टकात त्यांनी श्रीकृष्ण संकीर्तनाचे महात्म्य गायले आहे. आपल्या हृदयात श्रीकृष्णानुराग निर्माण होत नाही म्हणून खंत व्यक्त केली आहे. जन्मजन्मांतरी निष्काम कृष्णभक्ती आपल्या अंतःकरणात असावी म्हणून कृष्णाची करूणा भाकली आहे. कृष्णनामसंकीर्तन करताना अष्टसात्त्विक भावाने शरीर भरून जावे अशी कामना प्रकट केली आहे. श्रीकृष्णाने आपला स्वीकार केला वा न केला तरी अखेरपर्यंत त्याचीच भक्ती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. देववाणीतील त्यांच्या या श्लोकाष्टकातील एक श्लोक ... नयनं गलदश्रुधारया वदनं गद्गदरुद्धया गिरा । पुलकैर्निचितं वपुः कदा तव नामग्रहणे भविष्यति ।।६।। त्याचा भावानुवाद.... हरिनाम मुखाने घेता घेता जधी येईल कंठ दाटून ।। प्रेमभक्ती ही होत अनावर झरझर झरतील नयन ।। तन भरेल अवघे रोमांचांनी होऊन कृष्णमय मन ।। अशा उत्कट भक्तीचे मज कधी मिळेल का वरदान ।। भक्ती कर्मकांडाने उत्पन्न होत नसून तिच्यासाठी अंतःकरण उचंबळून यावे लागते. अशी भक्ती करता येत नाही, तर ती लाभावी लागते. चैतन्यमहाप्रभूंचे हे विचार त्यांच्या शिष्यांनी आत्मसात केले आणि चैतन्यचरित्रे, भक्तिरसामृतसिंधू, उज्ज्वलनीलमणी इ. ग्रंथ लिहून त्यातून आपल्या गुरूंची तत्त्वप्रणाली विस्तारपूर्वक मांडली आहे. त्यामुळे चैतन्यपंथ सर्वदूर पसरला.

वैष्णवधर्माच्या प्रचारासाठी चैतन्यप्रभूंनी गृहत्याग करून संन्यास घेतला. आता सारे जग त्यांचे कुटुंबीय बनले होते. जगाच्या उद्धारासाठी आपलेपणाच्या कक्षा विस्तारित करा, हाच त्यांचा संदेश होता. एकदा जगन्नाथपुरी येथे समुद्रतीरावरून चैतन्यप्रभूंची भजनयात्रा चालली होती. हरिभक्तीत बेहोश होऊन प्रभू नाचत गात चालले होते. मागे असंख्य भक्तमंडळी हरिनामाचा जयघोष करीत होती. प्रभूंनी अथांग निळ्या-निळ्या समुद्राकडे पाहिले. समुद्राच्या उसळणाऱ्या प्रत्येक लाटेमध्ये चैतन्यप्रभूंना नीलवर्णी श्रीकृष्णाचे विश्वरूप दर्शन झाले. आपल्या या देहाने त्या अनंतापासून विलग का रहावे? या भावोद्रेकाने चैतन्यांनी “हे कृष्ण, हे श्याम…" असा टाहो फोडीत समुद्राच्या लाटांवर आपला देह झोकून दिला. श्रीहरीशी एकरूप होण्यासाठी जलसमाधी घेतली!!

___डॉ. अनुराधा कुलकर्णी
Comments
Add Comment